My Blog List

Tuesday, 31 May 2016

हॅपी बर्थ डे संजय खापरे....

प्रिय संजय दा...
हॅपी बर्थ डे! तुझ्या वाढदिवसानिमित्त आज ‘सोशल मीडिया’वर शुभेच्छांचा भरभरून वर्षाव सुरू आहे. तुझा अभिनय किती प्रचंड प्रमाणात लोकांना भावला, हे त्यातून समजतं... तुझ्यावर भरभरून लिहिलं जातंय... तुझा सगळा प्रवास नव्यानं एकमेकांना सांगितला जातोय. त्याची उजळणी मी करणार नाही; पण तुझी फॅन असल्यानं आज वाढदिवसाचं निमित्त साधून माझ्यासारख्या अनेकांच्या तुझ्याकडून किती अपेक्षा आहेत, हे सांगणं मला आवश्यक वाटतं.

संजय दा...आजचे तरूण-तरूणी 'कळत नकळत' सारख्या सामाजिक बांधलिकीचे आणि संवेदनशील नाटक नाट्यगृहात जाऊन पाहू लागले आहेत, याच्या श्रेयाचे वाटेकरी अनेत असतील, पण त्यातील सिंहाचा वाटा तुझाही आहेच. 'कळत नकळत' नाटक बघितले नाही, असा तरूण अद्यापपर्यंत माझ्या पाहण्यात नाही....मराठी नाटकाला तू फ्रेशनेस दिला. ग्लॅमर दिलं. अभिनय व संवाद आणि त्यासोबतच भूमिकेत समरस झालेले तुझे ते चेहऱ्यावरचे हावभाव याची ताकद तू दाखवून दिलीस. आजकाल बॉलिवूडमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी मेकअप, सीनरी यांसारख्या विविध घटकांचा वापर केला जात असताना तू केवळ आपल्या बोलण्याच्या जादूने मराठी प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
‘कळत नकळत’मधला विश्वास जसा बोलण्याच्या जादूने रसिकाला तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडतोस, तसाच तु प्रेक्षकांनाही तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडतोस. संवाद फेकतेक्षणी तुझ्या चेहर्या वरील चढउतार कधीही कृत्रिम वाटत नाही. हा आणखी एक आठवलं...तु फक्त हिरोच्याच नाही तर व्हिलनच्या भूमिका केल्या आहेत ना...आठवतंय मला तो 'दगडी चाळ' मधला ‘चंदू उर्फ मामा’.... मनात खोलवर दाबून ठेवलेला राग काढतेवेळी चेहर्यावर येणारा संताप सहजरीत्या तुझ्या अभिनयातून पहावयास मिळते. बॉलीवूड-टॉलीवूडमध्ये एखाद्या व्हिलनची भूमिका उठविण्यासाठी काय काय ते टेक्नॉलॉजी वापरतात. पण तुझ्यातल्या त्या आवाजातला दरारा आणि डोळ्याद्वारे प्रदर्शित केलेले जिवंत भाव, तसेच दर्शकांच्या मनात होणारी कालवाकालव यामुळे तुला कधी अॅ्क्शन करण्याची गरजच पडली नाही. संपूर्ण चित्रपटभर तुझ्या संवादांचं गारुड, तुझा उत्स्फूर्त अभिनय, भारून टाकणारा वावर असल्यावर आणखी काही ‘ट्रिक’ वापरण्याची गरजच पडत नाही. ‘रेती’सारखा वेगळा विषय; पण या चित्रपटाचे बळच तुझा अभिनय होते. वाळूमाफियांच्या विरूद्ध आवाज उठविताना समाजसेवक बनून तुझ्या बोलण्यातील जी जादू पाहिजे ती संजय दा शिवाय दुसऱ्या कोणाकडे असणार? ’मर्डर मेस्त्री’ चित्रपटातील दारूड्या माजी सरपंच बनून ‘माधव मेस्त्री’ जो तु समोर आणलास त्यातून अनेक पुरूषांच्या मनातली गोष्ट तू समोर आणलीस. विनोदी अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अभिनयाची मोहर उमटविताना आज तू बहूरूपिया अभिनेता बनलास.

आता तर मी ऐकलंय की तु तुझ्या आगामी 'डिस्को सन्या' या चित्रपटातून एका कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नेहमीप्रमाणे हटक्या भूमिकेत एंट्री करणार आहेस. तुझा हा सगळा प्रवास ‘लय भारी’ वाटतं रे...'डिस्को सन्या' फिल्ममधून होणाऱ्या तुझ्या या नव्या एंट्रीमूळे आता आमच्या तुझ्याकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. आजपर्यंत ज्याप्रकारे तु स्वतःला विशीष्ट प्रकारच्या भूमिकेत अडकवून न ठेवता 'बहूरूपिया' कलाकार बनलास, त्याचप्रमाणे तु तुझ्या पुढील वाटचालीतही अशाच भन्नाट भूमिका घेऊन येशील आणि मराठी चित्रपट-नाट्यक्षेत्रात तुझ्या अभिनयाचा दबदबा आणखी वाढत जाईल, हीच एक अपेक्षा....आमच्या सगळ्या अपेक्षांचं ओझं तुझ्यावरच आहे. कदाचित तुझ्या नेहमीच्या ताकदीनं युक्तिवाद करशील. कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्री काही ठरवत नाही, तर त्याने काय करावे, हे दिग्दर्शक आणि निर्माता ठरवतो. त्याचे यशापयश प्रेक्षकांच्या मर्जीवर असते, असेही म्हणशील; पण तुझ्यात क्षमता आहे, अभिनयाची ताकद आहे, चित्रपट स्वत:च्या खांद्यावर पेलण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे तुझ्याकडूनच आशेचा किरण आहे. तूझ्या या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकेत आपली अभिनयाची ताकद दाखवून तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लाखो फॅन्सना दरवर्षी वाढदिवसाची अमूल्य भेट द्यावी. हे ‘गिफ्ट’ घेण्याचा रसिकांना निश्चितच अधिकार आहे! तुझ्या वाढदिवसाची हीच भेट हवी.

तुझी फॅन
प्रमिला पवार

No comments: