My Blog List

Sunday, 7 June 2015

पहिला पाऊस....पहिली आठवण!


आज आलेल्या पहिल्या पाऊसाने आपल्या हळव्या गुलाबी आठवणींना चिंब चिंब भिजवून गेला. पावसाच्या सरी बघताना आपण कधी काळामागे हरखून जुन्या आठवणी ताज्या केल्या ते समजलंही नाही. सगळं अगदी क्षणात घडलं. किंचितही चाहूल लागली नाही. पहिल्या पावसाची पहिली आठवण मनात अलगद जागी झाली. डोळ्यांसमोर पडदा होऊन हळुवारपणे तरळून आली. खरंच किती छान होते ते दिवस, असं नकळत मनात रेंगाळत राहिलं... अगदी कॉफीचे घोट घेतानाही... ती आठवण आपल्या सोबत होती... ती साठवण आपल्या शेजारी होती... हो ना...!

तीव्र उन्हाच्या झळांनी लाही लाही झालेल्या जिवांना गारव्याची अनुभूती देत असते. त्यावर भरीसभर म्हणून पावसानं हजेरी लावली. बेसावध प्रवाशांची आणि तितक्याच बेसावध असलेल्या हळव्या मनांची चांगली तारांबळ उडाली. स्थिर, संथ पाण्यात कुणी तरी इवलासा दगड टाकून निजलेल्या तलावाला जागं करावं, तसं आपलं मन खडबडून उठलं. खिडक्यांच्या फटीतून लहान मुलं डोकावतात, तसं कामाच्या धबागड्यात गुंग असलेल्या खुल्या डोळ्यांमधून पावसाचं अस्तित्व निरखू लागलं. तर काहींच्या आयुष्यात कामाचा व्याप वाढवून गेलं. पावसाच्या सरी कोसळू लागल्यावर कुणी वाळत घातलेले कपडे गोळा करण्यात गुंग होतं, कुणी दुकानांच्या बाहेर ठेवलेल्या चीजवस्तू आत नेत होतं, कुणी लहानमुलांप्रमाणे पावसाशी खेळत होतं, कुणी रस्त्यावर दुथडी भरून पाहणार्‍या प्रवाहात नाचत होतं, तर कुणी दुरूनच पहिल्या पावसाच्या आठवणी जाग्या करीत होतं. प्रत्येकाचा पावसाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध येत होता. प्रत्येकजण मिळेल ती संधी साधून पावसाशी आपलं भावनिक नातं जोडत होता. जुन्या आठवणींना पहिल्या पावसाशी रिलेट करीत होता. मनाच्या खोल कप्प्यात पहिल्या पावसाचा गारवा साठवून ठेवत होता.

पहिला पाऊस कधी एकटा येत नाही. जसा तो भेटायला येताना आपल्या दोन-एक मित्रांन आपल्या बाईकवर सोबत आणत असतो. अगदी तसंच सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट घेऊन पहिला पाऊस आपल्या भेटीला येत असतो. पाऊस आहेच मुळी थोडा लाजरा आणि थोडा बुजरा! त्यात किंचितही धीटपणा नाही. त्याचा स्वभाव अगदी तंतोतंत पावसात उतरलाय. त्याचं रुसणं, त्याला बोलण्यासाठी शब्दाची गरज न लागणं, त्याचं रागवणं, त्याचं हसणं, त्याचं रडणं, त्याचं चिडवणं...पावसाच्या प्रत्येक सरीत समावलं असतं. त्याचा लहरीपणा सुद्धा त्यानं हुबेहूब कॉपी केलाय. जसा पाऊस कधीच वेळेवर येत नाही, तसाच तो कधी येणार, हे सांगत सुद्धा नाही! आपण अगदी बेसावध असतो. आपली काहीच तयारी नसते. अशा वेळी योग्य संधी साधून पाऊस येतो. तो ही तसाच अगदी पावसाच्या
सुखद गारव्यासारखा आपल्या आयुष्यात येतो. त्याचा काळ, वेळ काही नसतो. पण तो आल्यावर आपल्या आयुष्याचं सोनं करतो. हळव्या आठवणी जाग्या करतो. ठिसूळ उमेदीला उभारी देतो. स्वप्तरंजनाला भरारी देतो. कारण त्यानं अन् पावसानं आपल्या आसुसलेल्या मनावर मनापासून नितांत प्रेम केलेलं असतं. आपल्या तयारीवर, सजगपणावर किंवा बाह्य सौंदर्यावर कधीच ते भाळले नसतात. त्याला मी आवडते आणि मला तो आवडतो, एवढंच काय ते दोघांचे नाते..पाऊस मला आवडतो आणि तो माझ्यासाठी व्याकूळलेला असतो एवढंच! पावसाची सोशिकता त्याला चक्क केरळ, कर्नाटक, गोवा ओलांडून आपल्यापर्यंत येण्यास भाग पाडीत असते. तसंच त्याचं प्रेम दृष्य-अदृश्य संकटांवर मात करून आपल्यापर्यंत पोहचत असतं. सुखाची गर्द सावली देत असतं. नकळत आपलंस करीत असतं. त्याच्या येण्याचा आणि न येण्याचा एवढा टोकाचा फरक आपल्याला जाणवतो.
असा हा पहिला पाऊस जुन्या आठवणी ताज्या करून जातो आणि नव्यांची मुहूर्तमेढ करण्यास जराही विसरत नाही. माझ्या, तुमच्या, आपल्या सर्वांच्या आयुष्यात... हो ना....खरंय ना...! 

No comments: