My Blog List

Friday, 16 December 2016

'तो आणि ती' च्या गोष्टी.....

भाग १

आज तिला नक्कीच कसलं तरी दु:ख झालं होतं....मन कशाने तरी नाराज झालं होतं....पण फक्त मन नाराज झालं म्हणुन दिवसभरची कामं पेंडींगच्या टोपलीत टाकता येत नाही! म्हणुन दिवसभर ती तिच्या चेहऱ्यावर आनंदी मुखवटा लावुन तिचं हरवलेलं आनंदीपण मिरवत होती....रात्रीचं जेवण झाल्यानंतर बेडरुममध्ये जाउन पलंगावर तिने आपलं शरीर अलगद टाकुन दिलं.....तितक्यात फोनची रिंगटोन वाजली.....

ती: हल्लो!
कविता: ए म्हशे भेटला का वेळ तुला माझा फोन उचलायला.....????
कविता ही तिची लहानपणीची मैत्रीण....दोघींमधलं प्रेम हे त्यांच्या एकमेकांना शिव्यायुक्त आदरातुनच व्यक्त होत असतं....आणि तिला 'ए म्हशे' असं बोलण्याची हिम्मत ही फक्त कवितामध्येच होती....
ती थकलेल्या आवाजात....
"हा बोल ना, अगं सॉरी....हल्ली माझा मोबाईल सायलेंटवर असतो....त्यामुळे तुझा कॉल आलेला कळत नाही....
कविता: बरं ते जाउदे....तुझं जेवण झालं का?
ती: हो...
कविता: खाली ये मग पटकन....मला तुझ्याशी बोलायचंय.....
ती: बरं बाई....आली मी....

तिने जरा हालचाल केली तेव्हा तिला कळलं की तिचं अंग जरा आखडलंय. मान गोल गोल फिरवताना तिला जाणवलं की ती पलंगावर  पडल्या पडल्या तिचा डोळा लागला होता.....कुणाची तरी वाट बघत होती. मग हळूहळू तिला सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागायला लागला. तिने चटकन मोबाइल हातात घेतला, तर कुठल्याच मेसेजचा पॉप अप नव्हता. तिला प्रचंड चीड आली स्वत:चीच. ती उठली आणि बिल्डींगखाली निघाली कविताला भेटायला....

एरवी गजबजलेली डोंबिवली रात्री मात्र अगदी शांत आणि सुरेख वाटत होती. आसपास फारशी माणसं नव्हती. मागील रस्त्यावर गाड्यांची ये जा ही नव्हती. होती ती फक्त निरव शांतता आणि सोबतीला आकाशात पसरलेलं छान शुभ्र चांदणं. त्या रात्रीची जादू काही औरच होती.

कविता: काय झालंय तुला?
कविताचा स्वभाव तसा डायरेक्ट विषयाला हात घालण्याचा....नो झिकझिक....कविताच्या या प्रश्नाने मात्र तिच्या चेहऱ्यावर मोठा प्रश्न उभा ठाकला होता....
ती: कुठे काय? (सांगाव की नाही हा विचार मनात फिरत असतो)
कविता: हे बघ, तुला नसेल सांगायचं तर सांगु नकोस....पण खोटं बोलु नको....तुझे व्हॉट्सॲपवरचे स्टेटस, फेसबुकवरच्या पोस्ट, सायलेंट मोबाईलप्रमाणेच तुझे ही सायलेंट होणे हे पुरेस झालं मला कळण्यासाठी.....

ती: (आता लपविण्यात काही ही अर्थ नाही हे समजुन) कविता, मी सध्या खुप गोंधळलीये....म्हणजे चुक काय अन बरोबर काय याचं कोडंच उलगडत नाही.... सुंदर नाते जपायचे असेल तर या अश्या छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. मधून मधून भांडण, वाद हे होणारच, पण ते किती ताणायचे आणि कुठे थांबवायचे हे आपल्याला समजायला हवे. एकमेकांबद्दल विश्वास ,प्रेम आणि समजून घेण्याची इच्छा असेल तर मनाशी मनाचे नाते जुळून त्याची घट्ट रेशीमगाठ व्हायला वेळ नाही लागणार. पण हे एकानेच समजुन घेउन काही होणार आहे का? समोरच्यालाही ते समजले पाहीजे ना....

( दिवसभरात चेहऱ्यामागे अबोल पडलेला तिचा  मुखवटा आता मनातल्या गोष्टी बोलु लागला होता....आणि ते ही नॉनस्टॉप....)
तिच्या मनातली चलविचल कविता समजुन गेली....आणि तिला आणखी मोकळं होण्यासाठी तिच्याशी बोलु लागली....आणि शांत झालेली रात्रही आता बोलकी होउ लागली होती....

व्हॉट्सअ‍ॅपवर धडाधड मेसेजेस धडकले. तिने सवयीने त्याचेच असतील म्हणून पटकन फोन हातात घेतला. अर्थात व्यर्थ. बॉसने आजच्या कामाचं शेडय़ूल होतं.

खरंतर तिला आशा होती सगळं भांडण विसरुन तो तिला मेसेज करेल याची,  पण नाहीच.अर्ध्या तासापुर्वीच तीचं त्याच्याशी पुन्हा भांडण झालं होतं.हल्ली रोजच होतं.पहिल्यासारखी ओढच नाही राहिली. रोजरोज 'ऑफीसमद्ये आहात का? ठीक आहे मग नंतर कॉल करते'
या असल्या नीरस संवादांना दोघंही वैतागलेली.आज शेवटी निर्णय झालाच.
lets have a break...
तिला हवा होता का???
माहीत नाही.खरंतर तो आयुष्यात आला तेव्हा तिला तो हवा होता का? हे देखील तिला माहीत नव्हतं.असंच बोलायचे ते.तो आयुष्यात येताना आणि जातानाही ती तेच तीन शब्द बोलली,
"as your wish"...

-प्रमिला पवार 

No comments: