जेव्हा सुरवातीला कोरोना आपल्याकडे प्रवेश करू लागला, तेव्हा असं वाटलं होतं की काही दिवसांचाच तर प्रश्न आहे, पण नंतर नंतर जस जशी मृत्यूच्या संख्या डोळ्यापुढे भिरभिरु लागल्या, लॉकडाऊन पुढे वाढतच राहिला हे सगळं पाहून मनात हळूहळू भीती वाटायला लागली. लॉकडाऊनमध्येही अनेकजण Morning Walk साठी बाहेर पडत असताना माझ्या वडिलांचा पहाटे 4 वाजता Morning Walk सुरू व्हायचा, पण तो ड्युटीवर जाण्यासाठी.... खरं तर तेव्हापासून पप्पांबद्दल लिहिण्याची खूप इच्छा होती. आज नेमका कामगार दिन!!! मग शेवटी नाही राहवलं.... आज मनातले शब्द ओळींमध्ये उतरवल्याच....
करोनाच्या बातम्यांनी मन सैरभैर केल्यानंतर आता राहून राहून मनात भरपूर प्रश्न येतायेत. तुम्हाला ड्युटीवर असताना सॅनिटरायझर तर मिळत असेल ना, तुम्हाला तिन्ही टाईमचं जेवण तर मिळतंय ना, आणि जर बीएमसी कडून जेवण नाही पोहोचलं तुम्हाला तर आता रस्त्यावरही काही खायला सुरू नाही, Hotel पण बंद आहेत, मग असंच उपाशी तर झोपत नाहीत ना ? राहण्याची सोय तर ठीक केलीये ना? मच्छर भरपूर चावत असतील. अंगावर गोधडी ही नसेल. अशा सगळ्या वातावरणात तुम्ही तितक्याच हिमतीने कोरोनाशी लढा देताय. हे सगळं पाहून फक्त एकच म्हणावसं वाटतंय!!! तुम्ही खरे कोरोना योद्धा आहात!!! एक वडील म्हणून तर यशस्वी आहातच, पण एक 'कोरोना योद्धा' म्हणून तुम्हाला मनापासून मनाचा मुजरा!!!
जेव्हा कोरोना सुरू झाला तेव्हा आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव मला एक पत्रकार म्हणून होतीच, पण माझ्यातल्या मुलीने सुरवातीला तुम्हाला "कामावर जाऊ नका, बाहेर कोरोना किती वेगाने पसरतोय, कशाला रिस्क घ्यायची, कामात सांगा, तब्बेत बरी नाही, मस्त घरी आराम करा", अशा बऱ्याच विनवण्या केल्या. केवळ लिहिता वाचता येईपर्यंतच शाळा बघितलेल्या माझ्या पप्पांनी यावर जे उत्तर दिलं त्यामुळे थोडा धीर तर मिळाला. "मुंबईची डोकेदुखी ठरणारा 'कचरा' या समस्याचा आम्ही सुपडासाफ करू शकतो, मग हा कोरोना काय चीज आहे ? " तुमचं हे उत्तर ऐकलं आणि तुम्ही कामावर स्वतःची स्वतःची काळजी घ्याल असा विश्वास तर झाला, पण काळजी अजूनही अधूनमधून फेरफटका मारतेच. तुमचा 'कामगार दिन' तर गेल्या किती तरी वर्षापासून सुरूच आहे तो आतापर्यंत....मला जसं कळतंय तसं तेव्हापासून पहाटे 4 वाजता उठून डोंबिवली ते सायन असा ट्रेनमध्ये कधी स्टँडिंग तर कधी फोर्थ सीट हा प्रवास जणू तेव्हापासून पाचवीला पुजलेलाच... "तुमचे वडील बीएमसी कर्मचारी आहे, सातव वेतन, सुट्ट्या असतात, मजा असते बीएमसी वाल्यांची!!!" असं खूप जण अनेकदा मस्करीत बोलायचे. पण जेव्हा लॉकडाऊन सारखी परिस्थिती, त्यात उठता बसता
कोरोनाची भीती, दोन महिन्यापासून ना घर पाहिलं ना घरच्यांना, अशा परिस्थितीतही रस्त्यावर उभं राहून ड्युटी करणं, अशा तुमच्या या स्पिरिटला सलाम आहे. एक बाप म्हणून तर आतापर्यंत तुम्ही आमच्यापर्यंत कधी संकट येऊच दिली नाहीत, तसंच घरदार सोडून मुंबईत राहून रस्त्यावर कोरोनाशी दोन हात करताना त्या कोरोनाही येऊ देणार नाहीत, हा विश्वास आहे मला. आतापर्यंत घरच्यांच्या सुखासाठी आणि आम्हा सर्वांना हवं नको ते सगळं मिळवुन देण्यासाठी तुम्ही झटत आलात. पण मुंबईवर आलेल्या कोरोनाच्या संकटात तुम्ही तुमची मायेची ओढ बाजूला ठेवत आज रस्त्यावर उन्हातान्हाचं उभं राहून ड्युटी करताय... तुमचे हात जर थांबले तर उरलं सुरलं शहर ही अडचणीत येईल याचा विचार तुम्ही केलाय खरा, पण इथे घरात खंबीर बापाची कमतरता भासतेय खूप... दिवाळी असो किंवा दसरा, ईद असो किंवा नाताळ वर्षभरातील कुठल्याही सणोत्सवातही शहरात स्वच्छता राखण्याचे काम इमानाने करणारे कर्मचारी म्हणजे घंटागाडीवरील कर्मचारी. दाराशी घंटागाडी रोजच्या वेळेपेक्षा काही मिनिटे उशिरा आली तरीही अनेकांकडून उशीर झाल्याबद्दल प्रश्न उभे राहतात. एखाद्या दिवशी गाडी येऊच शकली नाही तर दुसऱ्या दिवशी नागरिकांना तोंड देताना या कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येतात. पण करोनासारख्या संकटातही तुम्ही शहरातील नागरिकांची साथ सोडलेली नाही. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार, सेवा ठप्प झाल्या आहेत. पण अशाही परिस्थितीत आपली भूमिका ओळखून जिवावर उदार होऊन तुम्ही शहराच्या आरोग्यासाठी सैनिकासारखी लढत आहात....
तुमची मुलगी
प्रमिला
#Lockdown
#Coronavoriors
#DutyFirst
#BMCEmlpoyee
#LoveUPappa
#Salam_Pappa
#Corona
#कोरोना_योद्धा
#कामगार_दिन_2020
राजेंद्र लक्ष्मण पवार (बीएमसी कर्मचारी) |