
कारण मला लहानपणापासूनच
वेगवेगळ्या गोष्टी करण्याची आवड होती, मग त्या गोष्टी करणं मला जमत नसल्या तरी मी
त्या करायचीच...हे वेड होतं माझं. त्यामूळे अनेक टप्प्प्यावर मला भेटलेल्या वेगवेगळ्या
माणसांनी मला घडवलंय...शिकवलंय...!! मग मला ते सातवीत असताना पोळ्या बनवायच्या पण
लाटता येत नव्हत्या, हे पाहून आईने पोळ्या कशा लाटायच्या हे शिकवणं असो किंवा शाळेत
असताना श्रोत्यांसमोर बोलायचं कसं माहित नसुनही वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा असे
माझे ठरल्यानंतर शाळेतल्या शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन असो...किंवा आताचच
सांगायचं झालं तर माध्यम क्षेत्रात उतरल्यानंतर आपल्या लिखानावर प्रभूत्व कसं
करावं इथपासून ते नव-नविन गोष्टी करण्यात अनेक दिग्गजांचा मोठा वाटा आहे. ज्याचा
हिशेब मांडायचा झाल्यास पसारा उदंड होईल. त्यातल्या प्रत्येकाचीच भूमिका
माझ्याकरिता द्रोणाचार्यांची होती, असं
नाही; पण मी मात्र
एकलव्यासारखी तन्मयतेनं सारं वेचत आले, साठवत आले. खरं सांगायचं तर आयुष्यात अनुभवासारखा
गुरू नाही, असं मला वाटतं.
कुठलाही गुरू म्हणा, शिक्षक
म्हणा "थिअरी आधी; मग
प्रॅक्टिकल' असा मार्ग स्वीकारतो; पण अनुभव हा एकमेक गुरू असा आहे, जो आधी प्रॅक्टिकल देतो. त्यामुळं थिअरी
तुम्हाला घोकावीच लागत नाही, तर ती
मेंदूवर कायमची कोरलीच जाते. माझ्या आजुबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेतून मी काही ना
काही शिकत आली. या घटनाच आपल्याला काही ना काही शिकवित असतात. गरज असते ती फक्त त्या घटना जाणून घेण्याच्या आपल्यातल्या कुवतीची...उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या शाळेत संचालिका सुलभा
कांबळे मॅडम या विद्यार्थ्यांच्या व्यायाम सत्रानंतर ठराविक ग्रूप्स करून
त्यांच्याकडून वृत्तपत्र वाचन हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवित असत. काही हूशार मंडळी
छान वाचन करायची...सगळ्यांसमोर असं ठणकेदार आवाजात, हातात मोठ्या स्टाईलने पेपर
घेऊन त्यातल्या बातम्या वाचून दाखवणं हे पाहून मला मात्र मोह
अनावर झाला. माझे सगळे मित्र-मैत्रीणी मस्त छान वाचन करून आपली
वट वाढवित होते. मग मी पण संधी साधली. त्यावेळी ते माझ्यासाठी स्वप्न होतं. एकदा तरी असं सगळ्यांसमोर
पेपर वाचून काढयचा म्हणून कधी नव्हे ते आमच्या घरात मराठी वृत्तपत्र आले आणि मी
जवळपास एक आठवडाभर वृत्तपत्र वाचनाचा सराव करू लागले. पण बातमीचे वाचन कसं करायचं
हे माहित नव्हतं मग घरात टि.व्ही. न्यूज चॅनेल लावून बाहूल्यांसारख्या दिसणाऱ्या अॅंकरना पाहून त्या
बातम्या कशा सांगतात, यावर फोकस करू लागले. मग त्यांच्याप्रमाणे वेगवेगळ्या स्वरात
बातम्या वाचन करून आठवडा भर मी काही ते वेड सोडलं नाही आणि आला तो स्वप्नपुर्तीचा
दिवस. समोर इतकी मोठी मंडळी पाहून सुरवातीला थोडी डगमगली..पण आपल्याला हे करयाचंच
आहे हे ठाम होतं मनात. त्यामुळे सुरवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी सुसाट बातमीपत्र
वाचून काढले. वृत्तपत्र वाचताना तो वेगळाच आत्मविश्वास अगदी रुबाबात डोलत होता. हा छोटासा प्रसंग मला खूप काही शिकवून जाणारा ठरला. त्यानं मला
आयुष्यात दोन अनमोल गोष्टी शिकवल्या. एक
म्हणजे, आयुष्यात आनंद, सुख शोधण्यासाठी लांब जाण्याची गरज नसते. आनंदाचं
मूळ तुमच्या आसपास असतं; पण भोवतालच्या अनेक हव्या-नकोशा गरजांच्या गर्दीत
ते एकाग्र होऊन शोधावं लागतं. दुसरी
गोष्ट म्हणजे, अनेकदा
तुम्हाला आयुष्यात जे हवंय, जे
साध्य करायचंय, त्याच्या
अन् तुमच्या दरम्यान बऱ्याच नकोशा त्रासदायक गोष्टी येत असतात. अशा वेळी त्यांनी
विचलित होऊन साधना किंवा ध्यासच सोडण्याऐवजी किंवा त्या गोष्टींच्या नावे उगाच
त्रागा करण्याऐवजी तुमच्या ध्येयावर जास्त "फोकस' केलंत तर नको असलेल्या त्या गोष्टींचं अस्तित्व
तुमच्यासाठी धूसर होऊन जातं. बस्स! त्या क्षणानंतर माझ्या अगणित
गुरूंच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली - "अनुभव’’ !!!