My Blog List

Monday, 19 September 2016

मायबाप हो...मी कोपर्डीतली पिडीत मुलगी बोलतेय...!!!!!

(सुचना- कोपर्डी प्रकरणाची चर्चा करताना काही अज्ञानी लोकांनी उलट-सुलट मांडणी करून समाजमन कलुषित केले आहे. त्यात मराठा मोर्च्यातून केल्या जाणाऱ्या मागण्या पाहून कोपर्डी प्रकरणाची दिशा भरकटतीये का...असा प्रश्न मला सतावत होता...त्यावर कोपर्डी प्रकरणातील त्या पिडीत मुलीच्या भावना काय असतील असा विचार करून लिहीलेला हा लेख...निश्चितच तिच्या सर्वच भावना मला मांडता आल्या नसतील...पण मी जे लिहिलेय त्याच्यावर चर्चा न करता अनेकजण माझ्या हेतूवरच चर्चा करतील. मी कधीच एका कोणत्या जातीला दोष दिलेला नाही. कृपा करून तसा गैरसमज करून घेऊ नका. इतके सारे लिहिल्यानंतरही काही महाभाग माझी जात काढायला टपतीलही...)
नमस्कार सायबांनो....मी कोपर्डीतली मुलगी बोलती हाय...व्हंय ..तिच ज्या माझ्या मराठा जातीमुळं आज माझ्या जातीतले बरेच मराठे जागे झाल्याती....मी असंही ऐकलं हाय की फकस्त माझ्या गावचे न्हाय तर अख्ख्या महाराष्ट्रातले मराठे माझ्यासाठी रस्त्यावर उतरल्यात...लय बरं वाटलं सायब...आजच्या जमान्यात कुणी कुणाचं नसतं बघा...तरी पण माझ्या जातीचे मराठे मोर्चे काढत्यात...अहो सायब.....जव्हा त्या अनोळखी माणसांनी मला मारलं तव्हा माझी अवस्‍था बघितली असतीना.. मग कळलं असतं..! कशासाठी काढताय हे मोर्चे बिर्चे...माझ्यासाठी निघालेले हे मोर्चे आता माझ्यासाठी न्यायासाठी नाही राहीले सायब....आता हे लोकं त्यांच्या भविष्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मोर्चे काढू लागलेत...मध्येच अॅट्रॉसिटी असा कोनता तरी कायद हाय बघा...ज्याच्यामुळं दलितांना सुरक्षा मिळती...तो बंद करायचा म्हणत्यात...बलात्कार करणारा बी दलितंच होता की...मग तो अॅट्रॉसिटी कायद बंद झाल्यावर मला न्याय मिळणार हाय का...तसं असंन तर सायब...तो अॅट्रॉसिटी कायदा बंद झाल्यावर माझा जीव मला परत मिळंन का...? इकडचे पोलिस काका म्हणत्यात....ती राक्षसं दारूच्या नशेत होती..'' पोलिस काका...आमच्या कोपर्डी गावात तर दारूबंधी होती ना...तरीपण त्या राक्षसांनी 20 रूपयांची दारू कशी ठोसली...? '' हे कोणी कसं जाणून नाय घेतलं...आरं देवा...मी विसरलीच ना...सगळी लोकं मराठा क्रांती मुक मोर्च्याच्या इव्हेंट म्यानेजमेंटमध्ये बिझी झालेत...पण सायब...आमच्या गावकऱ्यांना माहित असेलच ना...दारूबंदी असताना पण आमच्या गावात गावठी दारू कशी आली...गावाची बदनामी व्हईल म्हणून ते शांत बसलेत का...? जाऊद्या ना...ते म्हणत असतील दारूवर पैसा कमविणारे मंत्री सायब काय बोलत न्हाय तर आपण का मधी पडायचं...? .खरंय त्यांचं...मी त्यांच्या घरातली मुलगी नव्हती अन ना कोणत्या मंत्र्या संत्र्याची मुलगी होती. सायब...मी जर मंत्र्या संत्र्याची मुलगी असली तर माझी केस फास्ट कोर्टातच गेली असती ना...माझ्यावर झालेल्या अत्याचाराला जातीपातीचा जळकट वास लागलाच...आमच्या काही स्वार्थी मराठ्यांनी भलतीच अॅट्रॉसिटी आणि आरक्षणाची मागणी केली...यात लढाई ही 'पिडीत मुलीविरूद्ध आरोपी' अशी व्हायला पाहीजे होती...पण काही पुढाऱ्यांनी 'मराठा विरूध्द दलित' संघर्ष पेटवला...आणि त्यात माझ्या न्यायासाठीची आग विझली...मायबाप हो...विसरू नका...जव्हा माझ्यावर बलात्कार होत होता तव्हा कोणतंही आरक्षण आणि कायदा पाहून माझ्यावर बलात्कार केला नाय....तर माझी स्त्री जात पाहून बलात्कार झालाय....फेसबूक, व्हॉट्सअपवर माझ्यावर खूप जणांनी लेख लिहून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.....पण अशी विकृती कशामुळे जन्माला येते आणि तिचा बंदोबस्त कसा करायचा, याबाबत मात्र कोणीही बोलायला तयार न्हाय.... लाखो मराठ्यांनी मोर्चा काढून त्यांच्या जातीची ताकद दाखविली..पण सायब ंमाझं झालं ते झालं...पण माझ्यानंतर आणखी दुसऱ्या कोण्या मुलीवर बलात्कार होऊ नये यासाठी कोणी बोलायला तयार नाही... आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागणीपेक्षा कोणत्याही गावात दुसरी कोपर्डी घटना घडणार नाही यासाठीच्या उपाययोजनांची गरज हाय....मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणजे गावातली प्रत्येक मुलगी , महिला सुरक्षित झाली असं न्हाय...किंवा अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला म्हणजे मला न्याय मिळेल असंही न्हाय....त्यामूळे मायबाप हो...आता जाती-धर्माच्या पलीकडं जाऊन माणूस म्हणून पाहण्याची ही वेळ आहे. यासाठी आता आपले कोष फोडून ना कोणता भगवा आणि ना कोणता निळा.....तर मानवतेचा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरण्याची ही वेळ आहे....तुम्ही मला न्याय मिळवून द्याल ना?
दै. एकमत (लातूर), दिनांक:- ८/१०/१६ 

3 comments:

vidyadharbp said...

मोर्चे काढताना मागण्याही वाढू लागल्या आहेत... मूळ विषय दुर्लक्शित होऊ नये यासाठी हे लिखाण खूप उपयुक्त ठरू शकते

प्रमिला म्हणे said...

धन्यवाद सर

प्रमिला म्हणे said...

धन्यवाद सर