My Blog List

Thursday, 12 March 2015

मनातले बळ मोठे असले तर पंखही आपोआप मोठे होतात!



मनातले बळ मोठे असले तर पंखही आपोआप मोठे होतात!

‘एक झेप मैत्रीणीची’ मध्ये जान्हवी राऊळ यांचे महिलांना मार्गदर्शन

कल्याण, प्रतिनिधी

आपण एकदा आपल्याला गवसलो की, काहीच कठीण नसते. आपण आपल्याला काय हवे आहे, याचा शोध घेऊन त्यामागे लागलो की फक्त पंख बाहेर काढून उंच उडायची गरज असते आणि मनातले बळ मोठे असले तर पंखही आपोआप मोठे होतात. आकाशात ‘झेप’ घ्यायची संधी मिळते, असा सल्ला एक अविनाशी ‘झेप’ मासिक आणि मैत्रीण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘एक झेप मैत्रीणीची’ या कार्यक्रमात ‘ब्रँड गुरू’ जान्हवी राऊळ यांनी उपस्थित महिलांना दिला.

कल्याण येथील मैत्रीण संघ आणि एक अविनाशी ‘झेप’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘झेप’ मासिकाचा महिला दिन विशेषांक व कर्तुत्ववान महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान ‘ब्रँड गुरू’ जान्हवी राऊळ यांनी भूषविले होते. सायंकाळी ४ च्या सुमारास कल्याणच्या शिवाजी चौक येथील गीता हॉलच्या सभागृहात प्रवेश करणार्‍या प्रत्येक महिलेच्या चेहर्‍यावर सत्कार सोहळ्यासाठीचा व सुप्रसिद्ध नृत्यांगणा सुकन्या काळण यांच्यासाठीचा उत्साह दिसून येत होता. कार्यक्रमाची प्रस्तावना एक अविनाशी ‘झेप’ मासिकाच्या संपादिका प्रमिला पवार यांनी केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, महिलांच्या मनात असलेली पोलिस स्टेशनबाबतची भिती दूर करण्यासाठीचे नवे शिवधनुष्य ‘झेप’ टिमने पेलले आहे. यासाठी ‘झेप’ मासिकाच्या सहसंपादिका नमिता दोंदे, कार्यकारी संपादक नितिन सोनावणे, उपसंपादक सोनम ढेपे-मोरे व वितरक जनक सोनावणे यांच्या कार्याचे कौतूकही त्यांनी केले. त्याचप्रमाणे मैत्रीण संघाच्या अध्यक्षा विजयाताई पोटे यांनी वेळोवेळी ज्या हातांनी चुका झाल्यावर धपाटे दिले त्याच हाताने शाबासकीची थाप दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. जान्हवी राऊळ जशा आज ‘ब्रॅण्ड गुरू’ बनल्या आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनामूळे प्रत्येक महिला या आपल्या व्यवसायाचा ब्रॅण्ड तयार बनवतीलच पण आमचे ‘झेप’ मासिकही भविष्यात मोठे ब्रॅण्ड बनेल, अशी आशा संपादक प्रमिला पवार यांनी व्यक्त केली.

विजयाताई पोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ‘झेप’ मासिकाच्या सहसंपादिक नमिता दोंदे यांच्या उत्कृष्ट कार्याचे कौतूक केले. तसेच महिलांनीही जान्हवी राऊळ सारखे यशस्वी उद्योजक व्हावे, यासाठी त्यांचा मैत्रीण संघ नेहमीच सहकार्य करेल, असे सांगितले. ज्या महिलांनी खर्‍या पद्धतीने कर्तुत्व गाजवले आहेत व त्यांचा आजतागायत कुठेही सत्कार करण्यात आला नाही, अशा नारी शक्तींचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये संगीतक्षेत्रातील मंजुषा थत्ते, शैक्षणिक क्षेत्रातील छाया घाटगे, नृत्यक्षेत्रातील सुकन्या काळण, पत्रकारिता क्षेत्रात प्राजक्त पोळा, उद्योजिका योगिता रासम व भारती शिंपी, आर्मी क्षेत्रात कॅप्टन. अनुराधा रानडे, आरोग्यक्षेत्रात रुपाली कुलकर्णी व स्मिता भोसले, साहित्य क्षेत्रात वैशाली कांदळगावकर या नारी शक्तींच्या कार्याचा गौरव सन्मानचिन्ह व तुळस देऊन करण्यात आला. त्यानंतर झेप मासिकाचा महिला दिन विशेषांकाचा प्रकाशन सोहळा प्रमूख पाहूणे जान्हवी राऊळ यांच्या हस्ते पार पडला. ‘झेप’ मासिकाच्या मुखपृष्ठावर ‘महिला पोलिस स्टेशनमध्ये जाण्यास घाबरतात का?’ या कव्हरस्टोरीचे अनेकांनी कौतूक केले. तसेच सुप्रसिद्ध कवयित्री विजया वाड लिखीत ‘मला जन्मु द्या हो’ ही कविता आकर्षक ठरली आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध नृत्यांगणा सुकन्या काळण हीने ‘आप्सरा आली’ या गाण्यांवरील ठूमक्यांनी कार्यक्रमाची शान वाढविली. तिच्या धमाकेदार परफॉर्मन्सने उपस्थित महिलांनी तिच्या तालावर ताल धरून डान्स केला. महिलांचा हा हक्काचा एक दिवस त्यांनी अतिशय सुंदर व मनोरंजनात्मकपणे घालविला. कार्यक्रमाची सांगता ‘झेप’ मासिकाच्या टीमने आपल्या मासिकाच्या प्रती मैत्रीण संघाच्या अध्यक्षा विजयाताई पोटे यांना भेट देऊन केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नमिता दोंदे यांनी अतिशय आकर्षकपणे केले. झेप मासिक विक्रीसाठी उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ९७०२३१७१३३ किंवा ८०९७७२८०९७ या क्रमांकावर संपर्क साधावा.


No comments: