हल्लीची तरूणाई तुम्हाला वाटतं तितकी बिघडली नाही....
आजची तरुण पिढी ही दिशाहीन झाली आहे', असा जुन्या पिढीने तरुण पिढीच्या नावाने शंख करायचा हे अगदी पुर्वापार चालत आले आहे. ' आमच्या काळात अस होत बरं का?' असे एका कोपऱ्यातुन आलेल्या वाक्यापुढे आजचे तरुण- तरुणी तर बोलणेच टाळतात. किंवा आपण एखाद्या ठिकाणाहून प्रवास करताना दोन ज्येष्ठ व्यक्तींच्या बोलण्यात ‘आजची तरूण मुलं-मुली’ हा साधा विषयंच जरी निघाला ना...तरी पुढची काय वाक्य असतील....हो तुम्हाला सांगायची गरज नाही....कारण ती वाक्ये तुम्हाला माहित आहेत “काय ही आजची मुलं... कशी वागतात! आमच्या काळची मुलं कशी होती!... मोठ्यांचा किती आदर करायची...!‘‘ ही वाक्यं आता सारखीच कानावर पडतात. पण मला येथे एक सांगावसं वाटतंय की आजची तरूणाई तुम्हाला जितकी वाटते तितकी बिघडलेली नाहीत!
तरुण वर्गाविषयी विचार व त्यांना देण्यात येत असलेले महत्त्व सध्या वेगळ्या प्रकारचे आहे. समाजाचा विचार करताना वर्गानुसार, जातीनुसार गट पाडुन विश्लेषण केले जाते. वयानुसार समाजाची विभागणी करुन युवक हा वेगळा सामाजिक गट निर्माण करण्याची प्रवृत्ती नवीन आहे. त्याचप्रमाणे तरुण माणसांनाही आपण युवक म्हणुन कोणीतरी वेगळे आहोत, वेगळी सामाजिक जबाबदारी आपल्यावर आहे व समाज परिवर्तनाच्या कामात आपल्याला विशेष स्थान आहे, याची जाण आजच्या तरूणाईला आहे. सध्याच्या काळात माणूस अनुकरणप्रिय जरुर आहे, मात्र ब-याच वेळेस वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होताना आपल्याला दिसून होते. मात्र अशा वातावरणात एखाद्या चुकीच्या प्रथेमुळे माणूसकीला काळिमा
फासणार नाही ना? याची खबरदारी घेणे हे आजची तरुणाई अचूक मार्गाने करीतच असते. त्यामुळे आजच्या तरूणाईला नैतिक की अनैतिक यातील फरक तर नक्कीच कळतो. फेसबुक...! “ वेड लागलंय मुलांना त्या फेसबुकचं! आजच्या काळातील मुलं-मुली नेटीझन्स झाली आहे”, असे बोलून ऑनलाईन शॉपींग करणाऱ्या या पोरांना पैसे कमविण्यासाठी किती घाम गाळावा लागतो, त्याची किंमत नाही कळणार, असा सुर काही घरातील पुरूष मंडळींकडून जास्त ऐकायला मिळतो. यावरही मला असे म्हणावेसे वाटते. जगात झालेल्या नव्या बदलांचा स्विकार करून आजची तरूणाई भलेही नेटीझन्स बनले असतील, मात्र इंटरनेटवरून ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेऊन आज मोठ-मोठ्या पदावर काम करणारी तरूण मंडळी का नाही दिसत तुम्हाला? तसेच ही तरूण मंडळी कितीही नेटीझन्स बनून तासनतास मोबाईलवर असणारे मदर्स डे व फादर्स डे च्या दिवशी न विसरता आपल्या आई-वडिलांसाठी छोटेसे गीफ्ट देऊन त्यांच्यासोबतची सेल्फी फेसबूकवर टाकायला ते कधी विसरत नाहीत. त्यामुळे तरूणाईच्या नेटीझन्समुळे
आई-वडीलांप्रती आदर आणि प्रेम त्यांनी कधी कमी होऊ दिला नाही.
तरूण आणि बदल यांचे नातं खूप खूप जवळचे आहे. म्हणूनच आजच्या तरूणांनी त्यांच्या जीवनशैलीतही बदल केले आहेत. या मुलींना घरच्यांनी अंगभर कपडेही दिले नाहीत का? असे टोमणे कितीतरी तरूण मुलींना ऐकावेच लागले असतील. काही दिवसांपुर्वी तर महिला आयोगाच्या सदस्या आशा मिरगे यांनी मुलींचे कपडे, देहबोलीच बलात्काराला जबाबदार असल्याचे वक्तव्य केलं होतं. फ्रेंड्स, मुलींचे कपडे हा इथे विषयच नाही. कारण, मुलींचे अंगप्रदर्शन करणारे कपडेच पुरुषांच्या नजरांना आव्हान देतात असे नाही. तसे असते तर, आजपर्यंत अशा वासनांध व्यक्तींच्या अत्याचाराला बळी पडलेल्या चार-पाच वर्षांच्या
मुलींपासून,तर ऐंशी वर्षांच्या आज्यांपर्यंतचा स्त्रीवर्ग का अंगप्रदर्शन करीत फिरत होता? नाही ना? आणि अनेकदा तर दुधाचे दातही सुकले नाहीत,अशा कोवळ्या लेकीबाळी नराधमांच्या अत्याचारांंच्या बळी ठरल्या आहेत, म्हणूनच फ्रेंड्स मुद्दा मुली कसे आणि कोणते कपडे घालतात हा नाहीच, तर विषय आहे
आजची गढूळलेली सामाजिक मानसिकता समजून घेण्याचा. हि मानसिकता आजची तरूणाई खूप उत्तरित्या समजून आहे आणि म्हणून दिल्लीतील निर्भया प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी देशातील हीच तरूणाई एकत्र आली होती. हे विसरून चालणार नाही.
आजच्या मुलांना काय ते फास्टफुड आवडतं खायला, मस्त भाजी-पोळी खायची...तंदुरूस्त रहायचं...अशीही काही नाके मुरडली जातात. परंतू मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय की, जी तरूण तंदुरुस्तपणाचे भान न ठेवता दिवस-रात्र एक करून मोठ्यातल्या मोठ्या आजारांच्या रूग्णांना बरे करणारे तरूण डॉक्टर्स का नाही लक्षात येत तुमच्या?
असं म्हणतात, की कुठलाही माणूस शंभर टक्के चांगला नाही. पण मी म्हणते, की कुठलाही माणूस शंभर टक्के वाईटदेखील नाही. तरूणांची तुम्ही चांगली बाजू बघावी. काही वाईट प्रवृत्तीच्या तरूणांमुळे संपूर्ण देशातील तरूणाई काही वाईट होत नाही. आजच्या समाजातही चांगली माणसं आहेत आणि ती जर नसती, तर आजचं जग चाललंच नसतं. शेवटी बदल हा आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा. काळाप्रमाणं बदललं पाहिजेच. शेवटी एवढंच सांगते, की आम्हालाही थोडं समजून घ्या. वाईटावर नेहमी चांगल्याचा विजय होतो. जर का या दोन पिढ्यांमधून तरूणांची उर्जा आणि ज्येष्ठांचा आशिर्वाद एकत्र आला की, हे जग खूप सुंदर
होईल.
2 comments:
छान लेख
कधि विधवा पुनर्विवाह बद्दल हि लिहा
छान लेख
कधि विधवा पुनर्विवाह बद्दल हि लिहा
Post a Comment