My Blog List

Monday, 24 December 2018

कदाचित म्हणूनच एकटं एकटं वाटतंय...!


आज पुन्हा त्याच वळणावर आल्यासारखं वाटतंय 
भरल्या डोळ्यांनी पुन्हा आरशासमोर बसावं वाटतंय
आणि मग आपलं कुणीच नाही असं म्हणून 
स्वतःच स्वतःचे डोळे पुसावं वाटतंय.... 

कधी सोबत नव्हतास माझ्या 
आणि या गर्दीत सोडलंस माझं बोट 
शोधतायेत लोक तुला अजूनही माझ्यासोबत
कदाचित म्हणूनच एकटं एकटं वाटतंय...


जागा आहे चंद्र अजूनही,
वादळही जागं आहे...
पण या वादळात तू मात्र हरवलास असं वाटतंय 
कदाचित म्हणूनच एकटं एकटं वाटतंय...

काल तू असतानाही वाटायचं 
आज तू नसतानाही वाटतंय 
खूप दिवसांनी मला वाहायचं होतं
पण या नदीला कधी किनारा भेटला नाही 
कदाचित म्हणूनच एकटं एकटं वाटतंय...
-प्रमिला म्हणे

Sunday, 14 October 2018

का नाही एकत्र येऊ शकलो ?????

का नाही एकत्र येऊ शकलो 
फक्त एकच तर चूक झालेली ...
तू बामनाचा मुलगा होता 
आणि मी बौद्धांच्या घरात जन्मलेली 

का नाही एकत्र येऊ शकलो 
फक्त एकच तर चूक झालेली ...
तो दसरा साजरा करत होता 
मी अशोक विजयादशमी साजरी करत होती 
दोन हात जोडून तो जय नमस्कार करीत होता 
तेच दोन जोडून मी जय भीम घालत होती 

हिंदू असूनही पांढऱ्या कपड्यात आंबेडकर जयंती साजरी करणं चुकीचंय का ? 
आणि बौद्ध असूनही प्रेमाची गुढी उभारणं चुकीचंय का ?

तो दररोज सकाळी गायत्री मंत्राने जप करत होता 
मी बुद्धवंदना करत होती 
तो श्रावण महिना पाळत होता 
आणि मी वर्षावास करत होती 

का कोण जाणे पण..  
हिंदू-बौद्ध च्या नावाने लोक एकमेकांचे वैरी बनले 
ए,हिंदू-बौद्ध ची तेढ निर्माण करणाऱ्यांनो...
बौद्ध पौर्णिमेच्या चंद्रात आजही तोच मला दिसतो 
आणि कोजागिरीच्या त्या देखण्या चंद्रात तो आजही मलाच शोधतो.....
कोजागिरीच्या त्या देखण्या चंद्रात तो आजही मलाच शोधतो.....

प्रमिला पवार 

Tuesday, 9 January 2018

....तर जरा थोडं थांब!!!

शेड्युलच इतकं बिझी होत गेलं की कित्येक महिने काही लिहायला वेळ मिळत नव्हता... गेल्या चार दिवसापासून कर्नाटकात मोकळा वेळ मिळाला तेव्हा ही कविता सुचली...कवितासारखी ही कविता करता आली नाही... पण प्रेमाला शब्द कशाला हवेत? नै?


पुर्वी तुझं मन एकटं खेळत होतं...
आता त्याच्यासोबत खेळु लागलंय...
पण जर तु या लव्ह ॲट फर्स्ट साईडला प्रेम म्हणत असशील तर थोडं थांब.... 

कारण या जगात खेळ खेळण्यासाठी देखील आपण नियम आखतो....मग प्रेमाच्या खेळातले नियम कसे काय विसरलीस?
बस फक्त रात्री-मध्यरात्रीपर्यंत आपण एकमेकांच्या गप्पांमध्ये रंगतो आणि तु याला प्रेम म्हणत असशील तर थोडं थांब... 

आणि जेव्हा कोण्या मित्राचं कौतुक करताना तो तिला टाळतो आणि कोण्या मैत्रिणीचं कौतुक होत असताना तीचं मनात एक आणि चेहऱ्यावर एक भाव दाखवणं....
पण तु या क्युट जेलसीला प्रेम म्हणत असशील तर जरा थोडं थांब....
कारण यार जगात जळुन खाक झालेल्या कोळशाचाही इंधन म्हणून वापर करतात.... 

बस फक्त आता... आता... आपण एकमेकांची मुकी मनं ओळखु लागलोयेत...
आणि याला तु प्रेम म्हणत असशील तर जरा थोडं थांब!!!
लक्षात घे की वृद्धाश्रमातले दोन वृद्ध एकमेकांचं एकटंपण समजु शकतात... पण ते दोघे एकमेकांना त्यांचं घरपण तर नाही देउ शकत ना.... 

अरे जर तिच्या मोबाईलवर बॉयफ्रेंडचा कॉल येतो, तेव्हा तो मुद्दाम डिस्टर्बंस क्रीएट करतो.... आणि याला जर तु गोड प्रेम म्हणत असशील तर जरा थोडं थांब!!!!


कारण शोन्या, Luxury मधे लोळतांना फाटकं गावही कधी कधी आपलं वाटतं... जवळचं नातं असलं तरी सांगायलाही नको वाटतं...


हा पण... तो दु:खी असताना त्याचे प्रत्येक अश्रू तुझ्याच ओढणीवर ओघळत असतील....
जर तो आयुष्यातलं सगळं टेंशन विसरुन तुझ्यासोबत अगदी बच्चू होउन त्याचं गमावलेलं लहानपण शोधत असेल...
जर तुझी पोल एखाद्याने उघड करण्याअगोदरच त्याने सगळे सिक्रेट्स तुझ्यापुढे खुले केलेत...
आणि त्याच्या चेहऱ्यावरील हास्याचं कारण तुझं बालीशपण असेल तर... ????

तर... तर...तर नाही यार... यालाच तर प्रेम म्हणतात...
आणि या प्रेमानीच सगळं तिला सांगुन टाक...
मनातले ते बंदिस्त वाक्य आज तू बोलून टाक...

कारण यार पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरी, इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड या सगळ्या गोष्टी मिळुनही अनेकजण प्रेमाने भिकारी बनतात....