My Blog List

Saturday, 31 December 2016

तो सध्या काय करतो?


तो सध्या काय करतो??? माहित नाही....झालंय काय, त्याला ना कसली तरी जाणीव झालीये. त्याला स्वत:लाच प्रश्न पडतायत खूप सारे, आता ही जाणीव नेमकी तरी कसली ? मी त्याला कळलीय की नाही ? मुळात कळलीय की कळाल्याचा त्याला भास होतोय ? कशामुळे आहे ही जाणीव ? आणि मलाच का ? त्याला होते का ?

तो सध्या काय करतो??? माहित नाही....झालंय काय, हल्ली तो त्याच्या जगामध्ये बिझी झालाय. कदाचीत त्याच्यासोबतच्या जगण्यात सुख शोधणार्या तिचा जरा विसर पडलाय.....तिला स्वत:ला प्रश्न पडतायेत खुप सारे....तो तिच्यापासुन हळुहळु दुरावतोय का? दुरावत असेल तर त्याला असंच आपल्या आयुष्यातुन निसटुन द्यावं का? की आपल्या सहवासाच्या दोरीने घट्ट बांधुन ठेवावं....पण, जरा यात जर त्याचा दम कोंडुन  घुसमट होउ लागली तर? मी केलंय ते नेमकं बरोबरे का ? हे मीच घडवून आणलंय का परिस्थितीने हे घडवून आणलंय ? असंच होणार होतं तर मग आधीचं काय होतं ? कशासाठी ?

तो सध्या काय करतो??? माहित नाही....झालंय काय, एका छोट्याश्या कारणामुळे दोघांमध्ये खुप मोठ भांडण झाल....पण यावेळी मात् त्याने मनात काही निराळं ठरवलं होतं... ती त्याला सॉरी बोलुन त्याची समजुत काढण्याचा प्रयत्न करत होती....त्याला हसविण्याचा प्रयत्न करीत होती....पण तो काही शांत होत नव्हता....ती त्याला लागोपाठ कॉल करत होती....पण तो नियमाप्रमाणे उचलत नव्हता....तो सारखा चिड चिड करत होता....त्याला भांडण मिटवायचं होतं....पण त्याच्यामध्ये जरा ॲटीट्युड आला होता....पण ती कॉल करणं थांबवत नव्हती....

तो सध्या काय करतो???? माहित नाही....झालंय काय, त्यांनी एक निर्णय घेतलाय. पण प्रश्न असा पडलाय, हे बरोबर आहे ना ? की चूक आहे ? नाही नाही, चूक-बरोबर नाही. योग्य आहे का हे ? की अयोग्य आहे ? आपण एकमेकांना गमावु का ? की काय ?

तो  सध्या काय करतो??? माहित नाही, झालंय काय, तो आलाय त्याच्या आवडत्या ठिकाणी. एकटाच. निवांत. बघतोय सगळीकडं. हातातल्या घड्याळाचा सेकंदकाटा ज्या गतीने फिरतो त्या गतीने तो सगळीकडं पाहतोय. डोळे मिटतो. डोळे उघडतो. आरशात पाहतो. आणि स्वत:शीच एक गोड हसतो. आता कोणता प्रश्न नाही. हीच ती जाणीव. सगळ्यांनाच होते ! पुन्हा एकदा आरशात पाहतो आणि एक मोठा सुस्कारा सोडतो.

Friday, 16 December 2016

'तो आणि ती' च्या गोष्टी.....

भाग १

आज तिला नक्कीच कसलं तरी दु:ख झालं होतं....मन कशाने तरी नाराज झालं होतं....पण फक्त मन नाराज झालं म्हणुन दिवसभरची कामं पेंडींगच्या टोपलीत टाकता येत नाही! म्हणुन दिवसभर ती तिच्या चेहऱ्यावर आनंदी मुखवटा लावुन तिचं हरवलेलं आनंदीपण मिरवत होती....रात्रीचं जेवण झाल्यानंतर बेडरुममध्ये जाउन पलंगावर तिने आपलं शरीर अलगद टाकुन दिलं.....तितक्यात फोनची रिंगटोन वाजली.....

ती: हल्लो!
कविता: ए म्हशे भेटला का वेळ तुला माझा फोन उचलायला.....????
कविता ही तिची लहानपणीची मैत्रीण....दोघींमधलं प्रेम हे त्यांच्या एकमेकांना शिव्यायुक्त आदरातुनच व्यक्त होत असतं....आणि तिला 'ए म्हशे' असं बोलण्याची हिम्मत ही फक्त कवितामध्येच होती....
ती थकलेल्या आवाजात....
"हा बोल ना, अगं सॉरी....हल्ली माझा मोबाईल सायलेंटवर असतो....त्यामुळे तुझा कॉल आलेला कळत नाही....
कविता: बरं ते जाउदे....तुझं जेवण झालं का?
ती: हो...
कविता: खाली ये मग पटकन....मला तुझ्याशी बोलायचंय.....
ती: बरं बाई....आली मी....

तिने जरा हालचाल केली तेव्हा तिला कळलं की तिचं अंग जरा आखडलंय. मान गोल गोल फिरवताना तिला जाणवलं की ती पलंगावर  पडल्या पडल्या तिचा डोळा लागला होता.....कुणाची तरी वाट बघत होती. मग हळूहळू तिला सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागायला लागला. तिने चटकन मोबाइल हातात घेतला, तर कुठल्याच मेसेजचा पॉप अप नव्हता. तिला प्रचंड चीड आली स्वत:चीच. ती उठली आणि बिल्डींगखाली निघाली कविताला भेटायला....

एरवी गजबजलेली डोंबिवली रात्री मात्र अगदी शांत आणि सुरेख वाटत होती. आसपास फारशी माणसं नव्हती. मागील रस्त्यावर गाड्यांची ये जा ही नव्हती. होती ती फक्त निरव शांतता आणि सोबतीला आकाशात पसरलेलं छान शुभ्र चांदणं. त्या रात्रीची जादू काही औरच होती.

कविता: काय झालंय तुला?
कविताचा स्वभाव तसा डायरेक्ट विषयाला हात घालण्याचा....नो झिकझिक....कविताच्या या प्रश्नाने मात्र तिच्या चेहऱ्यावर मोठा प्रश्न उभा ठाकला होता....
ती: कुठे काय? (सांगाव की नाही हा विचार मनात फिरत असतो)
कविता: हे बघ, तुला नसेल सांगायचं तर सांगु नकोस....पण खोटं बोलु नको....तुझे व्हॉट्सॲपवरचे स्टेटस, फेसबुकवरच्या पोस्ट, सायलेंट मोबाईलप्रमाणेच तुझे ही सायलेंट होणे हे पुरेस झालं मला कळण्यासाठी.....

ती: (आता लपविण्यात काही ही अर्थ नाही हे समजुन) कविता, मी सध्या खुप गोंधळलीये....म्हणजे चुक काय अन बरोबर काय याचं कोडंच उलगडत नाही.... सुंदर नाते जपायचे असेल तर या अश्या छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. मधून मधून भांडण, वाद हे होणारच, पण ते किती ताणायचे आणि कुठे थांबवायचे हे आपल्याला समजायला हवे. एकमेकांबद्दल विश्वास ,प्रेम आणि समजून घेण्याची इच्छा असेल तर मनाशी मनाचे नाते जुळून त्याची घट्ट रेशीमगाठ व्हायला वेळ नाही लागणार. पण हे एकानेच समजुन घेउन काही होणार आहे का? समोरच्यालाही ते समजले पाहीजे ना....

( दिवसभरात चेहऱ्यामागे अबोल पडलेला तिचा  मुखवटा आता मनातल्या गोष्टी बोलु लागला होता....आणि ते ही नॉनस्टॉप....)
तिच्या मनातली चलविचल कविता समजुन गेली....आणि तिला आणखी मोकळं होण्यासाठी तिच्याशी बोलु लागली....आणि शांत झालेली रात्रही आता बोलकी होउ लागली होती....

व्हॉट्सअ‍ॅपवर धडाधड मेसेजेस धडकले. तिने सवयीने त्याचेच असतील म्हणून पटकन फोन हातात घेतला. अर्थात व्यर्थ. बॉसने आजच्या कामाचं शेडय़ूल होतं.

खरंतर तिला आशा होती सगळं भांडण विसरुन तो तिला मेसेज करेल याची,  पण नाहीच.अर्ध्या तासापुर्वीच तीचं त्याच्याशी पुन्हा भांडण झालं होतं.हल्ली रोजच होतं.पहिल्यासारखी ओढच नाही राहिली. रोजरोज 'ऑफीसमद्ये आहात का? ठीक आहे मग नंतर कॉल करते'
या असल्या नीरस संवादांना दोघंही वैतागलेली.आज शेवटी निर्णय झालाच.
lets have a break...
तिला हवा होता का???
माहीत नाही.खरंतर तो आयुष्यात आला तेव्हा तिला तो हवा होता का? हे देखील तिला माहीत नव्हतं.असंच बोलायचे ते.तो आयुष्यात येताना आणि जातानाही ती तेच तीन शब्द बोलली,
"as your wish"...

-प्रमिला पवार 

Wednesday, 16 November 2016

ए....जरा ऐक ना...

दै. एकमतच्या युवास्पंदन सदरात प्रसिद्ध झालेली कविता (27 October 2016)
 काही सांगायचंय तुला...
वेळ असेल तुला तर...
माझे हे दोन शब्द ऐकशील ना?
ए....जरा बोल ना...
पूर्वी तू माझ्याशी
खुप काही बोलायचास
वेळ नसला तरी
माझ्यासाठी खुप वेळ काढ़ायचास...
ए....खरंच ऐक ना...
माझी कातरवेळ जरी
तुझ्या साठी चुकचुकली
कुण्या अंगणीची तु फुले माळली...
गाठीशी फक्त तुझी स्पंदने राहिली....
ए....जरा समजुन घे ना...
माझ्या वेळेनुसार बोलायला
तु जरी नसशील एक पुस्तक
पण तुला जपलंय मनाच्या ब्रिफकेसमध्ये...
मोबाईमधल्या ई-बुक सारखं फक्त...
ए...जरा बोल ना...
तुझा हा अबोला ......किती जीवघेणा ......
सख्या बोल ना रे... मला राहवेना
तुझ्या शब्दातले हे रुसणे....मला पाहवेना
ए...जरा थांब ना...
मी लिहीलेल्या या शब्दांना
तुझ्या मनातल्या रांजणात मुरु दे ना..
थोडी अनोळखी आहे वाट माझी
आयुष्याच्या या वैराण किनाऱ्यावरती...
तु सोबतीला जरा थांब ना...
तु सोबतीला जरा थांब ना...
प्रमिला पवार

आकाशवाणीवरील युवातरंग कार्यक्रमातील माझी मुलाखत

⁠⁠⁠बीडची गाव की छोरी म्हणजेच आमची मैत्रिण प्रमिला पवार आज सकाळी आकाशवाणी मुंबई केंद्रावरच्या युवातरंग कार्यक्रमात तिचा प्रवास सांगत होती आणि कितीतरी प्रेक्षक तिच्या कर्तुत्वाला सलाम करीत होते. पत्रकारिता क्षेत्रात आज तिने स्वत:च्या कर्तुत्वावर आणि लिखाणाच्या शैलीने एक वेगळीच ओळख तिने बनवली आहे. तिची आजची ही मुलाखत मी रेकॉर्ड करुन ठेवली. तुम्ही ही मुलाखत नसेल ऐकली तर जरुर ऐका....
युवा तरंग या कार्यक्रमात कहाणी एका जिद्धीची.....प्रमिला पवारशी संवाद साधला रेडिओ जॉकी रश्मी यांनी (१००. ७ एफ एम गोल्ड )
मुलाखत ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे...
https://www.youtube.com/watch?v=72122r-0ll0

तुझा रुसवा....


हो , तुझा रुसवा
जसं तुझं प्रेम तसाच तुझा रुसवा
तो सुद्धा मला हवाच असायचा
मना पासून म्हणावसं वाटतं, किती देशील दोन करांनी...?
तुझा माझ्या रागवण्यासाठी आपल्याला कोणतेही कारण चालायचं... मग मला आवडणारा गायकही पुरेसं कारण आहे रागविण्यासाठी....
वादही व्हायचे आपले आणि त्यानंतर यायचा तो अबोला
हवा हवासा , हो मला तरी तो अबोला आवडायचा....
तुला माहीत आहे , तू जेव्हा अबोल असतोस तेव्हा जास्त बोलतोस
तुझ्या आठवणीतुन...एखाद्या तिरप्या कटाक्षाने सुद्धा खुप काही सांगून जातोस...
तेच मला आवड़ायचं
अजुनही आवडतं...
तुझा राग अनावर झाला की मग मात्र खऱ्या अर्थाने बहार येते...
फोन बंद
Watsapp बंद
संवाद तर एकदम बंद!!!
पण शुकशुकाट नाही...कारण तुझी चूळबुळ अखंड चालू असते
मुद्दाम माझ्या समोर भिरभिरतोस
तुझं जवळ 'असणं ' जाणवून देतोस
अचानक अनोळखीही होतोस , typical मुलांसारखं....
खुप आवडतं मला आणि ते मला आवडत आहे हे बघुन तू आणखी चिड़तोस....
सुख सुख म्हणजे दूसरं काय असतं?
आपल्याशी कोणीतरी हक्कानं भांडणारं आहे हे ही एक समाधान....
बरं तू बोलत नाहीस म्हणून गप्प बसणे हा उपाय अजिबात नाही....
कारण तुझी समजूत काढण्यासाठी पुढाकार मीच घेतला पाहीजे हा अलिखित नियम....
त्यात सुद्धा स्वार्थ माझाच असायचा; कारण ती सुद्धा माझ्या साठी एक पर्वणी....
हळूहळू तुझा राग निवळायचा
मग आपल्याच रुसव्या फुगव्याच्या आठवणी काढायच्या आणि मनसोक्त हसायचं...
सगळंच सुंदर आणि लाघवी!!
......आता सगळंच अनोळखी
या वेळचा अबोला थोड़ा जास्तंच टिकला ना ?
मला सुद्धा ही जाणीव थोड़ी उशिराच झाली....
पण आता राहवत नाही...
राहून राहून पुन्हा त्या दिवसांची आठवण येतेय....
फ़क्त एकदा माझं ऐकशील ?
सोड ना हा तुझा रुसवा...!
रुसण्यात काय हर्ष आहे ?

Monday, 19 September 2016

मायबाप हो...मी कोपर्डीतली पिडीत मुलगी बोलतेय...!!!!!

(सुचना- कोपर्डी प्रकरणाची चर्चा करताना काही अज्ञानी लोकांनी उलट-सुलट मांडणी करून समाजमन कलुषित केले आहे. त्यात मराठा मोर्च्यातून केल्या जाणाऱ्या मागण्या पाहून कोपर्डी प्रकरणाची दिशा भरकटतीये का...असा प्रश्न मला सतावत होता...त्यावर कोपर्डी प्रकरणातील त्या पिडीत मुलीच्या भावना काय असतील असा विचार करून लिहीलेला हा लेख...निश्चितच तिच्या सर्वच भावना मला मांडता आल्या नसतील...पण मी जे लिहिलेय त्याच्यावर चर्चा न करता अनेकजण माझ्या हेतूवरच चर्चा करतील. मी कधीच एका कोणत्या जातीला दोष दिलेला नाही. कृपा करून तसा गैरसमज करून घेऊ नका. इतके सारे लिहिल्यानंतरही काही महाभाग माझी जात काढायला टपतीलही...)
नमस्कार सायबांनो....मी कोपर्डीतली मुलगी बोलती हाय...व्हंय ..तिच ज्या माझ्या मराठा जातीमुळं आज माझ्या जातीतले बरेच मराठे जागे झाल्याती....मी असंही ऐकलं हाय की फकस्त माझ्या गावचे न्हाय तर अख्ख्या महाराष्ट्रातले मराठे माझ्यासाठी रस्त्यावर उतरल्यात...लय बरं वाटलं सायब...आजच्या जमान्यात कुणी कुणाचं नसतं बघा...तरी पण माझ्या जातीचे मराठे मोर्चे काढत्यात...अहो सायब.....जव्हा त्या अनोळखी माणसांनी मला मारलं तव्हा माझी अवस्‍था बघितली असतीना.. मग कळलं असतं..! कशासाठी काढताय हे मोर्चे बिर्चे...माझ्यासाठी निघालेले हे मोर्चे आता माझ्यासाठी न्यायासाठी नाही राहीले सायब....आता हे लोकं त्यांच्या भविष्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मोर्चे काढू लागलेत...मध्येच अॅट्रॉसिटी असा कोनता तरी कायद हाय बघा...ज्याच्यामुळं दलितांना सुरक्षा मिळती...तो बंद करायचा म्हणत्यात...बलात्कार करणारा बी दलितंच होता की...मग तो अॅट्रॉसिटी कायद बंद झाल्यावर मला न्याय मिळणार हाय का...तसं असंन तर सायब...तो अॅट्रॉसिटी कायदा बंद झाल्यावर माझा जीव मला परत मिळंन का...? इकडचे पोलिस काका म्हणत्यात....ती राक्षसं दारूच्या नशेत होती..'' पोलिस काका...आमच्या कोपर्डी गावात तर दारूबंधी होती ना...तरीपण त्या राक्षसांनी 20 रूपयांची दारू कशी ठोसली...? '' हे कोणी कसं जाणून नाय घेतलं...आरं देवा...मी विसरलीच ना...सगळी लोकं मराठा क्रांती मुक मोर्च्याच्या इव्हेंट म्यानेजमेंटमध्ये बिझी झालेत...पण सायब...आमच्या गावकऱ्यांना माहित असेलच ना...दारूबंदी असताना पण आमच्या गावात गावठी दारू कशी आली...गावाची बदनामी व्हईल म्हणून ते शांत बसलेत का...? जाऊद्या ना...ते म्हणत असतील दारूवर पैसा कमविणारे मंत्री सायब काय बोलत न्हाय तर आपण का मधी पडायचं...? .खरंय त्यांचं...मी त्यांच्या घरातली मुलगी नव्हती अन ना कोणत्या मंत्र्या संत्र्याची मुलगी होती. सायब...मी जर मंत्र्या संत्र्याची मुलगी असली तर माझी केस फास्ट कोर्टातच गेली असती ना...माझ्यावर झालेल्या अत्याचाराला जातीपातीचा जळकट वास लागलाच...आमच्या काही स्वार्थी मराठ्यांनी भलतीच अॅट्रॉसिटी आणि आरक्षणाची मागणी केली...यात लढाई ही 'पिडीत मुलीविरूद्ध आरोपी' अशी व्हायला पाहीजे होती...पण काही पुढाऱ्यांनी 'मराठा विरूध्द दलित' संघर्ष पेटवला...आणि त्यात माझ्या न्यायासाठीची आग विझली...मायबाप हो...विसरू नका...जव्हा माझ्यावर बलात्कार होत होता तव्हा कोणतंही आरक्षण आणि कायदा पाहून माझ्यावर बलात्कार केला नाय....तर माझी स्त्री जात पाहून बलात्कार झालाय....फेसबूक, व्हॉट्सअपवर माझ्यावर खूप जणांनी लेख लिहून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.....पण अशी विकृती कशामुळे जन्माला येते आणि तिचा बंदोबस्त कसा करायचा, याबाबत मात्र कोणीही बोलायला तयार न्हाय.... लाखो मराठ्यांनी मोर्चा काढून त्यांच्या जातीची ताकद दाखविली..पण सायब ंमाझं झालं ते झालं...पण माझ्यानंतर आणखी दुसऱ्या कोण्या मुलीवर बलात्कार होऊ नये यासाठी कोणी बोलायला तयार नाही... आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागणीपेक्षा कोणत्याही गावात दुसरी कोपर्डी घटना घडणार नाही यासाठीच्या उपाययोजनांची गरज हाय....मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणजे गावातली प्रत्येक मुलगी , महिला सुरक्षित झाली असं न्हाय...किंवा अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला म्हणजे मला न्याय मिळेल असंही न्हाय....त्यामूळे मायबाप हो...आता जाती-धर्माच्या पलीकडं जाऊन माणूस म्हणून पाहण्याची ही वेळ आहे. यासाठी आता आपले कोष फोडून ना कोणता भगवा आणि ना कोणता निळा.....तर मानवतेचा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरण्याची ही वेळ आहे....तुम्ही मला न्याय मिळवून द्याल ना?
दै. एकमत (लातूर), दिनांक:- ८/१०/१६ 

Tuesday, 19 July 2016

बस्स! त्या क्षणानंतर माझ्या गुरूंच्या यादीत आणखी एकाची भर पडली - "अनुभव’’ !!!

आज गुरूपौर्णिमेची धुम सकाळपासूनच सुरू झाली. आमच्या परिसरातील साई मंदिरांमध्ये पहाटे 7 वाजल्यापासूनच अखंड पारायण सुरू झाले. अपेक्षेप्रमाणे व्हॉट्सअपच्या वेगवेगळ्या ग्रूपवर गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. आजच्या दिवशी सगळेजण आपल्या शाळेतल्या, क्लासेसमधल्या, कंपनीतल्या गुरूंना भेटून त्यांचा आशिर्वाद घेतात. बरेच जण मला "प्रमिला, तुझा गुरू कोण?' असं गमतीनं विचारतात. मी आयुष्यात कुणाच्या मार्गदर्शनाखाली मोठी झाले? कुणाचं शिष्यत्व पत्करलंय? मला ज्यानं घडवलं, तो कोण आहे? हे सारं जाणून घेण्यातही अनेकजणांना रस असतो; आणि वर्षभर कुणाच्या लक्षात राहत नाही परंतू आजच्या दिवशी मात्र गुरूंना एक तरी फोन करूया, असेही नुमने असतात आपल्या आजुबाजुला... पण माझ्या बाबतीत म्हणाल तर लहानपणी कानावरून गेलेलं महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य मला आठवतं, ‘’तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...!’’.

कारण मला लहानपणापासूनच वेगवेगळ्या गोष्टी करण्याची आवड होती, मग त्या गोष्टी करणं मला जमत नसल्या तरी मी त्या करायचीच...हे वेड होतं माझं. त्यामूळे अनेक टप्प्प्यावर मला भेटलेल्या वेगवेगळ्या माणसांनी मला घडवलंय...शिकवलंय...!! मग मला ते सातवीत असताना पोळ्या बनवायच्या पण लाटता येत नव्हत्या, हे पाहून आईने पोळ्या कशा लाटायच्या हे शिकवणं असो किंवा शाळेत असताना श्रोत्यांसमोर बोलायचं कसं माहित नसुनही वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा असे माझे ठरल्यानंतर शाळेतल्या शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन असो...किंवा आताचच सांगायचं झालं तर माध्यम क्षेत्रात उतरल्यानंतर आपल्या लिखानावर प्रभूत्व कसं करावं इथपासून ते नव-नविन गोष्टी करण्यात अनेक दिग्गजांचा मोठा वाटा आहे. ज्याचा हिशेब मांडायचा झाल्यास पसारा उदंड होईल. त्यातल्या प्रत्येकाचीच भूमिका माझ्याकरिता द्रोणाचार्यांची होती, असं नाही; पण मी मात्र एकलव्यासारखी तन्मयतेनं सारं वेचत आल, साठवत आल. खरं सांगायचं तर आयुष्यात अनुभवासारखा गुरू नाही, असं मला वाटतं. कुठलाही गुरू म्हणा, शिक्षक म्हणा "थिअरी आधी; मग प्रॅक्‍टिकल' असा मार्ग स्वीकारतो; पण अनुभव हा एकमेक गुरू असा आहे, जो आधी प्रॅक्‍टिकल देतो. त्यामुळं थिअरी तुम्हाला घोकावीच लागत नाही, तर ती मेंदूवर कायमची कोरलीच जाते. माझ्या आजुबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेतून मी काही ना काही शिकत आली. या घटनाच आपल्याला काही ना काही शिकवित असतात. गरज असते ती फक्त त्या घटना जाणून घेण्याच्या आपल्यातल्या कुवतीची...उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या शाळेत संचालिका सुलभा कांबळे मॅडम या विद्यार्थ्यांच्या व्यायाम सत्रानंतर ठराविक ग्रूप्स करून त्यांच्याकडून वृत्तपत्र वाचन हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवित असत. काही हूशार मंडळी छान वाचन करायची...सगळ्यांसमोर असं ठणकेदार आवाजात, हातात मोठ्या स्टाईलने पेपर घेऊन त्यातल्या बातम्या वाचून दाखवणं हे पाहून  मला मात्र मोह अनावर झाला. माझे सगळे मित्र-मैत्रीणी मस्त छान वाचन करून आपली वट वाढवित होते. मग मी पण संधी साधली. त्यावेळी ते माझ्यासाठी स्वप्न होतं. एकदा तरी असं सगळ्यांसमोर पेपर वाचून काढयचा म्हणून कधी नव्हे ते आमच्या घरात मराठी वृत्तपत्र आले आणि मी जवळपास एक आठवडाभर वृत्तपत्र वाचनाचा सराव करू लागले. पण बातमीचे वाचन कसं करायचं हे माहित नव्हतं मग घरात टि.व्ही. न्यूज चॅनेल लावून बाहूल्यांसारख्या दिसणाऱ्या अॅंकरना पाहून त्या बातम्या कशा सांगतात, यावर फोकस करू लागले. मग त्यांच्याप्रमाणे वेगवेगळ्या स्वरात बातम्या वाचन करून आठवडा भर मी काही ते वेड सोडलं नाही आणि आला तो स्वप्नपुर्तीचा दिवस. समोर इतकी मोठी मंडळी पाहून सुरवातीला थोडी डगमगली..पण आपल्याला हे करयाचंच आहे हे ठाम होतं मनात. त्यामुळे सुरवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी सुसाट बातमीपत्र वाचून काढले. वृत्तपत्र वाचताना तो वेगळाच आत्मविश्वास अगदी रुबाबात डोलत होत. हा छोटासा प्रसंग मला खूप काही शिकवून जाणारा ठरला. त्यानं मला आयुष्यात दोन अनमोल गोष्टी शिकवल्या. एक म्हणजे, आयुष्यात आनंद, सुख शोधण्यासाठी लांब जाण्याची गरज नसते. आनंदाचं मूळ तुमच्या आसपास असतं; पण भोवतालच्या अनेक हव्या-नकोशा गरजांच्या गर्दीत ते एकाग्र होऊन शोधावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे, अनेकदा तुम्हाला आयुष्यात जे हवंय, जे साध्य करायचंय, त्याच्या अन्‌ तुमच्या दरम्यान बऱ्याच नकोशा त्रासदायक गोष्टी येत असतात. अशा वेळी त्यांनी विचलित होऊन साधना किंवा ध्यासच सोडण्याऐवजी किंवा त्या गोष्टींच्या नावे उगाच त्रागा करण्याऐवजी तुमच्या ध्येयावर जास्त "फोकस' केलंत तर नको असलेल्या त्या गोष्टींचं अस्तित्व तुमच्यासाठी धूसर होऊन जातं.  बस्स! त्या क्षणानंतर माझ्या अगणित गुरूंच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली - "अनुभव’’ !!!

Tuesday, 12 July 2016

‘विठ्ठल-अल्लाह’चे ‘लोकसंगीत प्लस सुफी’ स्टाईलचे हे गाणे ऐकाच एकदा...


खूप दिवसांनी ‘हिंदू-मुस्लिम’ या विषयावर लिहीण्याचा विचार करीत होते. पण ‘हिंदू-मुस्लिम’ यात फक्त दोन शब्द जरी असले तरी यात अनेक धागे-दोरे, घटना, भावना दडलेले असल्याने लिहू की नको लिहू हा विचार करीत होते. पण अखेर ‘डिस्को सन्या’ या चित्रपटातील ‘जय हरी विठ्ठल-अल्लाह हू अकबर’ या गाण्याने मला लिहीतं केलंच. सध्या सगळीकडे सुरू असलेल्या पंढऱीची वारी आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेल्या या ‘जय हरी विठ्ठल-अल्लाह हू अकबर’ या गाण्याने जुलै महिन्याचे वैशिष्ट्य आणखीनच सुंदर करून ठेवले. हे गाणे जेव्हा मी युट्यूबवर ऐकले तेव्हा अक्षरशः अंगावर काटे आले.
मला संगीतातलं फारसं काही कळंत नसलं तरी मात्र हे गाणं मला कळालं. एकीकडे लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेले गायक नंदेश उमप यांच्या रांगड्या आवाजात विठ्ठलाला दिलेली साद....तर दुसरीकडे संगीततल्या डेप्थमध्ये जाऊन अल्लाहला पुकारताना बॉलिवूडचे गायक शबाब साबरी यांचा सुफी सरगम...काय फ्यूजन आहे हे!!!! मित्रांनो आजपर्यंत ‘हिंदू-मुस्लिम’ हा विषयंच जरी कोणाकडे काढला तर ज्याला ओ का ठो कळात नाही  ते ही आज बाबरी मशीद प्रकरण, हिंदुस्थान-पाकीस्तान, आंतकवाद, मुस्लिमांची असुरक्षितता, हिंदू मंदिरांच्या जागी मुस्लिमांच्या मशिदीचे आक्रमण यासारख्या अनेक विषयांवर तासनतास बोलू लागले आहेत. पण अशा मंडळींच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी संगीतकार-निर्माते सचिन पुरोहित-अभिजीत कवठाळकर यांनी ‘डिस्को सन्या’ या फिल्ममधून हे गाणे आणले आहे.  

काय कसली शेंडी...अन काय कसली दाढी...
काय कसला भगवा...अन काय कसला हिरवा...
कायको डाली टोपी अन कायको पेहना फेटा...
माणूसकी हाच धर्म सुनले मेरे बेटा...
गाण्याच्या सुरवातीच्या या चार ओळीच पुरेश्या आहेत हे गाणे समजून घेण्यासाठी....हिंदू म्हणून ओळखावे म्हणून लोक शेंडी ठेवतात, तर मुस्लिमांची ओळख त्यांच्या दाढीवरून करतात. भगव्या रंगाची जोड हिंदु धर्माशी केली जाते तर हिरवा रंग मुस्लिम धर्मीयांची निशाणी बनते. पण तुम्ही दाढी केली काय शेंडी ठेवली काय...माणसांची ओळख ही त्याच्यातल्या माणूसकीनेच होते...तुम्ही भगवे झेंडे मिरवले काय की हिरवे....पण तुमच्यातल्या माणूसकीच्या रंगापुढे भगवे-हिरवे रंग फिके पडतील, अशाच काहीश्या भावना मला या कडव्यातून मिळाल्या. त्यामूळे तुम्ही हिंदू असाल किंवा मुस्लिम....पण हे हातासारशी गाणे ऐकाच! संगीत नव्हे तर वेगवेगळ्या भावनिक स्थितीमध्ये माणूसकीचे महत्त्व अधोरेखित करण्याचा, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे वेगवेगळे रूप दाखविण्याचा प्रयत्न या गाण्यातून केला.  या गाण्यात हे कडवे प्रख्यात बालकलाकार पार्थ भालेराव आणि सुप्रसिद्ध अभिनेता संजय खापरे यांच्यावर चित्रीत केले आहे. या गाण्यात पार्थ भालेराव संजय खापरे याच्या डोक्यावर दगड मारतो, या प्रसंगातून हिदूं-मुस्लिम धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांच्या जोरदार कानशिलात बसविण्यात दिग्दर्शक नियाज मुजावर येथे यशस्वी होतात.

भूखे पेट सुखी रोटी पानी तो दिला दे अल्लाह...
हक्काचं मागूनी थोडी तरी द्या हो कृपा....
अल्लाह तु, मौला तु, माझ्या मुखी तुझे नाव...
या दोन ओळी गाताना नंदेश उमप व शबाब साबरी या दोघांच्या स्वरांची उत्कटता निर्गुण, निराकार अल्ला, ईश्वराला स्वरांच्या माध्यमातून शोधतात. दोन वेळचे जेवण मिळावे एवढाही हक्क आज समाजात अनेक गरिबांना मिळत नाही, त्या भूकेला कोणताही धर्म नसतो. भूकेसाठीच्या या अमेझिंग, विलक्षण शब्दात जेव्हा पार्थ भालेराव रस्त्यावरच्या भूकेने व्याकूळ झालेल्या लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू देतो, ही भूक मिटवण्यासाठी हिंदू-मुस्लिम एक झाले तर कोणताच धर्मीय हा भूकेला राहणार नाही असा संदेश या गाण्यातून दिला आहे. जगातल्या साऱ्याच प्रामाणिक, सच्च्या आणि अस्सल भावनेला समर्पित हे गाणे आहे. या गाण्यात दाखविलेला अजून एक प्रसंग माझ्या मनाला भावला तो म्हणजे जेव्हा पार्थ भालेराव जेवणापुर्वी ‘ओम नमः शिवाय..फादर सन..बिस्मील्ला आमीर’ या मंत्राचा जप करतो. काय कमाल कल्पना आहे हे मंत्र बनविण्याची. म्हणजे हिंदुंमध्ये ‘वदनी कवळ घेता’ हे मंत्र म्हटले काय....आणि मुस्लिमांमध्ये कुराण वाचन केले काय....पण सर्व धर्म समान मानून समाजात असलेली माणूसकीची भूक आज प्रत्येकाने मिटवली पाहीजे, असा संदेश नकळत या गाण्यात दिला आहे. याच ईश्वरीय भावनेचा एक कोपरा निखळ मैत्री. अशाच निखळ मैत्रीच्या भावनेला समर्पित ‘जय हरि विठ्ठल...अल्लाह हू अकबर’ हे गाणे एक वेगळी उंची गाठणार आणि दाद द्यायला भाग पाडणार आहे. गाण्याच्या शेवटी धर्माने मुस्लिम असलेले गायक शबाब साबरी यांच्या सुरेल आवाजातून कधी विठ्ठलाला साद घालतात...तर हिंदु असलेले लोहशाहीर नंदेश उमप अल्लाहला पुकारतात...काय निखळ क्षण वाटतात ते क्षण...दोन्ही धर्माचे गायक एकमेकांच्या धर्मातील देवतांचे नावे घेतात...आणि जेव्हा हे दोन्ही स्वर एकत्र येऊन दोघेही ‘जय हरी विठ्ठल...अल्लाह हू अकबर’ नामाचा जप करतात...तेव्हाचे संगीत अगदी पवित्र वाटू लागतात.

मी बीड सारख्या जिल्ह्यात जन्मली आहे...वाढली आहे. बीड जिल्ह्यातील प्रत्येक कोपऱ्यातील गाव हे हिंदू-मुस्लिम धर्मीयांच्या एकोप्यातने नांदत आहे. त्यातीलच एका गावात माझे घर आहे. त्यामूळे ‘जय हरि विठ्ठल अल्लाह हू अकबर’ हे गाणे मला खूप भावते. हे गाणे सगळ्याच बाजूने अफाट आहे. गेल्या अनेक वर्षाच्या चित्रपट इतिहासात असं गाणं नव्याने आलंय म्हणजे हिंदु-मुस्लिम या दोन्ही धर्मातील गायकांचा सुरेल वापर, पार्थ-संजय यांच्यातील संघर्षाचा वापर, रस्त्यावरील भुकेल्या मुलांचा वापर, परीसराचा वापर आणि हे कथानाक....या सर्वासाठी संगीतकार-निर्माते सचिन पुरोहित, अभिजीत कवठाळकर, दिग्दर्शक नियाज मुजावर यांना हजार वेळा सलाम. एवड्या सुंदर पद्धतीने ही धर्मव्यवस्था,  समाजव्यवस्था या सर्वांना चपखलपणे थप्पड लगावलेली आहे. अप्रतिम...त्यामूळे सर्वांनी तुमच्या कामातून थोडा वेळ काढा हे ‘जय हरि विठ्ठल, अल्लाह हू अकबर’ हे गाणे ऐकाच एकदा....माणूसकीचे स्वर अनुभवण्यासाठी...

गाणे ऐकण्यासाठी लिंक सोबत जोडत आहे. https://www.youtube.com/watch?v=7qZirK9ZdoU


गीत- नियाज मुजावर
संगीत-सचिन पुरोहित-अभिजीत कवठाळकर
स्वर-लोकशाहीर नंदेश उमप व गायक शबाब साबरी
गीतप्रकार-इंडोफ्यूजन

Friday, 24 June 2016

हल्लीची तरूणाई तुम्हाला वाटतं तितकी बिघडली नाही राव!!!

दै. पुढारीमध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख
हल्लीची तरूणाई तुम्हाला वाटतं तितकी बिघडली नाही....
आजची तरुण पिढी ही दिशाहीन झाली आहे', असा जुन्या पिढीने तरुण पिढीच्या नावाने शंख करायचा हे अगदी पुर्वापार चालत आले आहे. ' आमच्या काळात अस होत बर का?' असे एका कोपऱ्यातुन आलेल्या वाक्यापुढे आजचे तरुण- तरुणी तर बोलणेच टाळतात. किंवा आपण एखाद्या ठिकाणाहून प्रवास करताना दोन ज्येष्ठ व्यक्तींच्या बोलण्यात आजची तरूण मुलं-मुलीहा साधा विषयंच जरी निघाला ना...तरी पुढची काय वाक्य असतील....हो तुम्हाला सांगायची गरज नाही....कारण ती वाक्ये तुम्हाला माहित आहेत काय ही आजची मुलं... कशी वागतात! आमच्या काळची मुलं कशी होती!... मोठ्यांचा किती आदर करायची...!‘‘ ही वाक्‍यं आता सारखीच कानावर पडतात. पण मला येथे एक सांगावसं वाटतंय की आजची तरूणाई तुम्हाला जितकी वाटते तितकी बिघडलेली नाहीत!

तरुण वर्गाविषयी विचार व त्यांना देण्यात येत असलेले महत्त्व सध्या वेगळ्या प्रकारचे आहे. समाजाचा विचार करताना वर्गानुसार, जातीनुसार गट पाडुन विश्लेषण केले जाते. वयानुसार समाजाची विभागणी करुन युवक हा वेगळा सामाजिक गट निर्माण करण्याची प्रवृत्ती नवीन आहे. त्याचप्रमाणे तरुण माणसांनाही आपण युवक म्हणुन कोणीतरी वेगळे आहोत, वेगळी सामाजिक जबाबदारी आपल्यावर आहे व समाज परिवर्तनाच्या कामात आपल्याला विशेष स्थान आहे, याची जाण आजच्या तरूणाईला आहे. सध्याच्या काळात माणूस अनुकरणप्रिय जरुर आहे, मात्र ब-याच वेळेस वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होताना आपल्याला दिसून होते. मात्र अशा वातावरणात एखाद्या चुकीच्या प्रथेमुळे माणूसकीला काळिमा
फासणार नाही ना? याची खबरदारी घेणे हे आजची तरुणाई अचूक मार्गाने करीतच असते. त्यामुळे आजच्या तरूणाईला नैतिक की अनैतिक यातील फरक तर नक्कीच कळतो. फेसबुक...! वेड लागलंय मुलांना त्या फेसबुकचं!  आजच्या काळातील मुलं-मुली नेटीझन्स झाली आहे”, असे बोलून ऑनलाईन शॉपींग करणाऱ्या या पोरांना पैसे कमविण्यासाठी किती घाम गाळावा लागतो, त्याची किंमत नाही कळणार, असा सुर काही घरातील पुरूष मंडळींकडून जास्त ऐकायला मिळतो. यावरही मला असे म्हणावेसे वाटते. जगात झालेल्या नव्या बदलांचा स्विकार करून आजची तरूणाई भलेही नेटीझन्स बनले असतील, मात्र इंटरनेटवरून ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेऊन आज मोठ-मोठ्या पदावर काम करणारी तरूण मंडळी का नाही दिसत तुम्हाला? तसेच ही तरूण मंडळी कितीही नेटीझन्स बनून तासनतास मोबाईलवर असणारे मदर्स डे व फादर्स डे च्या दिवशी न विसरता आपल्या आई-वडिलांसाठी छोटेसे गीफ्ट देऊन त्यांच्यासोबतची सेल्फी फेसबूकवर टाकायला ते कधी विसरत नाहीत. त्यामुळे तरूणाईच्या नेटीझन्समुळे
आई-वडीलांप्रती आदर आणि प्रेम त्यांनी कधी कमी होऊ दिला नाही.
तरूण आणि बदल यांचे नातं खूप खूप जवळचे आहे. म्हणूनच आजच्या तरूणांनी त्यांच्या जीवनशैलीतही बदल केले आहेत. या मुलींना घरच्यांनी अंगभर कपडेही दिले नाहीत का? असे टोमणे कितीतरी तरूण मुलींना ऐकावेच लागले असतील. काही दिवसांपुर्वी तर महिला आयोगाच्या सदस्या आशा मिरगे यांनी मुलींचे कपडे, देहबोलीच बलात्काराला जबाबदार असल्याचे वक्तव्य केलं होतं. फ्रेंड्‌स, मुलींचे कपडे हा इथे विषयच नाही. कारण, मुलींचे अंगप्रदर्शन करणारे कपडेच पुरुषांच्या नजरांना आव्हान देतात असे नाही. तसे असते तर, आजपर्यंत अशा वासनांध व्यक्तींच्या अत्याचाराला बळी पडलेल्या चार-पाच वर्षांच्या
मुलींपासून,तर ऐंशी वर्षांच्या आज्यांपर्यंतचा स्त्रीवर्ग का अंगप्रदर्शन करीत फिरत होता? नाही ना? आणि अनेकदा तर दुधाचे दातही सुकले नाहीत,अशा कोवळ्या लेकीबाळी नराधमांच्या अत्याचारांंच्या बळी ठरल्या आहेत, म्हणूनच फ्रेंड्‌स मुद्दा मुली कसे आणि कोणते कपडे घालतात हा नाहीच, तर विषय आहे
आजची गढूळलेली सामाजिक मानसिकता समजून घेण्याचा. हि मानसिकता आजची तरूणाई खूप उत्तरित्या समजून आहे आणि म्हणून दिल्लीतील निर्भया प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी देशातील हीच तरूणाई एकत्र आली होती. हे विसरून चालणार नाही.

आजच्या मुलांना काय ते फास्टफुड आवडतं खायला, मस्त भाजी-पोळी खायची...तंदुरूस्त रहायचं...अशीही काही नाके मुरडली जातात. परंतू मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय की, जी तरूण तंदुरुस्तपणाचे भान न ठेवता दिवस-रात्र एक करून मोठ्यातल्या मोठ्या आजारांच्या रूग्णांना बरे करणारे तरूण डॉक्टर्स का नाही लक्षात येत तुमच्या?

असं म्हणतात, की कुठलाही माणूस शंभर टक्के चांगला नाही. पण मी म्हणते, की कुठलाही माणूस शंभर टक्के वाईटदेखील नाही. तरूणांची तुम्ही चांगली बाजू बघावी. काही वाईट प्रवृत्तीच्या तरूणांमुळे संपूर्ण देशातील तरूणाई काही वाईट होत नाही. आजच्या समाजातही चांगली माणसं आहेत आणि ती जर नसती, तर आजचं जग चाललंच नसतं. शेवटी बदल हा आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा. काळाप्रमाणं बदललं पाहिजेच. शेवटी एवढंच सांगते, की आम्हालाही थोडं समजून घ्या. वाईटावर नेहमी चांगल्याचा विजय होतो. जर का या दोन पिढ्यांमधून तरूणांची उर्जा आणि ज्येष्ठांचा आशिर्वाद एकत्र आला की, हे जग खूप सुंदर
होईल.