My Blog List

Sunday, 20 December 2015

वाहनांच्या मागे लिहिलेल्या पाट्या आणि वाहनचालक.....

अनेकदा आपण प्रवास करताना वाहनांच्यामागे लिहिलेल्या पाट्या वाचण्यात येतात. यातील काही विनोदी असतात तर काही वाक्य हे प्रवासातील आनंद देणारे असतात.... तर काही वाक्यांतुन आयुष्याची उकल दिसुन येते. पण जे जे वाक्य ज्या ज्या वाहनावर लिहिले त्यानुसार त्या त्या वाहनचालकाचे निरीक्षण कधी केलय का?.... 

जर एखाद्या वाहनावर लिहिले असेल की, 
बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने! तो वाहनचालक हमखास गाडी चालविताना ओव्हरटेक करेलचआणि ओव्हरटेक केल्यानंतर मागच्या वाहनचालकाने जास्त नखरे केले तर आहेच मागची पाटी 'ओव्हरटेक केलय वाघाने' आता मागचा वाहनचालक वाघापुढे काय गुरगुरणार? 
साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस....असे वाक्य जरी एखाद्या वाहनचालकाने त्याच्या गाडीवर लिहिले असले तरीही मध्येच रस्त्यावर एखादा अपघात झालेला पाहुन त्याठिकाणाहुन हळूहळू गाडी चालवित तो अपघात पाहुनच तो पुढे जाईल.... पण जखमीला मदत करण्याची रिस्क तो घेणार नाही... 
अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही, असे वाक्य लिहिलेला वाहनचालक नक्कीच सिग्नल मध्ये उभा असुन सुध्दा लागोपाठ हॉर्न वाजवताना दिसेल....
सासरेबुवांची कृपा..... असे ज्या गाडीवार लिहिले असेल ते वाचून त्या गाडीच्या वाहनचालकाने नक्कीच श्रीमंत घरची बायको केली असणार किंवा ती गाडी त्याला हुंड्यात मिळाली असणार.... असा विचार तुमच्या डोक्यात येतोच ना....
तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं..माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा.....आणि जर तोच वाहनचालक स्पीड ब्रेकरवरुन दणादण गाडी आपटून जात असेल तर ..... आतली माणसे किती लाख मोलाची असतात याचा अंदाज येतोच की.... 
भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"....... हे वाक्य वाचुन मागचा वाहनचालक बिचारा घाबरतो आणि त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.... पुढे जाणाऱ्या गाडीवर लिहिलेल असत.... तुमचे लक्ष आमच्याकडे का?
बाकी पुण्यातील दुचाकी स्वार हे म्हणजे अजब प्रकरण आहे. एरवी ऑफिसात वगैरे अगदी नम्रपणे वागणाऱ्या व्यक्ती सुद्धा जेव्हा दुचाकीवर स्वार होतात तेव्हा त्यांच्या अंगात काय वारं संचारतं कोण जाणे! बहुतेक दुचाकीच्या वेगाने ह्यांच्या पार डोक्यात वारं घुसत असावं. कारण हेल्मेट वगैरे घालणं हे भ्याडपणाचं लक्षण समजलं जातं ना! 
रिक्षामध्ये जीव केवढासा, पण शेजारून जाणाऱ्या सुमोशी वेगाची स्पर्धा करतील. अचाट आत्मविश्वास! आणि ह्यांची खासियत म्हणजे एखाद्या सिग्नलला पार डाव्या लेन मध्ये उभे असतील, पण सिग्नल सुटायच्या वेळी काय एकदम विचार बदलतील आणि चक्क उजवीकडे वळणार. बाकीचे वाहनचालक कितीही शंख करत असतील तरी बेहत्तर. बर रिक्षाचा एवढा सूळसुळाट आहे तरी तुम्हाला काही कामासाठी रिक्षा हवी असेल तर आजिबात मिळणार नाही. कोठ्ल्याश्या स्टॅण्ड वर रिक्षा लावून हे सगळे चकाट्या पिटत बसणार.
एखादा धूर्त “कुंपणावरचा” कार्यकर्ता त्याच्या गाडीवर “साहेबांची कृपा” लिहील. आता साहेब हे सर्व पक्षात आहेत त्यामुळे ह्या पठ्ठ्याची निष्ठा गुलदस्त्यात. ह्यांना आपली गाडी म्हणजे रणगाडाच वाटतो. आणि ह्यांची गाडी सरळ लाईनीत कधीही जाणार नाही. सारखे लेन बदलणार. जणूकाही गाडीत डीझेल बरोबर रात्री नं संपलेली “देशी” पण मिसळलेली आहे. आणि खुशाल चुकीच्या बाजूने गाडी चालवतील. तेही गाडीचे डोळे वटारून, म्हणजे हेडलाईट लावून. आणि पोलिसांचा सुद्धा ह्यांच्याकडे कानाडोळा. बिचारे म्हणत असतील, “न जाणो खरच कुठल्या दादांची कृपा असेल तर आपली बदली व्हायची!”

No comments: