काही दिवसांपूर्वी #अरविंद_बनसोड, आणि आता #विराज_जगताप...फक्त जातीपलीकडे प्रेम केलं म्हणून लोखंडी रॉड डोक्यात घालून हत्या
गेल्या काही वर्षांत शिरसगाव, खैरलांजी, सोनई,जवखेडा, खर्डा, नामांतर दंगल ते आतापर्यंत.....गाव आणि दलितवस्ती यांच्या दरम्यान खूप काही गोष्टी सतत घडत असतात. येताजाता टोमणे मारणं, घालून पाडून बोलणं, चारचौघांत अपमान करणं, गावातल्या कार्यक्रमांपासून हेतूतः दूर ठेवणं, सत्तेचा वापर करून प्रत्येक गोष्टीत अडवणूक करणं...जातीय अहंकाराचा जाळ मनात सतत धगधगता ठेवला जातो. त्यात प्रेमप्रकरणाचा सुगावा लागला की धडा शिकवण्याची तयारी सुरू होते. ठेचून काढण्याची मानसिकता पिकलेल्या फोडासारखी ठसठसू लागते आणि एकदम विस्फोट होतो. पण या स्फोटाचे ध्वनी सगळीकडे पसरतात ते बाहेरची माणसं वस्तीवर येऊन गेल्यानंतरच. त्याच्या पडसादानंतरच यंत्रणा हलू लागते. खैरलांजीच्या अत्याचाराला किती दिवसांनी वाचा फुटली हे सर्वांना ठाऊक आहे. देवपूर आणि खर्डा त्याला कसं अपवाद असेल?
#बौद्ध आणि मागास जातींतील नव्या पिढीत निर्माण झालेली प्रगतीची महत्त्वाकांक्षा पिढानपिढ्या सवर्णाचा माज चढलेल्या सरंजामी सरदारांना व्यथित करत आहे.
#दलित सुरक्षित राहतील का? हा प्रश्न तेव्हाही होता आणि आताही तोच प्रश्न आहे...फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन दलितांच्या मतांचा सत्तेसाठी वापर करून घेणारे हे राजकीय दलाल घटनास्थळी भेटही देतील, हत्येचा तपास फास्ट ट्रॅकने चालवा अशा सूचना देऊन #दलित_अत्याचाराबाबत डोळ्यावर कातडे ओढून घेतील...दलितांवर कितीही आणि कसलेही अत्याचार करा ओ, काही बिघडत नाही आपलं, सत्तेत आपलेच भाईबंद खुर्ची गरम करत बसलेले असतात, एका कॉलवर हत्येची आत्महत्या करता येते, असा एक वाईट संदेशच या गिधाड्यांमध्ये पेरला असल्यामुळे इतक्या वर्षांनंतरही दलित सुरक्षित आहेत का? हा प्रश्न जशाच्या तसाच आहे. या जातदांडग्यांना प्रशासनाच्या उदासीनतेतूनच मानवताद्रोही राक्षसी मनोबल मिळतंय आणि त्यातून दलित्यांच्या हत्या होतात हे उघड आहे. #खैरलांजीपासून ते आता अरविंद बनसोड हत्याप्रकरण पर्यंत बहुतांश घटनांमध्ये शोषणकर्ते हे कुठे ना कुठे #राजकीय पक्षाशी गणगोत सांगणारे असल्याचे वेळोवेळी दिसून आलंय. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या जोडीला रिपब्लिकन नेत्यांची सेटिंगगिरी, समाजवाद्यांची उदासीनता, डाव्या पक्षांची केवळ हजेरीपुरती उपस्थिती, मुजोर शासन, आळशी आणि असंवेदनशील प्रशासन, कासवाच्या गतीची न्यायपालिका आणि जातीपातीचा सरंजामी माज असा हा जीवघेणा चक्रव्यूह आहे.
#दलितांची हत्या करणाऱ्या या गिधाड्यांनी आता क्रौयाची परिसीमा गाठली आहे, तात्पर्य काय? तर राज्यकर्त्यांना दलित, आदिवासी, मागासवर्गीय समाजाच्या सुखदु:खाबद्दल काही देणे राहिलेले नाही. त्यांना फक्त या समाजाची मते हवी असतात. एरव्ही त्यांचे अस्तित्वही त्यांना नको असते. म्हणून राज्यकर्त्यांची ही बेफिकिरी इथे दिसून येते.
आपल्यातला दलित खासदार, आमदार मंत्री संत्री जेव्हा स्टेजवर शपथ घेतो तेव्हा त्याच्यासमोर कितीतरी दलित हे आता तरी आपल्या दलितांसाठी अच्छे दिन येतील अशी आशा डोळ्यात ठेवून कडाकड टाळ्या वाजवतो, पण हेच मंत्री संत्री दलितांच्या अत्याचाराबाबत साधा जाहीरपणे निषेधही करत नाहीत.
अरविंद बनसोड,आणि विराज जगताप हत्या प्रकरणात गृहमंत्री लक्ष घालणार आहेत का नाही? की आरोपी जातभाई तसेच आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते म्हणून हेही प्रकरण दाबून टाकणार? या सगळ्या गोष्टीतून दलितांनी आता एक धडा घ्यायला हवा. उद्या राजकीय भाकऱ्या भाजण्यासाठी कोणताही राजकीय नेता हा आपल्या झोपडीत आला तर त्याला त्याची जागा दाखवा, आणि जशी दलितांच्या मृत्यूची किमंत त्यांना नाही तशी आम्हालाही तुमची किमंत नाही...
:- प्रमिला_म्हणे
#JusticeForArvindBansod
#JusticeForVirajJagtapage20
#DalitLivesMatter
No comments:
Post a Comment