My Blog List

Wednesday, 16 November 2016

तुझा रुसवा....


हो , तुझा रुसवा
जसं तुझं प्रेम तसाच तुझा रुसवा
तो सुद्धा मला हवाच असायचा
मना पासून म्हणावसं वाटतं, किती देशील दोन करांनी...?
तुझा माझ्या रागवण्यासाठी आपल्याला कोणतेही कारण चालायचं... मग मला आवडणारा गायकही पुरेसं कारण आहे रागविण्यासाठी....
वादही व्हायचे आपले आणि त्यानंतर यायचा तो अबोला
हवा हवासा , हो मला तरी तो अबोला आवडायचा....
तुला माहीत आहे , तू जेव्हा अबोल असतोस तेव्हा जास्त बोलतोस
तुझ्या आठवणीतुन...एखाद्या तिरप्या कटाक्षाने सुद्धा खुप काही सांगून जातोस...
तेच मला आवड़ायचं
अजुनही आवडतं...
तुझा राग अनावर झाला की मग मात्र खऱ्या अर्थाने बहार येते...
फोन बंद
Watsapp बंद
संवाद तर एकदम बंद!!!
पण शुकशुकाट नाही...कारण तुझी चूळबुळ अखंड चालू असते
मुद्दाम माझ्या समोर भिरभिरतोस
तुझं जवळ 'असणं ' जाणवून देतोस
अचानक अनोळखीही होतोस , typical मुलांसारखं....
खुप आवडतं मला आणि ते मला आवडत आहे हे बघुन तू आणखी चिड़तोस....
सुख सुख म्हणजे दूसरं काय असतं?
आपल्याशी कोणीतरी हक्कानं भांडणारं आहे हे ही एक समाधान....
बरं तू बोलत नाहीस म्हणून गप्प बसणे हा उपाय अजिबात नाही....
कारण तुझी समजूत काढण्यासाठी पुढाकार मीच घेतला पाहीजे हा अलिखित नियम....
त्यात सुद्धा स्वार्थ माझाच असायचा; कारण ती सुद्धा माझ्या साठी एक पर्वणी....
हळूहळू तुझा राग निवळायचा
मग आपल्याच रुसव्या फुगव्याच्या आठवणी काढायच्या आणि मनसोक्त हसायचं...
सगळंच सुंदर आणि लाघवी!!
......आता सगळंच अनोळखी
या वेळचा अबोला थोड़ा जास्तंच टिकला ना ?
मला सुद्धा ही जाणीव थोड़ी उशिराच झाली....
पण आता राहवत नाही...
राहून राहून पुन्हा त्या दिवसांची आठवण येतेय....
फ़क्त एकदा माझं ऐकशील ?
सोड ना हा तुझा रुसवा...!
रुसण्यात काय हर्ष आहे ?

No comments: