My Blog List

Thursday, 31 December 2015

'पुरस्कार'मय वाटचाल २०१५ ची.....

नवीन वर्ष नवीन सुरुवात... ३६५ पानांची नवीन वही परत एकदा उघडुन श्रीगणेशा करायचा... नवीन रस्ते नवीन वाटा काबीज करत नवनवीन ध्येये गाठायची... दर वर्षीच हे होते .... १ जानेवारीला नवीन वर्षाचे स्वागत करुन या वर्षी काहीतरी वेगळे करायचे हे ठरवतो व काही so called resolutions सुद्धा करतो...

वर्षे जातात अन् येतात... काळ काही थांबत नाही... शेवटचा दिवस आला की मग वर्ष भराचा हिशोब लावायला सुरुवात होते... जुनी आणि जीवाभावाची नाती तुटतात.. त्याची उणीव पुर्ण करण्यास नवीन नाती आयुष्यात येतात..जुने ते सोनंच असते असे बरेच वेळेस वाटते.... नवीन नात्यात आपण जुना गोडवा शोधण्यास जातो आणि काही वेळेस मृगजळच हाती लागते... पण म्हणुन काही आयुष्य थांबत नाही... आणि वेळही नाही... ते तसेच चालु रहाते, किंवा राहु द्यावे लागते... नवीन गोष्टीच्या स्वागतासाठी व नवीन सुखाच्या शोधासाठी...

तसे माझ्याबाबतीतही झाले... २०१५ ने मलाही असे बरेच काही दिले...मागच्या वर्षभरात खुप काही घडले... खुप नवीन ठिकाणे फिरले ...बरेच नवीन मित्र मिळाले तर काही जुने दुर गेले... नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या आणि काही राहूनच गेल्या...

पत्रकारिता क्षेत्र हे काय आहे हेच माहिती नसणारी आज मी पत्रकारिता क्षेत्रात इतकी रुळले की २०१५ ने मला खुप सर्प्राइझ दिले.... आदर्श महिला पत्रकार पुरस्काराने.... माझ्या आयुष्यातला हा पहिलाच पुरस्कार होता. पण माझ्या तब्बेतीने साथ दिली नाही आणि त्या पुरस्कार सोहळ्यात प्रत्यक्ष जाऊन पुरस्कार स्विकारणे जमले नाही. एक महिना केईएम हॉस्पिटलमध्ये घालविल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केली आणि त्यावेळी ठरवलेच होते...आयुष्यातील पहिला पुरस्कार प्रत्यक्ष स्विकारणे जमले नाही म्हणून काय झाल? हा काही शेवटचा पुरस्कार नाही. २०१५ हे वर्ष माझ्यासाठी पुरस्काराचे वर्ष ठरले अस म्हटले तरी चालेल....नुकताच नवनिर्मिती फाउंडेशन तर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कार देणार्यांचा उद्देश जरी चांगला असला तरी माझ्या सारख्या अनुभवाने आणि वयाने लहान असणाऱ्या मुलीला जीवनगौरव पुरस्कार हे गणित मला पटले नाही आणि मी त्या पुरस्कारासाठी नकार दिला. माझ्या मतांचा मान राखून अखेर त्यांनी मला जीवनगौरव पुरस्कारा ऐवजी आदर्श महिला पत्रकार पुरस्कार २०१५ जाहीर केला.
वर्षाची सुरुवात एकदम छान एक अविनाशी झेप मासिकाच्या प्रकाशनाने झाली..was one of the best days of life... खुप सारी स्वप्ने पुर्ण झाली... २०१५ च्या प्रवासात कविवर्य अशोक बागवे, पहिल्या महिला Brandguru जान्हवी राऊळ यासारख्या अनेक मान्यवरांसोबत प्लॅटफॉर्म शेअर करण्याची संधी मिळाली. अनेकानी कौतुकही केले ..... सर्वांच्या कौतुकात एकच वाक्य .... लहान वयात खुप मोठी झेप घेतली आहे... पण मला अस वाटत झेप घेण्यासाठी फक्त उडण्याची जिद्द हवी.... बाकी नंतर तर आकाश ही आपल्याला मिठीत घेते.... २०१५ ने जशा चांगल्या गोष्टींचे सर्प्राइझ दिले तसे अनेक वाईट घटनांचे देखील सर्प्राइझ दिले. तर काही इच्छा अधुर्‍याच राहील्या...

नवीन वर्षात ह्याच अधुर्‍या गोष्टी पुर्ण करायच्या आहेत.. नवीन मित्र मिळवायचे आहेत.. नवनवीन ठिकाणे explore करायची आहेत..आजपर्यंत तुम्हा सर्व मित्र आणि मैत्रीणींच्या प्रेमामुळे आणि सहकार्याने नव्या वर्षाची सुरुवात आणखी एका नव्या उपक्रमाने करणार आहे. हा उपक्रम लवकरच मी आपणासमोर आणणार आहे. ज्याप्रमाणे २०१५ या वर्षात तुम्ही सर्वानी मला फेसबूकच्या माध्यमातून माझ्यावर प्रेम करत आला आहात त्याचप्रमाणे येणार्या २०१६ वर्षात त्यापेक्षा जास्त प्रेम कराल हीच एक अपेक्षा....
तुमचेही असेच काहीतरी ठरले असेल नं.. तेव्हा त्यासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा...हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना समाधानाचे, सुखसमृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच ईश्वराचरणी प्रार्थना....
हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवा...
pramilamhane.blogspot.com

Sunday, 20 December 2015

वाहनांच्या मागे लिहिलेल्या पाट्या आणि वाहनचालक.....

अनेकदा आपण प्रवास करताना वाहनांच्यामागे लिहिलेल्या पाट्या वाचण्यात येतात. यातील काही विनोदी असतात तर काही वाक्य हे प्रवासातील आनंद देणारे असतात.... तर काही वाक्यांतुन आयुष्याची उकल दिसुन येते. पण जे जे वाक्य ज्या ज्या वाहनावर लिहिले त्यानुसार त्या त्या वाहनचालकाचे निरीक्षण कधी केलय का?.... 

जर एखाद्या वाहनावर लिहिले असेल की, 
बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने! तो वाहनचालक हमखास गाडी चालविताना ओव्हरटेक करेलचआणि ओव्हरटेक केल्यानंतर मागच्या वाहनचालकाने जास्त नखरे केले तर आहेच मागची पाटी 'ओव्हरटेक केलय वाघाने' आता मागचा वाहनचालक वाघापुढे काय गुरगुरणार? 
साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस....असे वाक्य जरी एखाद्या वाहनचालकाने त्याच्या गाडीवर लिहिले असले तरीही मध्येच रस्त्यावर एखादा अपघात झालेला पाहुन त्याठिकाणाहुन हळूहळू गाडी चालवित तो अपघात पाहुनच तो पुढे जाईल.... पण जखमीला मदत करण्याची रिस्क तो घेणार नाही... 
अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही, असे वाक्य लिहिलेला वाहनचालक नक्कीच सिग्नल मध्ये उभा असुन सुध्दा लागोपाठ हॉर्न वाजवताना दिसेल....
सासरेबुवांची कृपा..... असे ज्या गाडीवार लिहिले असेल ते वाचून त्या गाडीच्या वाहनचालकाने नक्कीच श्रीमंत घरची बायको केली असणार किंवा ती गाडी त्याला हुंड्यात मिळाली असणार.... असा विचार तुमच्या डोक्यात येतोच ना....
तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं..माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा.....आणि जर तोच वाहनचालक स्पीड ब्रेकरवरुन दणादण गाडी आपटून जात असेल तर ..... आतली माणसे किती लाख मोलाची असतात याचा अंदाज येतोच की.... 
भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"....... हे वाक्य वाचुन मागचा वाहनचालक बिचारा घाबरतो आणि त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.... पुढे जाणाऱ्या गाडीवर लिहिलेल असत.... तुमचे लक्ष आमच्याकडे का?
बाकी पुण्यातील दुचाकी स्वार हे म्हणजे अजब प्रकरण आहे. एरवी ऑफिसात वगैरे अगदी नम्रपणे वागणाऱ्या व्यक्ती सुद्धा जेव्हा दुचाकीवर स्वार होतात तेव्हा त्यांच्या अंगात काय वारं संचारतं कोण जाणे! बहुतेक दुचाकीच्या वेगाने ह्यांच्या पार डोक्यात वारं घुसत असावं. कारण हेल्मेट वगैरे घालणं हे भ्याडपणाचं लक्षण समजलं जातं ना! 
रिक्षामध्ये जीव केवढासा, पण शेजारून जाणाऱ्या सुमोशी वेगाची स्पर्धा करतील. अचाट आत्मविश्वास! आणि ह्यांची खासियत म्हणजे एखाद्या सिग्नलला पार डाव्या लेन मध्ये उभे असतील, पण सिग्नल सुटायच्या वेळी काय एकदम विचार बदलतील आणि चक्क उजवीकडे वळणार. बाकीचे वाहनचालक कितीही शंख करत असतील तरी बेहत्तर. बर रिक्षाचा एवढा सूळसुळाट आहे तरी तुम्हाला काही कामासाठी रिक्षा हवी असेल तर आजिबात मिळणार नाही. कोठ्ल्याश्या स्टॅण्ड वर रिक्षा लावून हे सगळे चकाट्या पिटत बसणार.
एखादा धूर्त “कुंपणावरचा” कार्यकर्ता त्याच्या गाडीवर “साहेबांची कृपा” लिहील. आता साहेब हे सर्व पक्षात आहेत त्यामुळे ह्या पठ्ठ्याची निष्ठा गुलदस्त्यात. ह्यांना आपली गाडी म्हणजे रणगाडाच वाटतो. आणि ह्यांची गाडी सरळ लाईनीत कधीही जाणार नाही. सारखे लेन बदलणार. जणूकाही गाडीत डीझेल बरोबर रात्री नं संपलेली “देशी” पण मिसळलेली आहे. आणि खुशाल चुकीच्या बाजूने गाडी चालवतील. तेही गाडीचे डोळे वटारून, म्हणजे हेडलाईट लावून. आणि पोलिसांचा सुद्धा ह्यांच्याकडे कानाडोळा. बिचारे म्हणत असतील, “न जाणो खरच कुठल्या दादांची कृपा असेल तर आपली बदली व्हायची!”

Thursday, 10 December 2015

...हे त्या दारूबंदी नाकारणार्‍यांना काय माहिती?

जेव्हा एका स्त्रीचा नवरा दारू पिऊन घरी आल्यावर काय दंगा करतो आणि घरातील मुलांच्या नजरेत बेवड्या बापाचा काय तमाशा होतो, हे मंत्रालयातील खुर्चीवर बसून दारूबंदी करणे शक्य नाही, असे उत्तर देणार्‍यांना काय माहित? ‘‘ गावातील इतरांप्रमाणं माझे बाबाही दारू पितात. आईनं कष्टानं कमवलेले पैसेही जबरदस्तीनं दारूसाठीच खर्च होतात. आमच्या भविष्याचं काय?’’ असा प्रश्‍न विचारताना जेव्हा चिमुरड्यांच्या डोळ्यात अश्रु येतात, त्या अश्रुंची कहाणी या दारूबंदी नाकारणार्‍या मंत्र्यांना काय माहित? अनेक घरात वडिल कामावरून घरी येण्यापुर्वी शांतता पसरते. का तर....आता वडिलांची कामावरून घरी येताना दारू पिऊन येतील आणि आपण काही चुकीचे वागलो तर आपल्याला फटके बसतील, कधी कधी तर नशेत मेणबत्तीचे चटकेही मिळतील...म्हणून ती शांतता...पण त्या शांततेचा आवाज राजकीय टिका करण्यात व्यस्त असणार्‍या दारूबंदी नाकारणार्‍या मंंत्र्यांच्या कानी कधी पोहोचणार आहे काय?
हिवाळी अधिवेशन सुरू आहे...आज खेडोपाड्यातील अनेक महिला कधी टि.व्ही.कडे ढुमकूनही न पाहणार्‍या त्या महिला दारूबंदीची घोषणा ऐकण्यासाठी हिवाळी अधिवेशन पहात आहेत. कारण या दारूपायी या गावातील अनेक घरांची धूळधाण झालीय. अनेक संसार देशोधडीला लागलेत. अनेक महिलाचं कुंकू पुसलं गेलं तर अनेक म्हातार्‍यांनी आपला कर्तासवरता मुलगा या व्यसनापायी गमावलाय. शालेय जीवनातील कोवळं वय असणारी १५ ते २० वयोगटातील मुलं आता चक्क दारूच्या अधीन झालीत. आई-वडिलांना रोज शिवीगाळ, दारूसाठी पैसे मागणं आणि नाही दिले तर मारहाण इतक्या खालच्या थराला ही मुलं गेलीत. इतकंच नाही तर या दारूसोबतच आता गुटखा, सिगारेट, मटका, जुगार, पत्ते या सर्व गोष्टींकडंही तरुण पिढी वळताना दिसतेय. पण दारूच्या व्यवसायाने लाखोंची कमाई करून दारूबंदीला नाकारणार्‍या त्या मंत्र्याला काय देणंघेणं?
जेव्हा रात्रीच्या वेळीस एखाद्या नाक्यावरून एक मुलगी एकटी घरी जाते आणि त्या नाक्यावर असलेल्या दारूच्या दुकानांवर बाटल्या हातात पकडून उभ्या असलेल्या त्या दारूड्यांच्या नजरा काय बोलतात हे अधिवेशनात बसून दारूबंदी नाकारणार्‍या त्या मंंत्र्याला काय समजणार? शेवटी एकच...दारूबंदी झाली नाही तर बाकी उरेल ती अनेक संसारांची राखरांगोळी.....