My Blog List

Sunday, 14 October 2018

का नाही एकत्र येऊ शकलो ?????

का नाही एकत्र येऊ शकलो 
फक्त एकच तर चूक झालेली ...
तू बामनाचा मुलगा होता 
आणि मी बौद्धांच्या घरात जन्मलेली 

का नाही एकत्र येऊ शकलो 
फक्त एकच तर चूक झालेली ...
तो दसरा साजरा करत होता 
मी अशोक विजयादशमी साजरी करत होती 
दोन हात जोडून तो जय नमस्कार करीत होता 
तेच दोन जोडून मी जय भीम घालत होती 

हिंदू असूनही पांढऱ्या कपड्यात आंबेडकर जयंती साजरी करणं चुकीचंय का ? 
आणि बौद्ध असूनही प्रेमाची गुढी उभारणं चुकीचंय का ?

तो दररोज सकाळी गायत्री मंत्राने जप करत होता 
मी बुद्धवंदना करत होती 
तो श्रावण महिना पाळत होता 
आणि मी वर्षावास करत होती 

का कोण जाणे पण..  
हिंदू-बौद्ध च्या नावाने लोक एकमेकांचे वैरी बनले 
ए,हिंदू-बौद्ध ची तेढ निर्माण करणाऱ्यांनो...
बौद्ध पौर्णिमेच्या चंद्रात आजही तोच मला दिसतो 
आणि कोजागिरीच्या त्या देखण्या चंद्रात तो आजही मलाच शोधतो.....
कोजागिरीच्या त्या देखण्या चंद्रात तो आजही मलाच शोधतो.....

प्रमिला पवार 

Tuesday, 9 January 2018

....तर जरा थोडं थांब!!!

शेड्युलच इतकं बिझी होत गेलं की कित्येक महिने काही लिहायला वेळ मिळत नव्हता... गेल्या चार दिवसापासून कर्नाटकात मोकळा वेळ मिळाला तेव्हा ही कविता सुचली...कवितासारखी ही कविता करता आली नाही... पण प्रेमाला शब्द कशाला हवेत? नै?


पुर्वी तुझं मन एकटं खेळत होतं...
आता त्याच्यासोबत खेळु लागलंय...
पण जर तु या लव्ह ॲट फर्स्ट साईडला प्रेम म्हणत असशील तर थोडं थांब.... 

कारण या जगात खेळ खेळण्यासाठी देखील आपण नियम आखतो....मग प्रेमाच्या खेळातले नियम कसे काय विसरलीस?
बस फक्त रात्री-मध्यरात्रीपर्यंत आपण एकमेकांच्या गप्पांमध्ये रंगतो आणि तु याला प्रेम म्हणत असशील तर थोडं थांब... 

आणि जेव्हा कोण्या मित्राचं कौतुक करताना तो तिला टाळतो आणि कोण्या मैत्रिणीचं कौतुक होत असताना तीचं मनात एक आणि चेहऱ्यावर एक भाव दाखवणं....
पण तु या क्युट जेलसीला प्रेम म्हणत असशील तर जरा थोडं थांब....
कारण यार जगात जळुन खाक झालेल्या कोळशाचाही इंधन म्हणून वापर करतात.... 

बस फक्त आता... आता... आपण एकमेकांची मुकी मनं ओळखु लागलोयेत...
आणि याला तु प्रेम म्हणत असशील तर जरा थोडं थांब!!!
लक्षात घे की वृद्धाश्रमातले दोन वृद्ध एकमेकांचं एकटंपण समजु शकतात... पण ते दोघे एकमेकांना त्यांचं घरपण तर नाही देउ शकत ना.... 

अरे जर तिच्या मोबाईलवर बॉयफ्रेंडचा कॉल येतो, तेव्हा तो मुद्दाम डिस्टर्बंस क्रीएट करतो.... आणि याला जर तु गोड प्रेम म्हणत असशील तर जरा थोडं थांब!!!!


कारण शोन्या, Luxury मधे लोळतांना फाटकं गावही कधी कधी आपलं वाटतं... जवळचं नातं असलं तरी सांगायलाही नको वाटतं...


हा पण... तो दु:खी असताना त्याचे प्रत्येक अश्रू तुझ्याच ओढणीवर ओघळत असतील....
जर तो आयुष्यातलं सगळं टेंशन विसरुन तुझ्यासोबत अगदी बच्चू होउन त्याचं गमावलेलं लहानपण शोधत असेल...
जर तुझी पोल एखाद्याने उघड करण्याअगोदरच त्याने सगळे सिक्रेट्स तुझ्यापुढे खुले केलेत...
आणि त्याच्या चेहऱ्यावरील हास्याचं कारण तुझं बालीशपण असेल तर... ????

तर... तर...तर नाही यार... यालाच तर प्रेम म्हणतात...
आणि या प्रेमानीच सगळं तिला सांगुन टाक...
मनातले ते बंदिस्त वाक्य आज तू बोलून टाक...

कारण यार पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरी, इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड या सगळ्या गोष्टी मिळुनही अनेकजण प्रेमाने भिकारी बनतात....





















Sunday, 10 September 2017

आकाश होईपर्यंत !

पुन्हा एक कोरी सांज
पायाशी फेकून
निघून गेलास, सवयीनं-
मी
शाईत विरघळत राहिले
आकाश होईपर्यंत !

आज पुन्हा तुला काही तरी सांगावसं वाटतंय...



आज पुन्हा तुला काही तरी सांगावसं वाटतंय...
राहून गेलेल्या त्या क्षणांना पुन्हा भिजावसं वाटतंय...

निरूत्तर राहीलेल्या तुझ्या डोळ्यांना प्रश्न विचारावसं वाटतंय
उगाच उथळ सगळं काही.. बेभरवशाचं सारं, निरर्थक सगळं काही..
तरीही डोळे गच्च बंद करून भरवसा ठेवावंसं वाटतंय...
आज त्याच नजरेवर अबोल शब्द कोरावेसं वाटतंय
आज पुन्हा एकदा राहून राहून...
माझं मलाच चिडवावसं वाटतंय..
आज पुन्हा तुला काही तरी सांगावसं वाटतंय...

तुझीच...
प्रमिला !!!

तु तिच्याकडे जातोस खरा...

तु तिच्याकडे जातोस खरा...

पण का कुणास ठाउक?

तु एकदा मागे वळुन पाहशील, असं वाटतंय...
नात्यात उद्गारार्थी चिन्हाचा अर्धविराम झाला रे.... 

हा... पण त्या अर्धविरामच्या अगोदरचं वाक्य आपल्या निस्वर्थी प्रेमाचं की मैत्रीचं?

सांगीन तुला पुन्हा कधीतरी...

सांगीन तुला पुन्हा कधीतरी...
या ऊन-सावल्याांच्या मृगजळातून बाहेर पडले तर!
तुझ्या या निर्जीव भावनांचं ह्रदय जेव्हा धडकु लागेल

फक्त वाऱ्याला वहायला...
पावसाला बरसायला...
आणि आभाळाला ईकडून तिकडे
फिरायला....
परवानगी मिळाली तर!



नक्की सांगीन तुला पुन्हा कधीतरी!
या अनोळखी चौकटीतले कोडे सुटले तर....
जेव्हा प्रश्नही उत्तरे बोलु लागली तर....
नक्की सांगीन तुला पुन्हा कधीतरी!

-प्रमिला

Saturday, 24 June 2017

एक रिकामी खुर्ची

तु तिच्यावर प्रेम करत रहा...
मी तुझ्या प्रेमावर प्रेम करील...
तु ना.... तिच्यासाठी आठवणींचा पाऊस जमा करत रहा,
मी नाही का...तुझ्यासाठी गर्द आभाळाचा आधार देत राहील...


तुझ्या कॉल लॉगमधल्या डायलींगमध्ये
तीचेच नंबर असतील....
पण वेड्या, रात्रीच्या मिट्ट अंधारात
आजचा माझा स्टेटस काय आहे,
हे पाहत मानतल्या मनातच कमेंट देत असशील


रिमझीम पावसासोबत तु तिच्या आठवणीत रेंगाळत रहा...
मी तुझ्या डोळ्यातल्या आभाळात हळुहळु विरघळत राहील...
तिच्या परतण्यासाठी वाट पाहणारी तुझी भुतकाळाची खिडकी
आणि बंद एकांतात तुझी साथ न्याहाळणारी
एक रिकामी खुर्ची....
-प्रमिला