My Blog List

Tuesday, 12 July 2016

‘विठ्ठल-अल्लाह’चे ‘लोकसंगीत प्लस सुफी’ स्टाईलचे हे गाणे ऐकाच एकदा...


खूप दिवसांनी ‘हिंदू-मुस्लिम’ या विषयावर लिहीण्याचा विचार करीत होते. पण ‘हिंदू-मुस्लिम’ यात फक्त दोन शब्द जरी असले तरी यात अनेक धागे-दोरे, घटना, भावना दडलेले असल्याने लिहू की नको लिहू हा विचार करीत होते. पण अखेर ‘डिस्को सन्या’ या चित्रपटातील ‘जय हरी विठ्ठल-अल्लाह हू अकबर’ या गाण्याने मला लिहीतं केलंच. सध्या सगळीकडे सुरू असलेल्या पंढऱीची वारी आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेल्या या ‘जय हरी विठ्ठल-अल्लाह हू अकबर’ या गाण्याने जुलै महिन्याचे वैशिष्ट्य आणखीनच सुंदर करून ठेवले. हे गाणे जेव्हा मी युट्यूबवर ऐकले तेव्हा अक्षरशः अंगावर काटे आले.
मला संगीतातलं फारसं काही कळंत नसलं तरी मात्र हे गाणं मला कळालं. एकीकडे लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेले गायक नंदेश उमप यांच्या रांगड्या आवाजात विठ्ठलाला दिलेली साद....तर दुसरीकडे संगीततल्या डेप्थमध्ये जाऊन अल्लाहला पुकारताना बॉलिवूडचे गायक शबाब साबरी यांचा सुफी सरगम...काय फ्यूजन आहे हे!!!! मित्रांनो आजपर्यंत ‘हिंदू-मुस्लिम’ हा विषयंच जरी कोणाकडे काढला तर ज्याला ओ का ठो कळात नाही  ते ही आज बाबरी मशीद प्रकरण, हिंदुस्थान-पाकीस्तान, आंतकवाद, मुस्लिमांची असुरक्षितता, हिंदू मंदिरांच्या जागी मुस्लिमांच्या मशिदीचे आक्रमण यासारख्या अनेक विषयांवर तासनतास बोलू लागले आहेत. पण अशा मंडळींच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी संगीतकार-निर्माते सचिन पुरोहित-अभिजीत कवठाळकर यांनी ‘डिस्को सन्या’ या फिल्ममधून हे गाणे आणले आहे.  

काय कसली शेंडी...अन काय कसली दाढी...
काय कसला भगवा...अन काय कसला हिरवा...
कायको डाली टोपी अन कायको पेहना फेटा...
माणूसकी हाच धर्म सुनले मेरे बेटा...
गाण्याच्या सुरवातीच्या या चार ओळीच पुरेश्या आहेत हे गाणे समजून घेण्यासाठी....हिंदू म्हणून ओळखावे म्हणून लोक शेंडी ठेवतात, तर मुस्लिमांची ओळख त्यांच्या दाढीवरून करतात. भगव्या रंगाची जोड हिंदु धर्माशी केली जाते तर हिरवा रंग मुस्लिम धर्मीयांची निशाणी बनते. पण तुम्ही दाढी केली काय शेंडी ठेवली काय...माणसांची ओळख ही त्याच्यातल्या माणूसकीनेच होते...तुम्ही भगवे झेंडे मिरवले काय की हिरवे....पण तुमच्यातल्या माणूसकीच्या रंगापुढे भगवे-हिरवे रंग फिके पडतील, अशाच काहीश्या भावना मला या कडव्यातून मिळाल्या. त्यामूळे तुम्ही हिंदू असाल किंवा मुस्लिम....पण हे हातासारशी गाणे ऐकाच! संगीत नव्हे तर वेगवेगळ्या भावनिक स्थितीमध्ये माणूसकीचे महत्त्व अधोरेखित करण्याचा, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे वेगवेगळे रूप दाखविण्याचा प्रयत्न या गाण्यातून केला.  या गाण्यात हे कडवे प्रख्यात बालकलाकार पार्थ भालेराव आणि सुप्रसिद्ध अभिनेता संजय खापरे यांच्यावर चित्रीत केले आहे. या गाण्यात पार्थ भालेराव संजय खापरे याच्या डोक्यावर दगड मारतो, या प्रसंगातून हिदूं-मुस्लिम धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांच्या जोरदार कानशिलात बसविण्यात दिग्दर्शक नियाज मुजावर येथे यशस्वी होतात.

भूखे पेट सुखी रोटी पानी तो दिला दे अल्लाह...
हक्काचं मागूनी थोडी तरी द्या हो कृपा....
अल्लाह तु, मौला तु, माझ्या मुखी तुझे नाव...
या दोन ओळी गाताना नंदेश उमप व शबाब साबरी या दोघांच्या स्वरांची उत्कटता निर्गुण, निराकार अल्ला, ईश्वराला स्वरांच्या माध्यमातून शोधतात. दोन वेळचे जेवण मिळावे एवढाही हक्क आज समाजात अनेक गरिबांना मिळत नाही, त्या भूकेला कोणताही धर्म नसतो. भूकेसाठीच्या या अमेझिंग, विलक्षण शब्दात जेव्हा पार्थ भालेराव रस्त्यावरच्या भूकेने व्याकूळ झालेल्या लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू देतो, ही भूक मिटवण्यासाठी हिंदू-मुस्लिम एक झाले तर कोणताच धर्मीय हा भूकेला राहणार नाही असा संदेश या गाण्यातून दिला आहे. जगातल्या साऱ्याच प्रामाणिक, सच्च्या आणि अस्सल भावनेला समर्पित हे गाणे आहे. या गाण्यात दाखविलेला अजून एक प्रसंग माझ्या मनाला भावला तो म्हणजे जेव्हा पार्थ भालेराव जेवणापुर्वी ‘ओम नमः शिवाय..फादर सन..बिस्मील्ला आमीर’ या मंत्राचा जप करतो. काय कमाल कल्पना आहे हे मंत्र बनविण्याची. म्हणजे हिंदुंमध्ये ‘वदनी कवळ घेता’ हे मंत्र म्हटले काय....आणि मुस्लिमांमध्ये कुराण वाचन केले काय....पण सर्व धर्म समान मानून समाजात असलेली माणूसकीची भूक आज प्रत्येकाने मिटवली पाहीजे, असा संदेश नकळत या गाण्यात दिला आहे. याच ईश्वरीय भावनेचा एक कोपरा निखळ मैत्री. अशाच निखळ मैत्रीच्या भावनेला समर्पित ‘जय हरि विठ्ठल...अल्लाह हू अकबर’ हे गाणे एक वेगळी उंची गाठणार आणि दाद द्यायला भाग पाडणार आहे. गाण्याच्या शेवटी धर्माने मुस्लिम असलेले गायक शबाब साबरी यांच्या सुरेल आवाजातून कधी विठ्ठलाला साद घालतात...तर हिंदु असलेले लोहशाहीर नंदेश उमप अल्लाहला पुकारतात...काय निखळ क्षण वाटतात ते क्षण...दोन्ही धर्माचे गायक एकमेकांच्या धर्मातील देवतांचे नावे घेतात...आणि जेव्हा हे दोन्ही स्वर एकत्र येऊन दोघेही ‘जय हरी विठ्ठल...अल्लाह हू अकबर’ नामाचा जप करतात...तेव्हाचे संगीत अगदी पवित्र वाटू लागतात.

मी बीड सारख्या जिल्ह्यात जन्मली आहे...वाढली आहे. बीड जिल्ह्यातील प्रत्येक कोपऱ्यातील गाव हे हिंदू-मुस्लिम धर्मीयांच्या एकोप्यातने नांदत आहे. त्यातीलच एका गावात माझे घर आहे. त्यामूळे ‘जय हरि विठ्ठल अल्लाह हू अकबर’ हे गाणे मला खूप भावते. हे गाणे सगळ्याच बाजूने अफाट आहे. गेल्या अनेक वर्षाच्या चित्रपट इतिहासात असं गाणं नव्याने आलंय म्हणजे हिंदु-मुस्लिम या दोन्ही धर्मातील गायकांचा सुरेल वापर, पार्थ-संजय यांच्यातील संघर्षाचा वापर, रस्त्यावरील भुकेल्या मुलांचा वापर, परीसराचा वापर आणि हे कथानाक....या सर्वासाठी संगीतकार-निर्माते सचिन पुरोहित, अभिजीत कवठाळकर, दिग्दर्शक नियाज मुजावर यांना हजार वेळा सलाम. एवड्या सुंदर पद्धतीने ही धर्मव्यवस्था,  समाजव्यवस्था या सर्वांना चपखलपणे थप्पड लगावलेली आहे. अप्रतिम...त्यामूळे सर्वांनी तुमच्या कामातून थोडा वेळ काढा हे ‘जय हरि विठ्ठल, अल्लाह हू अकबर’ हे गाणे ऐकाच एकदा....माणूसकीचे स्वर अनुभवण्यासाठी...

गाणे ऐकण्यासाठी लिंक सोबत जोडत आहे. https://www.youtube.com/watch?v=7qZirK9ZdoU


गीत- नियाज मुजावर
संगीत-सचिन पुरोहित-अभिजीत कवठाळकर
स्वर-लोकशाहीर नंदेश उमप व गायक शबाब साबरी
गीतप्रकार-इंडोफ्यूजन

No comments: