My Blog List

Tuesday, 19 July 2016

बस्स! त्या क्षणानंतर माझ्या गुरूंच्या यादीत आणखी एकाची भर पडली - "अनुभव’’ !!!

आज गुरूपौर्णिमेची धुम सकाळपासूनच सुरू झाली. आमच्या परिसरातील साई मंदिरांमध्ये पहाटे 7 वाजल्यापासूनच अखंड पारायण सुरू झाले. अपेक्षेप्रमाणे व्हॉट्सअपच्या वेगवेगळ्या ग्रूपवर गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. आजच्या दिवशी सगळेजण आपल्या शाळेतल्या, क्लासेसमधल्या, कंपनीतल्या गुरूंना भेटून त्यांचा आशिर्वाद घेतात. बरेच जण मला "प्रमिला, तुझा गुरू कोण?' असं गमतीनं विचारतात. मी आयुष्यात कुणाच्या मार्गदर्शनाखाली मोठी झाले? कुणाचं शिष्यत्व पत्करलंय? मला ज्यानं घडवलं, तो कोण आहे? हे सारं जाणून घेण्यातही अनेकजणांना रस असतो; आणि वर्षभर कुणाच्या लक्षात राहत नाही परंतू आजच्या दिवशी मात्र गुरूंना एक तरी फोन करूया, असेही नुमने असतात आपल्या आजुबाजुला... पण माझ्या बाबतीत म्हणाल तर लहानपणी कानावरून गेलेलं महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य मला आठवतं, ‘’तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...!’’.

कारण मला लहानपणापासूनच वेगवेगळ्या गोष्टी करण्याची आवड होती, मग त्या गोष्टी करणं मला जमत नसल्या तरी मी त्या करायचीच...हे वेड होतं माझं. त्यामूळे अनेक टप्प्प्यावर मला भेटलेल्या वेगवेगळ्या माणसांनी मला घडवलंय...शिकवलंय...!! मग मला ते सातवीत असताना पोळ्या बनवायच्या पण लाटता येत नव्हत्या, हे पाहून आईने पोळ्या कशा लाटायच्या हे शिकवणं असो किंवा शाळेत असताना श्रोत्यांसमोर बोलायचं कसं माहित नसुनही वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा असे माझे ठरल्यानंतर शाळेतल्या शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन असो...किंवा आताचच सांगायचं झालं तर माध्यम क्षेत्रात उतरल्यानंतर आपल्या लिखानावर प्रभूत्व कसं करावं इथपासून ते नव-नविन गोष्टी करण्यात अनेक दिग्गजांचा मोठा वाटा आहे. ज्याचा हिशेब मांडायचा झाल्यास पसारा उदंड होईल. त्यातल्या प्रत्येकाचीच भूमिका माझ्याकरिता द्रोणाचार्यांची होती, असं नाही; पण मी मात्र एकलव्यासारखी तन्मयतेनं सारं वेचत आल, साठवत आल. खरं सांगायचं तर आयुष्यात अनुभवासारखा गुरू नाही, असं मला वाटतं. कुठलाही गुरू म्हणा, शिक्षक म्हणा "थिअरी आधी; मग प्रॅक्‍टिकल' असा मार्ग स्वीकारतो; पण अनुभव हा एकमेक गुरू असा आहे, जो आधी प्रॅक्‍टिकल देतो. त्यामुळं थिअरी तुम्हाला घोकावीच लागत नाही, तर ती मेंदूवर कायमची कोरलीच जाते. माझ्या आजुबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेतून मी काही ना काही शिकत आली. या घटनाच आपल्याला काही ना काही शिकवित असतात. गरज असते ती फक्त त्या घटना जाणून घेण्याच्या आपल्यातल्या कुवतीची...उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या शाळेत संचालिका सुलभा कांबळे मॅडम या विद्यार्थ्यांच्या व्यायाम सत्रानंतर ठराविक ग्रूप्स करून त्यांच्याकडून वृत्तपत्र वाचन हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवित असत. काही हूशार मंडळी छान वाचन करायची...सगळ्यांसमोर असं ठणकेदार आवाजात, हातात मोठ्या स्टाईलने पेपर घेऊन त्यातल्या बातम्या वाचून दाखवणं हे पाहून  मला मात्र मोह अनावर झाला. माझे सगळे मित्र-मैत्रीणी मस्त छान वाचन करून आपली वट वाढवित होते. मग मी पण संधी साधली. त्यावेळी ते माझ्यासाठी स्वप्न होतं. एकदा तरी असं सगळ्यांसमोर पेपर वाचून काढयचा म्हणून कधी नव्हे ते आमच्या घरात मराठी वृत्तपत्र आले आणि मी जवळपास एक आठवडाभर वृत्तपत्र वाचनाचा सराव करू लागले. पण बातमीचे वाचन कसं करायचं हे माहित नव्हतं मग घरात टि.व्ही. न्यूज चॅनेल लावून बाहूल्यांसारख्या दिसणाऱ्या अॅंकरना पाहून त्या बातम्या कशा सांगतात, यावर फोकस करू लागले. मग त्यांच्याप्रमाणे वेगवेगळ्या स्वरात बातम्या वाचन करून आठवडा भर मी काही ते वेड सोडलं नाही आणि आला तो स्वप्नपुर्तीचा दिवस. समोर इतकी मोठी मंडळी पाहून सुरवातीला थोडी डगमगली..पण आपल्याला हे करयाचंच आहे हे ठाम होतं मनात. त्यामुळे सुरवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी सुसाट बातमीपत्र वाचून काढले. वृत्तपत्र वाचताना तो वेगळाच आत्मविश्वास अगदी रुबाबात डोलत होत. हा छोटासा प्रसंग मला खूप काही शिकवून जाणारा ठरला. त्यानं मला आयुष्यात दोन अनमोल गोष्टी शिकवल्या. एक म्हणजे, आयुष्यात आनंद, सुख शोधण्यासाठी लांब जाण्याची गरज नसते. आनंदाचं मूळ तुमच्या आसपास असतं; पण भोवतालच्या अनेक हव्या-नकोशा गरजांच्या गर्दीत ते एकाग्र होऊन शोधावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे, अनेकदा तुम्हाला आयुष्यात जे हवंय, जे साध्य करायचंय, त्याच्या अन्‌ तुमच्या दरम्यान बऱ्याच नकोशा त्रासदायक गोष्टी येत असतात. अशा वेळी त्यांनी विचलित होऊन साधना किंवा ध्यासच सोडण्याऐवजी किंवा त्या गोष्टींच्या नावे उगाच त्रागा करण्याऐवजी तुमच्या ध्येयावर जास्त "फोकस' केलंत तर नको असलेल्या त्या गोष्टींचं अस्तित्व तुमच्यासाठी धूसर होऊन जातं.  बस्स! त्या क्षणानंतर माझ्या अगणित गुरूंच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली - "अनुभव’’ !!!

Tuesday, 12 July 2016

‘विठ्ठल-अल्लाह’चे ‘लोकसंगीत प्लस सुफी’ स्टाईलचे हे गाणे ऐकाच एकदा...


खूप दिवसांनी ‘हिंदू-मुस्लिम’ या विषयावर लिहीण्याचा विचार करीत होते. पण ‘हिंदू-मुस्लिम’ यात फक्त दोन शब्द जरी असले तरी यात अनेक धागे-दोरे, घटना, भावना दडलेले असल्याने लिहू की नको लिहू हा विचार करीत होते. पण अखेर ‘डिस्को सन्या’ या चित्रपटातील ‘जय हरी विठ्ठल-अल्लाह हू अकबर’ या गाण्याने मला लिहीतं केलंच. सध्या सगळीकडे सुरू असलेल्या पंढऱीची वारी आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेल्या या ‘जय हरी विठ्ठल-अल्लाह हू अकबर’ या गाण्याने जुलै महिन्याचे वैशिष्ट्य आणखीनच सुंदर करून ठेवले. हे गाणे जेव्हा मी युट्यूबवर ऐकले तेव्हा अक्षरशः अंगावर काटे आले.
मला संगीतातलं फारसं काही कळंत नसलं तरी मात्र हे गाणं मला कळालं. एकीकडे लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेले गायक नंदेश उमप यांच्या रांगड्या आवाजात विठ्ठलाला दिलेली साद....तर दुसरीकडे संगीततल्या डेप्थमध्ये जाऊन अल्लाहला पुकारताना बॉलिवूडचे गायक शबाब साबरी यांचा सुफी सरगम...काय फ्यूजन आहे हे!!!! मित्रांनो आजपर्यंत ‘हिंदू-मुस्लिम’ हा विषयंच जरी कोणाकडे काढला तर ज्याला ओ का ठो कळात नाही  ते ही आज बाबरी मशीद प्रकरण, हिंदुस्थान-पाकीस्तान, आंतकवाद, मुस्लिमांची असुरक्षितता, हिंदू मंदिरांच्या जागी मुस्लिमांच्या मशिदीचे आक्रमण यासारख्या अनेक विषयांवर तासनतास बोलू लागले आहेत. पण अशा मंडळींच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी संगीतकार-निर्माते सचिन पुरोहित-अभिजीत कवठाळकर यांनी ‘डिस्को सन्या’ या फिल्ममधून हे गाणे आणले आहे.  

काय कसली शेंडी...अन काय कसली दाढी...
काय कसला भगवा...अन काय कसला हिरवा...
कायको डाली टोपी अन कायको पेहना फेटा...
माणूसकी हाच धर्म सुनले मेरे बेटा...
गाण्याच्या सुरवातीच्या या चार ओळीच पुरेश्या आहेत हे गाणे समजून घेण्यासाठी....हिंदू म्हणून ओळखावे म्हणून लोक शेंडी ठेवतात, तर मुस्लिमांची ओळख त्यांच्या दाढीवरून करतात. भगव्या रंगाची जोड हिंदु धर्माशी केली जाते तर हिरवा रंग मुस्लिम धर्मीयांची निशाणी बनते. पण तुम्ही दाढी केली काय शेंडी ठेवली काय...माणसांची ओळख ही त्याच्यातल्या माणूसकीनेच होते...तुम्ही भगवे झेंडे मिरवले काय की हिरवे....पण तुमच्यातल्या माणूसकीच्या रंगापुढे भगवे-हिरवे रंग फिके पडतील, अशाच काहीश्या भावना मला या कडव्यातून मिळाल्या. त्यामूळे तुम्ही हिंदू असाल किंवा मुस्लिम....पण हे हातासारशी गाणे ऐकाच! संगीत नव्हे तर वेगवेगळ्या भावनिक स्थितीमध्ये माणूसकीचे महत्त्व अधोरेखित करण्याचा, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे वेगवेगळे रूप दाखविण्याचा प्रयत्न या गाण्यातून केला.  या गाण्यात हे कडवे प्रख्यात बालकलाकार पार्थ भालेराव आणि सुप्रसिद्ध अभिनेता संजय खापरे यांच्यावर चित्रीत केले आहे. या गाण्यात पार्थ भालेराव संजय खापरे याच्या डोक्यावर दगड मारतो, या प्रसंगातून हिदूं-मुस्लिम धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांच्या जोरदार कानशिलात बसविण्यात दिग्दर्शक नियाज मुजावर येथे यशस्वी होतात.

भूखे पेट सुखी रोटी पानी तो दिला दे अल्लाह...
हक्काचं मागूनी थोडी तरी द्या हो कृपा....
अल्लाह तु, मौला तु, माझ्या मुखी तुझे नाव...
या दोन ओळी गाताना नंदेश उमप व शबाब साबरी या दोघांच्या स्वरांची उत्कटता निर्गुण, निराकार अल्ला, ईश्वराला स्वरांच्या माध्यमातून शोधतात. दोन वेळचे जेवण मिळावे एवढाही हक्क आज समाजात अनेक गरिबांना मिळत नाही, त्या भूकेला कोणताही धर्म नसतो. भूकेसाठीच्या या अमेझिंग, विलक्षण शब्दात जेव्हा पार्थ भालेराव रस्त्यावरच्या भूकेने व्याकूळ झालेल्या लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू देतो, ही भूक मिटवण्यासाठी हिंदू-मुस्लिम एक झाले तर कोणताच धर्मीय हा भूकेला राहणार नाही असा संदेश या गाण्यातून दिला आहे. जगातल्या साऱ्याच प्रामाणिक, सच्च्या आणि अस्सल भावनेला समर्पित हे गाणे आहे. या गाण्यात दाखविलेला अजून एक प्रसंग माझ्या मनाला भावला तो म्हणजे जेव्हा पार्थ भालेराव जेवणापुर्वी ‘ओम नमः शिवाय..फादर सन..बिस्मील्ला आमीर’ या मंत्राचा जप करतो. काय कमाल कल्पना आहे हे मंत्र बनविण्याची. म्हणजे हिंदुंमध्ये ‘वदनी कवळ घेता’ हे मंत्र म्हटले काय....आणि मुस्लिमांमध्ये कुराण वाचन केले काय....पण सर्व धर्म समान मानून समाजात असलेली माणूसकीची भूक आज प्रत्येकाने मिटवली पाहीजे, असा संदेश नकळत या गाण्यात दिला आहे. याच ईश्वरीय भावनेचा एक कोपरा निखळ मैत्री. अशाच निखळ मैत्रीच्या भावनेला समर्पित ‘जय हरि विठ्ठल...अल्लाह हू अकबर’ हे गाणे एक वेगळी उंची गाठणार आणि दाद द्यायला भाग पाडणार आहे. गाण्याच्या शेवटी धर्माने मुस्लिम असलेले गायक शबाब साबरी यांच्या सुरेल आवाजातून कधी विठ्ठलाला साद घालतात...तर हिंदु असलेले लोहशाहीर नंदेश उमप अल्लाहला पुकारतात...काय निखळ क्षण वाटतात ते क्षण...दोन्ही धर्माचे गायक एकमेकांच्या धर्मातील देवतांचे नावे घेतात...आणि जेव्हा हे दोन्ही स्वर एकत्र येऊन दोघेही ‘जय हरी विठ्ठल...अल्लाह हू अकबर’ नामाचा जप करतात...तेव्हाचे संगीत अगदी पवित्र वाटू लागतात.

मी बीड सारख्या जिल्ह्यात जन्मली आहे...वाढली आहे. बीड जिल्ह्यातील प्रत्येक कोपऱ्यातील गाव हे हिंदू-मुस्लिम धर्मीयांच्या एकोप्यातने नांदत आहे. त्यातीलच एका गावात माझे घर आहे. त्यामूळे ‘जय हरि विठ्ठल अल्लाह हू अकबर’ हे गाणे मला खूप भावते. हे गाणे सगळ्याच बाजूने अफाट आहे. गेल्या अनेक वर्षाच्या चित्रपट इतिहासात असं गाणं नव्याने आलंय म्हणजे हिंदु-मुस्लिम या दोन्ही धर्मातील गायकांचा सुरेल वापर, पार्थ-संजय यांच्यातील संघर्षाचा वापर, रस्त्यावरील भुकेल्या मुलांचा वापर, परीसराचा वापर आणि हे कथानाक....या सर्वासाठी संगीतकार-निर्माते सचिन पुरोहित, अभिजीत कवठाळकर, दिग्दर्शक नियाज मुजावर यांना हजार वेळा सलाम. एवड्या सुंदर पद्धतीने ही धर्मव्यवस्था,  समाजव्यवस्था या सर्वांना चपखलपणे थप्पड लगावलेली आहे. अप्रतिम...त्यामूळे सर्वांनी तुमच्या कामातून थोडा वेळ काढा हे ‘जय हरि विठ्ठल, अल्लाह हू अकबर’ हे गाणे ऐकाच एकदा....माणूसकीचे स्वर अनुभवण्यासाठी...

गाणे ऐकण्यासाठी लिंक सोबत जोडत आहे. https://www.youtube.com/watch?v=7qZirK9ZdoU


गीत- नियाज मुजावर
संगीत-सचिन पुरोहित-अभिजीत कवठाळकर
स्वर-लोकशाहीर नंदेश उमप व गायक शबाब साबरी
गीतप्रकार-इंडोफ्यूजन

Friday, 24 June 2016

हल्लीची तरूणाई तुम्हाला वाटतं तितकी बिघडली नाही राव!!!

दै. पुढारीमध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख
हल्लीची तरूणाई तुम्हाला वाटतं तितकी बिघडली नाही....
आजची तरुण पिढी ही दिशाहीन झाली आहे', असा जुन्या पिढीने तरुण पिढीच्या नावाने शंख करायचा हे अगदी पुर्वापार चालत आले आहे. ' आमच्या काळात अस होत बर का?' असे एका कोपऱ्यातुन आलेल्या वाक्यापुढे आजचे तरुण- तरुणी तर बोलणेच टाळतात. किंवा आपण एखाद्या ठिकाणाहून प्रवास करताना दोन ज्येष्ठ व्यक्तींच्या बोलण्यात आजची तरूण मुलं-मुलीहा साधा विषयंच जरी निघाला ना...तरी पुढची काय वाक्य असतील....हो तुम्हाला सांगायची गरज नाही....कारण ती वाक्ये तुम्हाला माहित आहेत काय ही आजची मुलं... कशी वागतात! आमच्या काळची मुलं कशी होती!... मोठ्यांचा किती आदर करायची...!‘‘ ही वाक्‍यं आता सारखीच कानावर पडतात. पण मला येथे एक सांगावसं वाटतंय की आजची तरूणाई तुम्हाला जितकी वाटते तितकी बिघडलेली नाहीत!

तरुण वर्गाविषयी विचार व त्यांना देण्यात येत असलेले महत्त्व सध्या वेगळ्या प्रकारचे आहे. समाजाचा विचार करताना वर्गानुसार, जातीनुसार गट पाडुन विश्लेषण केले जाते. वयानुसार समाजाची विभागणी करुन युवक हा वेगळा सामाजिक गट निर्माण करण्याची प्रवृत्ती नवीन आहे. त्याचप्रमाणे तरुण माणसांनाही आपण युवक म्हणुन कोणीतरी वेगळे आहोत, वेगळी सामाजिक जबाबदारी आपल्यावर आहे व समाज परिवर्तनाच्या कामात आपल्याला विशेष स्थान आहे, याची जाण आजच्या तरूणाईला आहे. सध्याच्या काळात माणूस अनुकरणप्रिय जरुर आहे, मात्र ब-याच वेळेस वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होताना आपल्याला दिसून होते. मात्र अशा वातावरणात एखाद्या चुकीच्या प्रथेमुळे माणूसकीला काळिमा
फासणार नाही ना? याची खबरदारी घेणे हे आजची तरुणाई अचूक मार्गाने करीतच असते. त्यामुळे आजच्या तरूणाईला नैतिक की अनैतिक यातील फरक तर नक्कीच कळतो. फेसबुक...! वेड लागलंय मुलांना त्या फेसबुकचं!  आजच्या काळातील मुलं-मुली नेटीझन्स झाली आहे”, असे बोलून ऑनलाईन शॉपींग करणाऱ्या या पोरांना पैसे कमविण्यासाठी किती घाम गाळावा लागतो, त्याची किंमत नाही कळणार, असा सुर काही घरातील पुरूष मंडळींकडून जास्त ऐकायला मिळतो. यावरही मला असे म्हणावेसे वाटते. जगात झालेल्या नव्या बदलांचा स्विकार करून आजची तरूणाई भलेही नेटीझन्स बनले असतील, मात्र इंटरनेटवरून ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेऊन आज मोठ-मोठ्या पदावर काम करणारी तरूण मंडळी का नाही दिसत तुम्हाला? तसेच ही तरूण मंडळी कितीही नेटीझन्स बनून तासनतास मोबाईलवर असणारे मदर्स डे व फादर्स डे च्या दिवशी न विसरता आपल्या आई-वडिलांसाठी छोटेसे गीफ्ट देऊन त्यांच्यासोबतची सेल्फी फेसबूकवर टाकायला ते कधी विसरत नाहीत. त्यामुळे तरूणाईच्या नेटीझन्समुळे
आई-वडीलांप्रती आदर आणि प्रेम त्यांनी कधी कमी होऊ दिला नाही.
तरूण आणि बदल यांचे नातं खूप खूप जवळचे आहे. म्हणूनच आजच्या तरूणांनी त्यांच्या जीवनशैलीतही बदल केले आहेत. या मुलींना घरच्यांनी अंगभर कपडेही दिले नाहीत का? असे टोमणे कितीतरी तरूण मुलींना ऐकावेच लागले असतील. काही दिवसांपुर्वी तर महिला आयोगाच्या सदस्या आशा मिरगे यांनी मुलींचे कपडे, देहबोलीच बलात्काराला जबाबदार असल्याचे वक्तव्य केलं होतं. फ्रेंड्‌स, मुलींचे कपडे हा इथे विषयच नाही. कारण, मुलींचे अंगप्रदर्शन करणारे कपडेच पुरुषांच्या नजरांना आव्हान देतात असे नाही. तसे असते तर, आजपर्यंत अशा वासनांध व्यक्तींच्या अत्याचाराला बळी पडलेल्या चार-पाच वर्षांच्या
मुलींपासून,तर ऐंशी वर्षांच्या आज्यांपर्यंतचा स्त्रीवर्ग का अंगप्रदर्शन करीत फिरत होता? नाही ना? आणि अनेकदा तर दुधाचे दातही सुकले नाहीत,अशा कोवळ्या लेकीबाळी नराधमांच्या अत्याचारांंच्या बळी ठरल्या आहेत, म्हणूनच फ्रेंड्‌स मुद्दा मुली कसे आणि कोणते कपडे घालतात हा नाहीच, तर विषय आहे
आजची गढूळलेली सामाजिक मानसिकता समजून घेण्याचा. हि मानसिकता आजची तरूणाई खूप उत्तरित्या समजून आहे आणि म्हणून दिल्लीतील निर्भया प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी देशातील हीच तरूणाई एकत्र आली होती. हे विसरून चालणार नाही.

आजच्या मुलांना काय ते फास्टफुड आवडतं खायला, मस्त भाजी-पोळी खायची...तंदुरूस्त रहायचं...अशीही काही नाके मुरडली जातात. परंतू मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय की, जी तरूण तंदुरुस्तपणाचे भान न ठेवता दिवस-रात्र एक करून मोठ्यातल्या मोठ्या आजारांच्या रूग्णांना बरे करणारे तरूण डॉक्टर्स का नाही लक्षात येत तुमच्या?

असं म्हणतात, की कुठलाही माणूस शंभर टक्के चांगला नाही. पण मी म्हणते, की कुठलाही माणूस शंभर टक्के वाईटदेखील नाही. तरूणांची तुम्ही चांगली बाजू बघावी. काही वाईट प्रवृत्तीच्या तरूणांमुळे संपूर्ण देशातील तरूणाई काही वाईट होत नाही. आजच्या समाजातही चांगली माणसं आहेत आणि ती जर नसती, तर आजचं जग चाललंच नसतं. शेवटी बदल हा आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा. काळाप्रमाणं बदललं पाहिजेच. शेवटी एवढंच सांगते, की आम्हालाही थोडं समजून घ्या. वाईटावर नेहमी चांगल्याचा विजय होतो. जर का या दोन पिढ्यांमधून तरूणांची उर्जा आणि ज्येष्ठांचा आशिर्वाद एकत्र आला की, हे जग खूप सुंदर
होईल.

Tuesday, 31 May 2016

हॅपी बर्थ डे संजय खापरे....

प्रिय संजय दा...
हॅपी बर्थ डे! तुझ्या वाढदिवसानिमित्त आज ‘सोशल मीडिया’वर शुभेच्छांचा भरभरून वर्षाव सुरू आहे. तुझा अभिनय किती प्रचंड प्रमाणात लोकांना भावला, हे त्यातून समजतं... तुझ्यावर भरभरून लिहिलं जातंय... तुझा सगळा प्रवास नव्यानं एकमेकांना सांगितला जातोय. त्याची उजळणी मी करणार नाही; पण तुझी फॅन असल्यानं आज वाढदिवसाचं निमित्त साधून माझ्यासारख्या अनेकांच्या तुझ्याकडून किती अपेक्षा आहेत, हे सांगणं मला आवश्यक वाटतं.

संजय दा...आजचे तरूण-तरूणी 'कळत नकळत' सारख्या सामाजिक बांधलिकीचे आणि संवेदनशील नाटक नाट्यगृहात जाऊन पाहू लागले आहेत, याच्या श्रेयाचे वाटेकरी अनेत असतील, पण त्यातील सिंहाचा वाटा तुझाही आहेच. 'कळत नकळत' नाटक बघितले नाही, असा तरूण अद्यापपर्यंत माझ्या पाहण्यात नाही....मराठी नाटकाला तू फ्रेशनेस दिला. ग्लॅमर दिलं. अभिनय व संवाद आणि त्यासोबतच भूमिकेत समरस झालेले तुझे ते चेहऱ्यावरचे हावभाव याची ताकद तू दाखवून दिलीस. आजकाल बॉलिवूडमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी मेकअप, सीनरी यांसारख्या विविध घटकांचा वापर केला जात असताना तू केवळ आपल्या बोलण्याच्या जादूने मराठी प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
‘कळत नकळत’मधला विश्वास जसा बोलण्याच्या जादूने रसिकाला तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडतोस, तसाच तु प्रेक्षकांनाही तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडतोस. संवाद फेकतेक्षणी तुझ्या चेहर्या वरील चढउतार कधीही कृत्रिम वाटत नाही. हा आणखी एक आठवलं...तु फक्त हिरोच्याच नाही तर व्हिलनच्या भूमिका केल्या आहेत ना...आठवतंय मला तो 'दगडी चाळ' मधला ‘चंदू उर्फ मामा’.... मनात खोलवर दाबून ठेवलेला राग काढतेवेळी चेहर्यावर येणारा संताप सहजरीत्या तुझ्या अभिनयातून पहावयास मिळते. बॉलीवूड-टॉलीवूडमध्ये एखाद्या व्हिलनची भूमिका उठविण्यासाठी काय काय ते टेक्नॉलॉजी वापरतात. पण तुझ्यातल्या त्या आवाजातला दरारा आणि डोळ्याद्वारे प्रदर्शित केलेले जिवंत भाव, तसेच दर्शकांच्या मनात होणारी कालवाकालव यामुळे तुला कधी अॅ्क्शन करण्याची गरजच पडली नाही. संपूर्ण चित्रपटभर तुझ्या संवादांचं गारुड, तुझा उत्स्फूर्त अभिनय, भारून टाकणारा वावर असल्यावर आणखी काही ‘ट्रिक’ वापरण्याची गरजच पडत नाही. ‘रेती’सारखा वेगळा विषय; पण या चित्रपटाचे बळच तुझा अभिनय होते. वाळूमाफियांच्या विरूद्ध आवाज उठविताना समाजसेवक बनून तुझ्या बोलण्यातील जी जादू पाहिजे ती संजय दा शिवाय दुसऱ्या कोणाकडे असणार? ’मर्डर मेस्त्री’ चित्रपटातील दारूड्या माजी सरपंच बनून ‘माधव मेस्त्री’ जो तु समोर आणलास त्यातून अनेक पुरूषांच्या मनातली गोष्ट तू समोर आणलीस. विनोदी अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अभिनयाची मोहर उमटविताना आज तू बहूरूपिया अभिनेता बनलास.

आता तर मी ऐकलंय की तु तुझ्या आगामी 'डिस्को सन्या' या चित्रपटातून एका कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नेहमीप्रमाणे हटक्या भूमिकेत एंट्री करणार आहेस. तुझा हा सगळा प्रवास ‘लय भारी’ वाटतं रे...'डिस्को सन्या' फिल्ममधून होणाऱ्या तुझ्या या नव्या एंट्रीमूळे आता आमच्या तुझ्याकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. आजपर्यंत ज्याप्रकारे तु स्वतःला विशीष्ट प्रकारच्या भूमिकेत अडकवून न ठेवता 'बहूरूपिया' कलाकार बनलास, त्याचप्रमाणे तु तुझ्या पुढील वाटचालीतही अशाच भन्नाट भूमिका घेऊन येशील आणि मराठी चित्रपट-नाट्यक्षेत्रात तुझ्या अभिनयाचा दबदबा आणखी वाढत जाईल, हीच एक अपेक्षा....आमच्या सगळ्या अपेक्षांचं ओझं तुझ्यावरच आहे. कदाचित तुझ्या नेहमीच्या ताकदीनं युक्तिवाद करशील. कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्री काही ठरवत नाही, तर त्याने काय करावे, हे दिग्दर्शक आणि निर्माता ठरवतो. त्याचे यशापयश प्रेक्षकांच्या मर्जीवर असते, असेही म्हणशील; पण तुझ्यात क्षमता आहे, अभिनयाची ताकद आहे, चित्रपट स्वत:च्या खांद्यावर पेलण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे तुझ्याकडूनच आशेचा किरण आहे. तूझ्या या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकेत आपली अभिनयाची ताकद दाखवून तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लाखो फॅन्सना दरवर्षी वाढदिवसाची अमूल्य भेट द्यावी. हे ‘गिफ्ट’ घेण्याचा रसिकांना निश्चितच अधिकार आहे! तुझ्या वाढदिवसाची हीच भेट हवी.

तुझी फॅन
प्रमिला पवार

Wednesday, 20 April 2016

डॉ. बाबासाहेबांना अपेक्षित महिला सुरक्षा, सद्यस्थिती आणि त्यावर उपाय

आजच्या घडीला एखादे वृत्तपत्र वाचायला घेतले तर त्यात महिलांवर अत्याचार,
अन्याय, बलात्कार झाल्याच्या बातम्या आपण पाहतो. दिल्ली आणि मुंबईतील
बलात्काराच्या घटनांनी तर विवेकी माणसांची सुद्धा बुद्धी भ्रष्ट झाली
होती. आज आपण खेडो-पाड्यात जर पाहीले तर अनेक घरांमध्ये स्त्रियांची
मानसिक व शारिरीक पिळवणूक होत असल्याचे चित्र समोर येईल. भारतातील जवळपास
७० टक्के महिलांवर त्यांच्या पतीकडून व कुटूंबियांकडूनच अत्याचार होत
असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात म्हटले आहे. ज्या भारतात
स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावे यासाठी आपल्या कायदेमंत्री पदाचा
राजीनामा देण्यासाठी सुद्धा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागचा
पुढचा विचार केला नाही, अशा भारतात त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर आज
स्त्रिया सुरक्षित नाहीत. याचे कारण काय? त्यावर उपाय कोणते?
‘स्त्रियांची असुरक्षितता’ यामागे कारणे आहेत ते म्हणजे देशात असलेली
गरिबी, अशिक्षीतपणा, स्त्रियांकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टीकोण,
स्त्रियांना त्यांच्या हक्काची जाणीव नसणे, पुरूषप्रधान संस्कृती आणि
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पारंपारिक विचारांचा पगडा. भारतीय संविधानाचे
शिल्पकार व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे सर्व पुर्वीच ओळखले
होते. स्त्रियांची प्रगती झाली तरच भारत देशाची खर्‍या अर्थाने प्रगती
होईल, हा विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मनुस्मृती’ आजाराने
ग्रस्त असलेल्या भारतीयांना निरोगी करण्यासाठी ‘हिंदु कोड बिल’ या
‘क्रांतीकारक’ औषधाची निर्मिती केली. अनिष्ट चालीरितींच्या ओझ्याखाली
दबल्या गेलेल्या प्रत्येक स्त्रियांना पुरूषांप्रमाणे समान संधी, दर्जा,
प्रतिष्ठा मिळावी व प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे याव्यात, हे स्वप्न
डॉ. आंबेडकरांनी पाहिले होते. पुर्वी महिलांनी बालपणी पित्याच्या,
तरूणपणी पतीच्या आणि म्हातारपणी पुत्राच्या अधिपत्याखाली आपले जीवन
व्यतीत करावे, असे ‘न स्त्रीयम् स्वातंत्र्यम् अर्हति’ म्हणजेच स्त्रीला
स्वातंत्र्य देता कामा नये, अशी परिस्थिती ‘मनुस्मृती’ने करून ठेवली
होती. दुबळी आर्थिक परिस्थिती, व्यसनी नवरा, अज्ञान, लहान वयातील विवाह
यासारख्या अमानुष पद्धतीने त्यांची विटंबना केली जात असे. पुरूषप्रधान
संस्कृतीचा पगडा असल्यामुळे त्याकाळी घटस्फोट हा पर्यायच उपलब्ध नसल्याने
पतीकडून होणार्‍या अत्याचार्‍याला निमुटपणे सहन करावे लागत असे.
मनुस्मृतीतील श्‍लोक क्रमांक ९-३ नुसार पतीला पत्नीची विक्री करण्याची
मुभा देण्यात आली असल्याने पैशांच्या आमिषापोटी सर्रास महिलांची विक्री
केली जात होती. यासर्व प्रथांमधून स्त्रियांना मुक्त करण्यासाठी डॉ.
आंबेडकर योद्धासारखे लढले. स्त्रियांवरील अत्याचार दूर करण्यासाठी व
त्यानंतर त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी स्त्रियांना वारसाहक्क,
पोटगी व घटस्फोटाचे अधिकार मिळवून दिले. परंतू आजही अनेक महिला या आपल्या
माहेरकडील नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी वारसाहक्कांचा वापर करीत नाहीत.
काही ठिकाणी तर मुलींचे लग्न लावताना तिला वडिलांच्या संपत्तीमधून एकही
हिस्सा नको, असा करार करून तिची सही घेतली जाते. त्यानंतर मुलीला
चोळी-बांगडी देऊन सासरी पाठविण्याचा पराक्रम केला जातो. बाबासाहेबांनी
लिहिलेल्या घटनेच्या कलम २५ नुसार धर्म स्वातंत्र्याचा व धार्मिक विधीत
सहभागी होण्याचा स्त्री-पुरुषांना समान अधिकार आहे. तरी आजही एखाद्या
महिलेने शनी मंदिराच्या चौथर्‍यावर जाऊन पूजा केली तर तो वादाचा विषय
ठरतो.
प्रत्येक स्त्री ही जेव्हा स्वतःचा हक्क मिळवून तिचे स्वरंक्षण करू शकेल,
तेव्हाच ती खर्‍या अर्थाने सक्षम होईल, हे ओळखूनच डॉ. आंबेडकरांनी
स्त्रियांना चूल-मुल या चौकटीबाहेर पडून सामाजिक स्तरावर विचार करण्यास
भाग पाडले. त्यासाठी महिलांना विविध क्षेत्रात आरक्षण प्राप्त करून
त्यांना विकासाची संधी निर्माण करून दिली. ९ मे १९९६ रोजी डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठात एक शोध निबंध जारी करून ‘भारतीय जात
व्यवस्था आणि स्त्रियांवरील बंधने’ याचा संबंध उलगडून दाखविला होता.
स्त्रियांवरील बंधने ज्यातून उगम पावतात ती जातीयव्यवस्था नष्ट होणे
गरजेचे होते. म्हणून जातीततच लग्न करण्याच्या पद्धती बंद व्हाव्यात
यासाठी डॉ. आंबेडकरांनी प्रयत्न फळाला नेले. परंतू महामानव डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर परिस्थीती बदलून गेली. आज अनेक
स्त्रिया बंधनयुक्त जीवन जगत असून त्या असुरक्षित आहेत, हे आजच्या अनेक
अमानवीय घटनांमधून दिसून येते. आंतरजातीय विवाह केला म्हणून एका पित्याने
आपल्या पोटच्या मुलीचा खून केल्याची घटना याची साक्ष देते. एव्हढेच नाही
तर विविध स्वराज्य संस्थेच्या स्थानिक पातळीवर जेव्हा एखादी महिला
उत्तमरीत्या कार्य करीत असताना स्थानिक नेत्यांकडुन त्यांना मानसिक त्रास
होत असल्याच्या वारंवार तक्रारी करूनही नेतृत्वाकडुन वाटाण्याच्या अक्षता
दाखविल्या जातात. यावरून पक्षात पुरूष नेत्यांचे व महिलांचे स्थान काय व
कसे याची सहज कल्पना येते. यावेळी सुध्दा पक्षातील सगळ्या महिला एकत्र
येऊ शकत नाही ही खेदाची बाब म्हणावी. त्या स्वतंत्र पणाने सुध्दा
गटातटाचे राजकारण करू शकत नाही, त्यामुळेच आपल्या पक्षातील महिलेवर होत
असलेला अन्याय त्या दुरून पाहातात. कारण त्यांचे राजकीय हितसंबंध त्यांना
जपायचे असतात. महिलांना राजकारण कळत नाही असे म्हणण्याचाही एक काळ होता.
पण तोही आता मागे पडला आहे. पण तरीही दुर्देवाने पक्ष संघटन पातळीवर व
प्रत्यक्षात मुख्य प्रवाहातील त्यांचे स्थान यांच्यातील कमालीची तफावत
भरून निघताना दिसत नाही हे खेदाने म्हणावे लागत आहे.
‘मुलगी म्हणजे दावनीला बांधलेली गाय, जिथे न्याल तेथे जाय’, अशा म्हणी व
वाक्यप्रचारांच्या पगड्यात अडकलेल्या व बुरसटलेल्या समाजात सुधारणा
व्हावी यासाठी डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांना ‘भारतीय संविधान’ हे शस्त्र
दिले आहे. आता फक्त कमी आहे ते या कायद्यांची अंमलबजावणी करणार्‍या
जाणकार नागरिकांची. महिलांना संरक्षण मिळावे यासाठी डॉ. आंबेडकरांनी अनेक
तरतुदी तर करून ठेवल्या आहेत, पण त्यासोबतच काही उपाययोजना या व्यक्तीगत
व कुटूंबपातळीवर सुरू करणे गरजेचे आहे. पुरूष कार्यकर्ता महिलेला सोबत
घेऊन आल्याशिवाय त्याला कार्यक्रमात प्रवेश दिला जाणार नाही, असा नियमच
डॉ. आंबेडकरांनी पक्ष संघटनेसाठी केला होता. आजच्या घडीला त्याचे कडक
पालन होणे गरजेचे आहे. प्रत्येक घरा-घरात मुलाला एक भावी सुजाण नागरिक
म्हणून घडवून स्त्रियांना सन्माने वागवले पाहीजे, हा विचार त्यांच्या
मनात बिंबविणे गरजेचे आहे. तसेच संसदेेत कार्य करणार्‍या महिला
प्रतिनिधींनी महिलांच्या अनेक समस्या व प्रश्‍नांना प्राधान्य दिले तर
स्त्रियांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागतील. प्रत्येक महिलेला
वारसाहक्क मिळावा यासाठी विवाह करतेवेळीच वारसाहक्काचा करार करणे
अनिवार्य केले पाहीजे, जेणेकरून मुलींना त्यांचा वारसाहक्क सहज व विना
हरकत मिळु शकेल. आज अनेक पिडीत महिला पोलिस स्टेशनची पायरी चढण्यासाठी
घाबरताना दिसून येतात. तक्रार केल्यानंतर त्यांना विचारण्यात येणारी
उलट-सुलट प्रश्‍न, पोलिस स्टेशनमधील फेर्‍या आणि समाज काय म्हणेल याचा
विचार करून त्या अन्याय अत्याचार सहन करीत असतात. यासाठी महिलांच्या मनात
असलेली कायदेविषयक भिती दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवर महिला व पोलिस
अधिकारी यांच्यातील सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. त्यांचे
हक्क व कायद्यांची त्यांना माहिती देण्यात यावी. प्रत्येक महिला ही
दिवसाप्रमाणे रात्रीच्या वेळी देखील सुरक्षित प्रवास करून शकेल यासाठी
योग्य व्यवस्था करून चौका-चौकात एक तरी पोलिस अधिकार्‍याची नियुक्ती
करण्यात यावी. बलात्काराच्या तरतुदीबाबत सध्या तरी देशात व खास करून
भारतीय स्त्रियांमध्ये वातावरण पेटले आहे. बलात्कारप्रकरणी आरोपीला कठोर
शिक्षा व्हावी व त्या तरतुदींमध्ये योग्य ते बदल करावेत, याबद्दल
तिळमात्र शंका नाही. परंतू बलात्काराने स्त्री ही कधीच भ्रष्ट होत नाही,
हा संकल्प सर्व भारतीय स्त्रियांनी व समाजाने करणे गरजेचे आहे. तेव्हाच
अन्यायाविरूद्ध तक्रार करण्यास स्त्रिया पुढे सरसावतील.
आणखी एक गोष्ट म्हणजे भारतात प्रत्येक स्त्रीला सन्मान मिळावा, यासाठी
डॉ. बाबासाहेबांनी वेळोवेळी स्त्री आधी ‘माणूस’ आहे हा विचार समाजामध्ये
बिंबवून स्त्रियांना अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी प्रोत्साहीत केले. त्याच
भारतात आज स्त्रीया गर्भातही सुरक्षित नाहीत. ‘मुली म्हणजे डोक्याला ताप’
ही मानसिकता समाजातून नष्ट केली पाहीजे. हुंड्यासाठी होणारा छळ, ठराविक
काळात मुलीची घ्यावी लागणारी काळजी या आगामी काळात होणार्‍या त्रासाला
घाबरण्याबरोबरच आणखी कारणांमुळे लोक मुलीला जन्माला घालण्याचे टाळत आहेत.
मुलगी हे परक्याचे धन आहे. तिच्या वाढवण्यावर, शिक्षणावर होणारा खर्च
वायफळ जाणार आहे. ही एक मानसिकता प्रत्येकाने बदलली पाहीजे. स्त्री भ्रूण
हत्या करणार्‍या पालकांना सामाजिक संस्थांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन
त्यांना योग्य तो धडा शिकवला पाहीजे. गरीब घरातील मुलींच्या शिक्षणाची
जबाबदारी अशा संस्थांनी घेतली तर या प्रकाराला बर्‍याच प्रमाणात आळा
बसेल. स्त्रीला स्त्री म्हणून वेगळी वागणूक देणं समाजाकडून आणि खुद्द
स्त्रीकडूनही अपेक्षित का केलं जातं? तिला ‘माणूस’ म्हणून वागणूक
मिळाल्यानंतर पुढची पायरी ‘स्त्री’ म्हणून मिळणार्‍या ‘सन्मानाची’ येते.
त्या पायरीवर स्त्रियांनाही ‘स्त्रीत्वा’ची जाणीव होते आणि मग अस्मितेचा,
स्वत्वाचा, स्वतंत्रतेचा विचार होतो.
आज एकतर्फी प्रेमातून तरूणींच्या हत्या झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात
घडतात. या हिंसेचा ब्राम्हणी पितृसत्ताक आणि जातीव्यवस्थेशी असणारा संबंध
काय आहे हे विश्‍लेषण योग्य रितीने करणे गरजेचे आहे. ‘स्त्रियांची
सुरक्षितता’ यावर एक अगदी वेगळा उपाय सुचतोय तो मी आपल्यापुढे मांडतेय.
अर्थात हा उपाय अगदी प्राथमिक स्तरावरचा असून यावर समाजात चर्चा घडून
येणे आवश्यक आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी देशातील ‘तृतीयपंथी’ लोकांचा
विचार का केला जाऊ नये ? असा विचार मला मांडावासा वाटतोय. पुरुषांचा देह
व शारिरीक ताकद धरणार्‍या या व्यक्ती मनाने स्त्रीच असतात व आपल्या
ताकदीचा व भीतीदायक दिसण्याचा उपयोग ते इतर स्त्रियांच्या रक्षणासाठी सहज
करू शकतात. अर्थात, त्यासाठी योग्य ते नियम व कायदे तयार करणे गरजेचे
राहील. याचा फायदा स्त्रियांना तर होईलच, परंतु समाजाच्या एका दुर्लक्षित
घटकाला मुख्य प्रवाहात आणल्याचे कार्यही होईल. खर्‍या ‘थर्ड जेंडर’ना
मानाने रोजगारही मिळेल. त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन व ‘महिला
सुरक्षा रक्षक’ अशी ओळख देऊन मुंबईसारख्या महानगरातील लोकल ट्रेनमध्ये
पुरुष पोलिसांपेक्षा त्यांना नेमल्यास ते आनंदाने व जबाबदारीने नोकरी
करतील. शेवटी एकच डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांना अन्यायाविरोधात
लढण्यासाठीचा मार्ग भारतीय संविधानातून दाखविला आहेच. आता फक्त गरज आहे
सर्व महिलांनी शिक्षीत होऊन संघटीतपणे लढा देण्याची....