My Blog List

Saturday, 20 February 2016

मांजर आडवी गेल्याने खरंच अपशकून होतो का???

मित्र- मैत्रीणीनो.... तुमच्या सहकार्यामुळे आणि शुभेच्छामुळे आज माझ्या नविन प्रोजेक्टच्या कार्याच्या शुभारंभाचा नारळ फुटला... आणि हे प्रोजेक्ट यशस्वी करायचेच हा निर्धारही मी मनाशी पक्का केलाय. याच प्रोजेक्ट संदर्भात आज एक मिटींग करण्यासाठी सकाळी सकाळी मोठ्या आत्मविश्वासाने घराबाहेर पडले.......

आमच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन जात असताना अचानक मी जात असलेल्या रस्त्याहूनच एक काळी मांजर आडवी गेली... काळी मांजर आडवी जाते न जाते तोच माझे पाउल देखील मांजरीने कापलेल्या रस्त्याच्या पुढे निघून गेले .. माझ्या मनात आलं.... माझ्या मागेही भरपूर जण होते... काय मी त्या ठिकाणी थांबवून अगोदर त्यांना पूढे जाऊ द्यायला पाहिजे होतं...! खरंतर तितका वेळ कुणाजवळ होता...!! मीटिंग होती सकाळी १० वाजता आणि मला अर्ध्या तासात त्या ठिकाणी पोहोचायचे होते. मीटिंगची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली होती... मीटिंगच्या वेळेचा माझ्या मनगटी घड्याळातच काऊंटडाऊन (उलटी गणती) सुरू झालेली होती... आणि माझ्या डोक्यात एक भलताच विचार भ्रमण करू लागला... आणि तो स्वाभाविकही होता... काय हा अपशकून समजायचा? काय आता माझी महत्वाची मीटिंग अटेंड करायला नाही जमणार का... .!!!

अगदी बालवयापासून आपल्या घरातूनच आपल्यावर काही बरे-वाईट संस्कार केलेले असतात... आणि त्यातलंच एक म्हणजे--> जर आपल्या रस्त्याने मांजर आडवी गेली तर तिथेच थांबून आधी दुस-या कुणालातरी तिथून पुढे जाऊ द्यायचं आणि मगच स्वत: त्या रस्त्याने जायचं... पण का? तर अपशकून होतं... आणि मग आपल्याआधी कुणी गेलं तर त्याला?? त्याला काही नाही होत... कारण त्याने मांजरीला पाहिलेलं नसतं... आणि या मांजरीला रस्ता ओलांडताना तर मीच चक्क पाहिलेल होतं... किंबहुना सर्वात पुढे मी असल्याने तीने माझाच रस्ता ओलांडला होता... मग हा अपशकून समजायचा का???

तर पहिली गोष्ट मी तर असल्या समजूतीना मानतच नाही व अंधश्रद्धांवर विश्वासही ठेवत नाही.... तरी काही ना काही प्रमाणात बालवयातच ठसलेल्या असल्या काही गैरसमजूतींचा थोडाफार का होईना पण प्रभाव माझ्या मस्तिष्कावरही होताच... पण मग या मांजरीचा विचार सोडून जे होईल ते पाहू असा विचार करून हा किस्साच विसरले.... आणि एकदाची माझी मीटिंग सुरू झाली....

मिटिंग सुरू होण्यापूर्वीही माझ्या दृष्टीने एक चांगलीच बाब घडली.. ज्यांच्या सोबत मिटिंग होती ते स्वभावाने खुप चांगले आणि समजुतदार होते. आणि मुळात त्याना देखील ऑफीसला येण्यासाठी उशीर झाला होता. मी त्यांच्या अगोदर येउन पोहोचली. आता आपल्या माहितीसाठी सांगते कि आजची मिटिंग बिघडण्याऐवजी उलट यशस्वी झाली. शिवाय मिटिंग संपल्यानंतर त्यांच्या ऑफीस वरुन परत येताना देखील कोणतीच अनपेक्षित घटना घडली नाही... आणि घडली असती तरी तिचा संबंध त्या मांजरीच्या रस्ता ओलांडण्याशी लावता आला नसता...

आता मला एकच गोष्ट विचाराविसी वाटते कि-- शुभकार्यास जात असताना कुणाची प्रेतयात्रा मिळाल्यास अथवा मांजर आडवी गेल्यास अशुभ मानलं जातं... मांजर रस्ता ओलांडणार नाही तर कशाने जाणार..? आणि शहरांमध्ये पाळलेली व खेड्यांमध्ये राहणारी मांजर घरातील सदस्यांपुढून कित्येक वेळा जाते तर अपशकून होत नाही. किंवा कुणाचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमीकडून जाणा-या रस्त्याने प्रवास केल्यास प्रेतयात्रा वा अंत्यसंस्कार दिसणार नाही तर ते कुठे जाणार?? मग सत्कर्मी जाताना मांजर आडवी गेल्यास वा प्रेतयात्रा दिसल्यास अपशकून होणं कसं काय शक्य आहे? आणि जर एखादी अनुचित घडना घडलीच तर त्याचा एकच अर्थ म्हणजे तो केवळ एक योगायोग आहे... कारण यावरून एकच गोष्ट निष्पन्न होते ती म्हणजे मांजर व प्रेतयात्रेमुळे अपशकून होत नसून हा केवळ मानवाच्या मन व मस्तिष्कात बालपणापासून भरण्यात आलेला भ्रम व यावर विश्वास म्हणजे केवळ अंधश्रद्धा आहे

बंध रेशमाचे......

तुमच्या आयुष्यातील ‘ती’ महत्वाची व्यक्ती जिच्यावर तुमचे जीवापाड प्रेम आहे...तिच्यावर प्रेम व्यक्त करण्याचा प्रेमाचा दिवस अर्थात व्हॅलेंटाइन डे! अशा या स्पेशल व्यक्तीसाठी तुमच्या मनात ‘साथ ही तुझी’ असावी अशाच भावना असतात. व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे ‘ती’चं आणि ‘त्या’चं एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस, अशी सर्वसाधारण धारणा आहे. मात्र याच कल्पनेला छेद देत आपल्या भवती असलेल्या अनेकांच्या अनोख्या कहाण्या प्रकाशित झाल्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल ‘बंध रेशमाचे’ या सदरमध्ये..... 

Sunday, 14 February 2016

जातीत गुंडाळलेले तरुणाईचे प्रेम....

मित्रानो..... आज व्हॅलेंटाईन डे.... यानिमित्ताने एक खरी खुरी प्रेम कहाणी.....नक्की वाचा......

एक मुलगी होती साधी सरळ....थोडीसी खट्याळ....नेहमी स्वप्नांच्या दुनियेत रंगलेली....आणि
एक मुलगा होता स्वाभिमानी हुशार नेहमी आपल्या माणसांचा विचार करणारा.... अशीच दोघांची एकदा ओळख झाली.....आणि त्यांची छान मैत्री झाली....
त्यातूनच त्याचं फोन call आणि sms चालू झाले.... ती मुलगी रोज त्या मुलाला फोन आणि sms करायची.... जर ती त्याला एक दिवस जरी फोन किंवा sms नाही केला तर तो तिच्यावर रागवायचा..... तिला विचारायचा ..... "का ग काल तू फोन नाही केला,मी वाट पाहत होतो तुझ्या फोनची ".
ती त्याला म्हणायची कि, " नाही sorry काल नाही जमल फोन करायला "....
तिच्या ह्या उत्तरावर तो समाधानी नसायचा....त्यातूनच तो तिला साधपण दाखवायचा... रोज त्यांचे फोन आणि sms चालू राहिले...त्या मुलीला त्याच्याशिवाय करमत नसे...तिने किती हि ठरवलं कि आपण त्याला जास्त sms नाही करायचं...
तरी हि त्याला sms केल्याशिवाय तिला
करमत नसे...
ती त्याला sms करायची......त्याचं बोलन वाढू लागल होत....ती एकटी असली कि त्याचाच विचारात गुंतायची...किती हि ठरवलं कि नाही त्याचा विचार करायचा तर हि .... ती अधिका - अधिक त्याच्यात गुंतत जात होती....कारण ती त्याच्या प्रेमात पडली आहे हे तीच तिलाच कळल नाही...........
त्याच्या विचारात असताना त्याचे बोलण आठवून स्वतःशीच एकटी हसायची....गाण गुणगुणत बसायची.
" पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले "
आता तिला त्याची सवय झाली होती....सतत त्याच्याशी बोलावस वाटायचं... आणि तिला त्याच्यशी बोलल्याशिवाय राहवत नसे....त्याच्या
आवाजात ती आनंदी व्हायची....
हळू हळू ती त्याच मन हि ओळखू लागली होती.... त्याच मूड कसा आहे ?.. का आहे ?
ह्या गोष्टीचा त्याला आश्चर्य वाटत होते.
तो तिला विचारायचा..."अगं तुला कस कळल कि माझ मूड खराब आहे ते...?."
ती त्याला म्हणायची "मैत्री केली आहे....
थोड फार तरी कळू शकत ".. अशाने ती त्याच्यात आणखी गुंतू लागली...त्याच्याशिवाय तिच्या मनात कोणी नसे....
त्या दोघांची एक वेगळीच दुनिया होती आणि अखेर या प्रेमाला लग्नात रुपांतर करण्याचा विचार करण्याची योग्य वेळ आली. त्याने लग्नांतरच्या सर्व जबाबदार्या पेलण्याची तयारी केली होती. चांगला जॉब मिळविला एक्स्ट्रा सेविंग जमा केली होती. जर हे सगळ केल नसत तर तिच्या घरच्यानी तिचा हात त्याच्या हातात नसता दिला ना... ती ही शिक्षण पुर्ण करुन तिचे करियर सुरु केले होते. तीने तिच्या आयुष्यात खुप पुढे जावे अशी त्याची इछा असते. आणि ती ही त्याच्यासाठी करियर घडवु लागते. ती जातीने महार आणि तो जातीने चांभार... तिच्या घरात देव ही संकल्पनाच नव्हती तर त्याच्या घरात काही गुड न्युज आली तर ते देवाच्या कृपेने च मानले जात. घरी सांगयच कस की जो मुलगा मला आवडतो तो चांभार जातीचा आहे... आणि तो कस सांगणार की त्याला जी मुलगी आवडते ती आपल्या जातीबाहेरची आहे. तिला ही तिच्या घरच्याना दुखवायचे नसते आणि त्यालाही.... पण ते एकमेकांशिवाय ही राहु शकत नव्हते. त्यांचा या अडचणीत आणखी एका अडचणीला सामोरे जावे लागते. अचानक तो त्याच्या गावी शिफ्ट होतो. तिला सांगितल तर ति पुर्णपणे तुटुन जाईल या विचाराने तिला काहीच न सांगता तो गावी निघुन जातो. मन मात्र तिच्या विचारानेच चिंतेत असते.
दुसर्या दिवशी ती त्याला दररोजच्या प्रमाणे कॉल करते... पहिला कॉल उचलला जात नाही. कामात असेल असा विचार करुन ती काही वेळाने कॉल करते. पण तेव्हाही कॉल उचलला जात नाही. थोडी निराश होत रात्रीची वाट पाहते. रात्री कॉल केल्यानंतर देखील कॉल उचलला जात नाही. यावेळी मात्र तीची चल विचल होते. तिच्या मनात अनेक प्रश्न घर करुन बसलेले असतात. तिचा कॉल उचलल्या नंतर आपण गावी कायमचे रहायला आलो आहोत.. आता आपल्याला पहिल्यासारख भेटता येणार नाही हे सांगता येणार नाही म्हणुन त्याने तिचे कॉलही उचलले नव्हते. त्यालाही बरच काही बोलायच असत... पण कस? पुढे ती अनेक महिने त्याला लागोपाठ कॉल करत राहिली. पण एकही कॉल उचलला नाही. काय झालय हे ही तिला कळेना. मग ती तिच्या मित्राना फोनाफोनी करुन विचारपुस करु लागते. मग तिला कळत की तो तर अनेक महिन्यापुर्वीच गावी शिफ्ट झाला.
हे ऐकुन पायाखालची जमीनच सरकते ती स्तब्ध होते.....
एका आडोश्याला होताना तिच्या पायात काच रुतली... पायातून रक्त वाहत होत तिला माहितच पडल नाही... ती तशी स्तब्ध बसत.. तेवढ्यात तिचे frnds आणि आई शोधात येतात... तिच्या पायाला पाहून तिची आई ओरडते "अग पायात काच गेली आहे आणि तुझ लक्ष कुठेय?
"आई मग पायातून काच काढते
पण तीच हृदय त्या काचे प्रमाणेच तुटल होत. तशीच जाऊन ती समुद्रात बसते. कोणाला डोळ्यातले अश्रू दिसू नये म्हणून त्या पाण्यात भिजून आपले अश्रू लपविते
त्या रात्री तिला झोप लागली नाही...
नंतर एक वर्षानंतर एके  दिवशी ती त्याला call करते ...एक वर्षानी तिचा आलेला फोन पाहुन आता त्यालाही रहावत नाही. डोळ्यातले अश्रू गिळून ती त्याला बोलते....कसा आहेस? कारण तिलाही माहीत होत इतके वर्ष लांब राहुन तो ही एकटा पडलेला असणार. इतक्या वर्षाच्या दुराव्या नंतरही चेहर्यावरचे हाव भाव न पाहताही ते एकमेकांचे मन ओळखु शकत होते. तिचा प्रश्न ऐकुन त्याचे ही डोळे पाणावले होते. परंतु ते तिला कळु द्यायच नव्हत. तो म्हणाला, ठीक आहे. आणि पुढचे काही मिनिटांचा संवाद हा काही एक शब्द न बोलता हार्ट टु हार्ट कम्युनिकेशन होते. काय तक्रार करावी ते तिला कळत नव्हत.... काय बाजु मांडावी हे त्याला कळत नव्हत... परंतु दोघानाही सगळ काही न बोलताच समजल होत. ती म्हणाली, आपण आपली मैत्री तर ठेउ शकतो ना? त्याच्याकडे उत्तर नव्हत. तो म्हणाला जात खुप वाईट आहे ग. हा समाज आपल्याला एकत्र नाही राहु देणार. योगा योगाने त्या दोघांच गाव ही एकच होत. आपल्या घरचे नाही करु देणार आपल्याला लग्न...तो ही हरला होता समाजापुढे.... तिनेही याचा स्विकार केला. परंतु मैत्री मात्र त्यानी कधी मरु दिली नाही. त्यानंतर ते दोघे आपआपल्या आयुष्यात रमु लागले. आणि एक दिवस असा आला की दोघांच्या पायाखालची जमिनच सरकली. तिचे हॉस्पिटलमध्ये फेऱ्या सुरु झाल्या. तिला अनेक महिन्यापासुन ताप येत होता. परंतु तिने साधा ताप समजुन दुर्लक्ष केल होत. आणि तापाचे प्रमाण वाढु लागल्याने डॉक्टरकडे उपचारासाठीगेली. डॉक्टरानी तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे सांगितले होते. ती त्याच्या दुराव्याने आधीच तुटलेली होती. पण त्यानंतर ती मनाने आणखीच खचली होती. हे त्याला कळाले आणि त्याच्या ओठातुन शब्दच फुटत नव्हते. आता तिचे त्याला जाणारे कॉल कमी झाले होते आणि हॉस्पिटलच्या फेर्यावर फेर्या वाढु लागल्या. तिला तिच्या या संघर्षात त्याची साथ हवी होती. परंतु बहुतेक गेल्या अनेक वर्षांचा दुरावा झळकु लागला होता. तो त्याच्या आयुष्यात आता इतका बिझी झालेला असतो की तिच ऑपरेशन कधी आहे हे जाणुन घेण्याची देखील उत्सुकता राहीलेली नसते. तिच ऑपरेशन यशस्वी होउन ती आजारातुन बाहेर पडलेली असते. अनेक महिन्यानी ति त्याला कॉल करते आणि पुन्हा प्रश्न विचारते, कसा आहेस? त्याच उत्तर मिळत, तु कशी आहेस? ति म्हणाली, मी ठीक आहे. तो बोलायला लागतो...... अडखळत अडखळत म्हणतो.... तुझ्या उपचारादरम्यान जर मी तुझ्या सोबत असतो तर पुढे कायम माझी साथ लागली असती. ती म्हणाली, तुझे हे स्पष्टीकरण नसते दिले तरी मला ते कळाले असते. दोघानच्याही या अबोल प्रेमामध्ये जात नावाची भिंत येत होती. अखेर या दोघानी समाज आणि घरच्यांचा विरोधासमोर हार मानली .दोघेही आपआपल्या आयुष्यात व्यस्त होउन एकमेकाना विसरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आंतरजातीय लग्नच कशाला, प्रेमविवाह असा शब्द जरी उच्चारला तरी अजूनही आपल्याकडे अनेक घरात वादळ घोंघावायलाच लागतं. शिक्षण-नोकरीच्या निमित्तानं तरुण मुलंमुली एकत्र येतात. त्यांच्या आवडीनिवडी जुळतात, विचार जुळतात आणि मग ते प्रेमात पडतात किंवा लग्न करण्याचा निर्णय तरी घेतात. आपण एकमेकांना अनुरूप आहोत, परस्परांसोबत आयुष्य जगायला आवडेल असं जेव्हा त्यांना वाटतं तेव्हा परस्परांची जात-धर्म हे मुद्दे त्यांच्यादृष्टीनं गौण ठरतात किंवा हे मुद्दे त्यावेळी त्यांच्या मनातही येत नाही.
आपला निर्णय घरी सांगायचा असं जेव्हा ते ठरवतात, तेव्हा खरे प्रश्न निर्माण होतात. अनेकदा तर घरचे मुलांचं म्हणणं, निर्णय, भावनिक अवस्था हे सारं शांतपणे ऐकूनही घेतात आणि मग त्यांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारत, ‘जात कोणती?’ या जातीच्या विळख्यात गुंडाळल्याने आजच्या तरुणाईला आपले प्रेम मिळत नाही. आज इंजिनियर, डॉक्टर, आर्टीस्ट, टेक्नीशीयन आदि व्यवसाय स्विकारणारे तरुण जातीमधुन बाहेर कधी पडणार? 

Thursday, 31 December 2015

'पुरस्कार'मय वाटचाल २०१५ ची.....

नवीन वर्ष नवीन सुरुवात... ३६५ पानांची नवीन वही परत एकदा उघडुन श्रीगणेशा करायचा... नवीन रस्ते नवीन वाटा काबीज करत नवनवीन ध्येये गाठायची... दर वर्षीच हे होते .... १ जानेवारीला नवीन वर्षाचे स्वागत करुन या वर्षी काहीतरी वेगळे करायचे हे ठरवतो व काही so called resolutions सुद्धा करतो...

वर्षे जातात अन् येतात... काळ काही थांबत नाही... शेवटचा दिवस आला की मग वर्ष भराचा हिशोब लावायला सुरुवात होते... जुनी आणि जीवाभावाची नाती तुटतात.. त्याची उणीव पुर्ण करण्यास नवीन नाती आयुष्यात येतात..जुने ते सोनंच असते असे बरेच वेळेस वाटते.... नवीन नात्यात आपण जुना गोडवा शोधण्यास जातो आणि काही वेळेस मृगजळच हाती लागते... पण म्हणुन काही आयुष्य थांबत नाही... आणि वेळही नाही... ते तसेच चालु रहाते, किंवा राहु द्यावे लागते... नवीन गोष्टीच्या स्वागतासाठी व नवीन सुखाच्या शोधासाठी...

तसे माझ्याबाबतीतही झाले... २०१५ ने मलाही असे बरेच काही दिले...मागच्या वर्षभरात खुप काही घडले... खुप नवीन ठिकाणे फिरले ...बरेच नवीन मित्र मिळाले तर काही जुने दुर गेले... नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या आणि काही राहूनच गेल्या...

पत्रकारिता क्षेत्र हे काय आहे हेच माहिती नसणारी आज मी पत्रकारिता क्षेत्रात इतकी रुळले की २०१५ ने मला खुप सर्प्राइझ दिले.... आदर्श महिला पत्रकार पुरस्काराने.... माझ्या आयुष्यातला हा पहिलाच पुरस्कार होता. पण माझ्या तब्बेतीने साथ दिली नाही आणि त्या पुरस्कार सोहळ्यात प्रत्यक्ष जाऊन पुरस्कार स्विकारणे जमले नाही. एक महिना केईएम हॉस्पिटलमध्ये घालविल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केली आणि त्यावेळी ठरवलेच होते...आयुष्यातील पहिला पुरस्कार प्रत्यक्ष स्विकारणे जमले नाही म्हणून काय झाल? हा काही शेवटचा पुरस्कार नाही. २०१५ हे वर्ष माझ्यासाठी पुरस्काराचे वर्ष ठरले अस म्हटले तरी चालेल....नुकताच नवनिर्मिती फाउंडेशन तर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कार देणार्यांचा उद्देश जरी चांगला असला तरी माझ्या सारख्या अनुभवाने आणि वयाने लहान असणाऱ्या मुलीला जीवनगौरव पुरस्कार हे गणित मला पटले नाही आणि मी त्या पुरस्कारासाठी नकार दिला. माझ्या मतांचा मान राखून अखेर त्यांनी मला जीवनगौरव पुरस्कारा ऐवजी आदर्श महिला पत्रकार पुरस्कार २०१५ जाहीर केला.
वर्षाची सुरुवात एकदम छान एक अविनाशी झेप मासिकाच्या प्रकाशनाने झाली..was one of the best days of life... खुप सारी स्वप्ने पुर्ण झाली... २०१५ च्या प्रवासात कविवर्य अशोक बागवे, पहिल्या महिला Brandguru जान्हवी राऊळ यासारख्या अनेक मान्यवरांसोबत प्लॅटफॉर्म शेअर करण्याची संधी मिळाली. अनेकानी कौतुकही केले ..... सर्वांच्या कौतुकात एकच वाक्य .... लहान वयात खुप मोठी झेप घेतली आहे... पण मला अस वाटत झेप घेण्यासाठी फक्त उडण्याची जिद्द हवी.... बाकी नंतर तर आकाश ही आपल्याला मिठीत घेते.... २०१५ ने जशा चांगल्या गोष्टींचे सर्प्राइझ दिले तसे अनेक वाईट घटनांचे देखील सर्प्राइझ दिले. तर काही इच्छा अधुर्‍याच राहील्या...

नवीन वर्षात ह्याच अधुर्‍या गोष्टी पुर्ण करायच्या आहेत.. नवीन मित्र मिळवायचे आहेत.. नवनवीन ठिकाणे explore करायची आहेत..आजपर्यंत तुम्हा सर्व मित्र आणि मैत्रीणींच्या प्रेमामुळे आणि सहकार्याने नव्या वर्षाची सुरुवात आणखी एका नव्या उपक्रमाने करणार आहे. हा उपक्रम लवकरच मी आपणासमोर आणणार आहे. ज्याप्रमाणे २०१५ या वर्षात तुम्ही सर्वानी मला फेसबूकच्या माध्यमातून माझ्यावर प्रेम करत आला आहात त्याचप्रमाणे येणार्या २०१६ वर्षात त्यापेक्षा जास्त प्रेम कराल हीच एक अपेक्षा....
तुमचेही असेच काहीतरी ठरले असेल नं.. तेव्हा त्यासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा...हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना समाधानाचे, सुखसमृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच ईश्वराचरणी प्रार्थना....
हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवा...
pramilamhane.blogspot.com

Sunday, 20 December 2015

वाहनांच्या मागे लिहिलेल्या पाट्या आणि वाहनचालक.....

अनेकदा आपण प्रवास करताना वाहनांच्यामागे लिहिलेल्या पाट्या वाचण्यात येतात. यातील काही विनोदी असतात तर काही वाक्य हे प्रवासातील आनंद देणारे असतात.... तर काही वाक्यांतुन आयुष्याची उकल दिसुन येते. पण जे जे वाक्य ज्या ज्या वाहनावर लिहिले त्यानुसार त्या त्या वाहनचालकाचे निरीक्षण कधी केलय का?.... 

जर एखाद्या वाहनावर लिहिले असेल की, 
बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने! तो वाहनचालक हमखास गाडी चालविताना ओव्हरटेक करेलचआणि ओव्हरटेक केल्यानंतर मागच्या वाहनचालकाने जास्त नखरे केले तर आहेच मागची पाटी 'ओव्हरटेक केलय वाघाने' आता मागचा वाहनचालक वाघापुढे काय गुरगुरणार? 
साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस....असे वाक्य जरी एखाद्या वाहनचालकाने त्याच्या गाडीवर लिहिले असले तरीही मध्येच रस्त्यावर एखादा अपघात झालेला पाहुन त्याठिकाणाहुन हळूहळू गाडी चालवित तो अपघात पाहुनच तो पुढे जाईल.... पण जखमीला मदत करण्याची रिस्क तो घेणार नाही... 
अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही, असे वाक्य लिहिलेला वाहनचालक नक्कीच सिग्नल मध्ये उभा असुन सुध्दा लागोपाठ हॉर्न वाजवताना दिसेल....
सासरेबुवांची कृपा..... असे ज्या गाडीवार लिहिले असेल ते वाचून त्या गाडीच्या वाहनचालकाने नक्कीच श्रीमंत घरची बायको केली असणार किंवा ती गाडी त्याला हुंड्यात मिळाली असणार.... असा विचार तुमच्या डोक्यात येतोच ना....
तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं..माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा.....आणि जर तोच वाहनचालक स्पीड ब्रेकरवरुन दणादण गाडी आपटून जात असेल तर ..... आतली माणसे किती लाख मोलाची असतात याचा अंदाज येतोच की.... 
भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"....... हे वाक्य वाचुन मागचा वाहनचालक बिचारा घाबरतो आणि त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.... पुढे जाणाऱ्या गाडीवर लिहिलेल असत.... तुमचे लक्ष आमच्याकडे का?
बाकी पुण्यातील दुचाकी स्वार हे म्हणजे अजब प्रकरण आहे. एरवी ऑफिसात वगैरे अगदी नम्रपणे वागणाऱ्या व्यक्ती सुद्धा जेव्हा दुचाकीवर स्वार होतात तेव्हा त्यांच्या अंगात काय वारं संचारतं कोण जाणे! बहुतेक दुचाकीच्या वेगाने ह्यांच्या पार डोक्यात वारं घुसत असावं. कारण हेल्मेट वगैरे घालणं हे भ्याडपणाचं लक्षण समजलं जातं ना! 
रिक्षामध्ये जीव केवढासा, पण शेजारून जाणाऱ्या सुमोशी वेगाची स्पर्धा करतील. अचाट आत्मविश्वास! आणि ह्यांची खासियत म्हणजे एखाद्या सिग्नलला पार डाव्या लेन मध्ये उभे असतील, पण सिग्नल सुटायच्या वेळी काय एकदम विचार बदलतील आणि चक्क उजवीकडे वळणार. बाकीचे वाहनचालक कितीही शंख करत असतील तरी बेहत्तर. बर रिक्षाचा एवढा सूळसुळाट आहे तरी तुम्हाला काही कामासाठी रिक्षा हवी असेल तर आजिबात मिळणार नाही. कोठ्ल्याश्या स्टॅण्ड वर रिक्षा लावून हे सगळे चकाट्या पिटत बसणार.
एखादा धूर्त “कुंपणावरचा” कार्यकर्ता त्याच्या गाडीवर “साहेबांची कृपा” लिहील. आता साहेब हे सर्व पक्षात आहेत त्यामुळे ह्या पठ्ठ्याची निष्ठा गुलदस्त्यात. ह्यांना आपली गाडी म्हणजे रणगाडाच वाटतो. आणि ह्यांची गाडी सरळ लाईनीत कधीही जाणार नाही. सारखे लेन बदलणार. जणूकाही गाडीत डीझेल बरोबर रात्री नं संपलेली “देशी” पण मिसळलेली आहे. आणि खुशाल चुकीच्या बाजूने गाडी चालवतील. तेही गाडीचे डोळे वटारून, म्हणजे हेडलाईट लावून. आणि पोलिसांचा सुद्धा ह्यांच्याकडे कानाडोळा. बिचारे म्हणत असतील, “न जाणो खरच कुठल्या दादांची कृपा असेल तर आपली बदली व्हायची!”

Thursday, 10 December 2015

...हे त्या दारूबंदी नाकारणार्‍यांना काय माहिती?

जेव्हा एका स्त्रीचा नवरा दारू पिऊन घरी आल्यावर काय दंगा करतो आणि घरातील मुलांच्या नजरेत बेवड्या बापाचा काय तमाशा होतो, हे मंत्रालयातील खुर्चीवर बसून दारूबंदी करणे शक्य नाही, असे उत्तर देणार्‍यांना काय माहित? ‘‘ गावातील इतरांप्रमाणं माझे बाबाही दारू पितात. आईनं कष्टानं कमवलेले पैसेही जबरदस्तीनं दारूसाठीच खर्च होतात. आमच्या भविष्याचं काय?’’ असा प्रश्‍न विचारताना जेव्हा चिमुरड्यांच्या डोळ्यात अश्रु येतात, त्या अश्रुंची कहाणी या दारूबंदी नाकारणार्‍या मंत्र्यांना काय माहित? अनेक घरात वडिल कामावरून घरी येण्यापुर्वी शांतता पसरते. का तर....आता वडिलांची कामावरून घरी येताना दारू पिऊन येतील आणि आपण काही चुकीचे वागलो तर आपल्याला फटके बसतील, कधी कधी तर नशेत मेणबत्तीचे चटकेही मिळतील...म्हणून ती शांतता...पण त्या शांततेचा आवाज राजकीय टिका करण्यात व्यस्त असणार्‍या दारूबंदी नाकारणार्‍या मंंत्र्यांच्या कानी कधी पोहोचणार आहे काय?
हिवाळी अधिवेशन सुरू आहे...आज खेडोपाड्यातील अनेक महिला कधी टि.व्ही.कडे ढुमकूनही न पाहणार्‍या त्या महिला दारूबंदीची घोषणा ऐकण्यासाठी हिवाळी अधिवेशन पहात आहेत. कारण या दारूपायी या गावातील अनेक घरांची धूळधाण झालीय. अनेक संसार देशोधडीला लागलेत. अनेक महिलाचं कुंकू पुसलं गेलं तर अनेक म्हातार्‍यांनी आपला कर्तासवरता मुलगा या व्यसनापायी गमावलाय. शालेय जीवनातील कोवळं वय असणारी १५ ते २० वयोगटातील मुलं आता चक्क दारूच्या अधीन झालीत. आई-वडिलांना रोज शिवीगाळ, दारूसाठी पैसे मागणं आणि नाही दिले तर मारहाण इतक्या खालच्या थराला ही मुलं गेलीत. इतकंच नाही तर या दारूसोबतच आता गुटखा, सिगारेट, मटका, जुगार, पत्ते या सर्व गोष्टींकडंही तरुण पिढी वळताना दिसतेय. पण दारूच्या व्यवसायाने लाखोंची कमाई करून दारूबंदीला नाकारणार्‍या त्या मंत्र्याला काय देणंघेणं?
जेव्हा रात्रीच्या वेळीस एखाद्या नाक्यावरून एक मुलगी एकटी घरी जाते आणि त्या नाक्यावर असलेल्या दारूच्या दुकानांवर बाटल्या हातात पकडून उभ्या असलेल्या त्या दारूड्यांच्या नजरा काय बोलतात हे अधिवेशनात बसून दारूबंदी नाकारणार्‍या त्या मंंत्र्याला काय समजणार? शेवटी एकच...दारूबंदी झाली नाही तर बाकी उरेल ती अनेक संसारांची राखरांगोळी.....

Monday, 16 November 2015

चातुर्वर्ण्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र सरकारने सफाई कामगारांच्या नियुक्तीमध्ये वारसा पद्धत कायम ठेवत तो अनुसूचित जातीतील सर्व जातींना लागू करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो सकृतदर्शनी जाती व चातुर्वण्यव्यवस्था बळकट करण्यावरचा सरकारी ठप्पा असल्याचे दिसते. वाल्मिकी-मेहेतर समाजासकट इतर जातीना सामाजिक आणि आर्थिक संरक्षण देण्याच्या नावाखाली घेतलेला निर्णय हा धर्मशास्त्रीय सनातनी मानसिकतेचे द्योतक आहे.

४० वर्षापूर्वी लाड समितीने शिफारस केलेल्या वारसा पद्धतिचा तेव्हाच्या सरकारनेच विरोध करावयास पाहिजे होता. त्याने समाजातील विषमतेची दाहकता कमी झाली असती. परंतु तसे झाले नाही. याला सरकारमधील मंत्र्यांची श्रेष्ठ कनिष्ठ मानसिकताच जबाबदार असावी. परंतु आता फडणवीस सरकार त्याही पुढे जावून ही पध्दती कायम ठेवण्यासह वाल्मिकी-मेहतर या जातीसोबतच अनुसूचित जातीमधील इतरानाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. साफसफाईचे काम केवळ अनुसूचित जातीच्या समाज घटकानीच का करायचे? साफसफाईचे काम करण्यास इतर जातीवर्गांना प्रतिबंध करून ते काम जबरदस्तीने अनुसूचित जातीना करावयास लावणे हे भारतीय घटनेच्या सामाजिक समानता प्रस्थापित करण्याच्या तत्वाविरोधात आहे. उत्तर प्रदेशातील मायावती सरकारने साफ सफाई व अस्वच्छता या नोकरी क्षेत्रातील जागा ह्या सर्व वर्गासाठी खुल्या करण्यात आल्या होत्या.



साफसफाई कामगार पदासाठी विविध जाती समुहातून अर्ज मागविण्यात आले होते व त्यास सर्ववर्गीय समाजातून भरपूर अर्ज प्राप्त झाले होते. परंतु येथे (महाराष्ट्रात) तर सरकारच श्रम आधारित जातीव्यवस्था कायम ठेवण्यास उत्सुक सल्याचे दिसते. हे फार धोकादायक असून याचा विरोध होणे अत्यंत गरजेचे आहे. सरकार कोणाचेही असो त्यांनी नेहमी समाजिक सुधारणा व परिवर्तनाच्या भूमिकेत असले पाहिजे. परंतु हे सरकार सुधारणा करण्याऐवजी धर्म व चातुवर्ण्यव्यवस्था अधिक सुधृढ व बळकट कशी होईल याकामी लागलेले दिसते. अशा सरकारचा आदर कोणास वाटेल? मग या सरकारला सवर्ण व सनातनी लोकांचे सरकार म्हणावे काय?. भारतात जातीव्यवस्था ही श्रम विभागणीचे नाही तर ती श्रामिकाच्या विभागणीचे फळ आहे. डाक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे जातीव्यवस्था ही केवळ श्रमविभाजन अथवा श्रमिकाचे विभाजन नाही तर ती एक उतरंड आहे. यात मजुराचा एक वर्ग दुसऱ्या वर्गापेक्षा उच्च आहे.


दुसऱ्या कोणत्याही देशातील मजुरात श्रमासोबत श्रमिकाचे अशाप्रकारे उच्चनीच श्रेणीत विभाजन झालेले नाही. परंतु भारताच्या धर्मशास्त्रीय व्यवस्थेने ते केले आहे. २१ व्या शतकातही हे असेच चालू द्यायचे काय?. ज्या धार्मिक श्रध्दावर आजच्या मानसिकतेच्या गुढ्या उभारलेल्या आहेत त्या श्रद्धा नष्ट केल्याशिवाय दुषित मानसिकता नष्ट होणे शक्य नाही. सामाजिक गुणवत्ता ठरविण्याकरिता प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्तृत्वास वाव मिळाला पाहिजे. व ज्याला त्याला त्याच्या आवडीनिवडी नुसार कार्यक्षेत्र निवडता आले पाहिजे. या व्यवस्थेलाच जातीव्यवस्थेत हरताळ फासला गेला आहे. यात माणसाची निवड त्याच्या अंगभूत गुणांवरून करण्यात येत नाही तर त्याच्या पूर्वजांच्या व्यवसायावरून ठरविण्यात येते. पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ या सिद्धांतावर ते आधारलेले आहे. जन्मजात लादलेल्या धंद्याची पध्दती ही संपूर्ण समाजास घातक आहे. जातिव्यवस्थेतील हे श्रमविभाजन हे ऐच्छिक नाही, व्यक्तीच्या भाव भावना व आवडी निवडी ह्यांना यात स्थान नसते.

भारतात असे अनेक धंदे आहेत जे जे कनिष्ठ प्रकारचे समजण्यात येतात. त्यामुळे त्या धंद्यातील लोकात आपापल्या धंद्याबाबात घृणा निर्माण होते. ते धंदे सोडण्याची प्रवृत्ती त्यांच्यात वाढीस लागते. किंबहुना तो समाजच असे काम करण्यास स्वत:हून मनाई करतो परंतु सरकारच जबरदस्तीने काम थोपवत जबरदस्ती करीत असेल तर राज्यघटनेच्या समानतेच्या तत्वाविरोधी ठरते आहे. त्यामुळे सामाजिक असमानता कायम ठेवू इच्छीनारा हा निर्णय सरकारने रदबादल करण्याची गरज आहे. अन्यथा अगोदरच सरकारवर पेशवेशाहीच्या आगमनाचे लांच्छन लागल्याचा जो आरोप आहे तो अधिक गढध होवून त्यास या निर्णयाने पुष्टी मिळाल्यासारखेच होईल.