My Blog List

Saturday, 1 February 2020

सांगा त्या वहीखात्यात आमच्यासाठी किती कोटी ?

मित्र-मैत्रिणींनो, काल दिवसभर बजेट बघत होती...खरं तर सकाळी नाश्त्याला ब्रेडसाठी जास्त पैसे लागतील म्हणून घरच्यांना चहा चपातीचा नाश्ता करणारी एक महिला, तर ग्रामीण भागात पहाटे 4 पासून शेतात राबल्यानंतर काळ्या मातीत पिकाची सोनं पाहून सुखावणारी महिला या दोन्ही व्यक्ती या बजेटला कसं पाहत असेल? हा विचार मनात आला. आणि विचार करता करता सवयीप्रमाणे त्या ओळीत उतरल्या... प्रयत्न केलाय कविता करण्याचा... किती जमलंय माहीत नाही. पण केलाय.

आमच्या घरी ना गाडी नी घोडी
हा...पण रस्त्यांची दुरुस्ती हवी होती थोडी
आकडे पाहिले टीव्हीवर लैच बडीबडी...
सांगा त्या वहीखात्यात आमच्यासाठी किती कोटी ? 

गावात इंटरनेटचं जाळं बनवणारेय 
आमच्याच गावातली एक बाई बोलत होती
इंटरनेट चालवायला गावात थोडी लाईट हवी होती
सांगा त्या वहीखात्यात आमच्यासाठी किती कोटी ?

गावातून किसान रेल योजना सुरू होणार 
टिव्हीवरची एक बाई बोलत होती 
कर्ज फेडता फेडता माह्या पोराचं नाय बरं...
ती तुमची शेतकरी योजनाच झाडावर फाशीचा झोका खेळत होती...
सांगा त्या वहीखात्यात आमच्यासाठी किती कोटी ?

इवली इवली बाळं, न जाणे किती ती भुकेली होती
तुमची कुपोषण योजनाच कुपोषित झाली होती
देवच जाणो, खात्यातले पैसे कुणासाठी पोषित होती
सांगा त्या वहीखात्यात आमच्यासाठी किती कोटी ?

निसर्गाची भाषा समजणारे, वाऱ्यावर जगणारे आदिवासी
ज्याला प्रकृतीची भाषा समजली पण तुमचं बजेट काही समजले नाही 
पालातल्या पालात रोज बलात्काराचं मरण ही पाहत होती
सांगा त्या वहीखात्यात आमच्यासाठी किती कोटी ?

मुलाच्या शिक्षणासाठी डोनेशनची जुळवाजुळव करत होती 
शाळेचा कॉर्पोरेट टच पाठीवरच्या दप्तराला जड वाटत होती
रोजगाराच्या संधी गावाच्या वाटेवरून हरवत होती

सांगा त्या वहीखात्यात आमच्यासाठी किती कोटी ?

#प्रमिला_म्हणे #बजेट2020 #महाराष्ट्र #शेतकरी #आदिवासी #BUDGET2020 #maharashtra

No comments: