My Blog List

Wednesday, 26 August 2015

बंध धाग्यांचे पण अर्थ निराळे...

कॉलेजच्या तरुणांमध्ये गेल्या आठवड्यात उत्साह होता तो फ्रेंडशिप डेचा. अनेकांनी अगदी दोन दिवस हा फ्रेंडशिप डे अगदी जोमाने साजरा केला. फ्रेंडशिप बँड बांधून एक अतुट नातं निर्माण केलं जातं. तसंच रेशमी धाग्याची कोमलता घेऊन येणारं अजून एक नातं म्हणजे बहीण-भावाचं. एकीकडे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून फ्रेंडशिप डे साजरा केला गेला. तर त्यानंतर आठवड्याभराच्या फरकाने भारतीय संस्कृतीनुसार रक्षाबंधन साज
रं होईल. मैत्रीचं नातं काय किंवा बहीण-भावाचं नातं काय, दोन्ही नात्यांची जाणीव करून देण्यासाठी एकच रेशमी धागा बांधला जातो. या दोन्ही नात्यांचा अर्थ जरी वेगवेगळा असला तरी त्या दोन्ही नात्यात सच्चेपणा आणि विश्वास हा असतोच. अशा रेशमी धाग्यात अडकलेल्या नात्याविषयी.
सध्या सोशल नेटवर्किंग साइटवर एक मेसेज फिरतोय, ‘लास्ट संडे फ्रेंडशिप डे, नेक्स्ट संडे राखी, इस संडे आप लडकी के पिछे, नेक्स्ट संडे लडकी आपके पिछे’. या मेसेजवरून सगळं काही कळतं. एखाद्या मुलीनं मैत्री करावी म्हणून तिच्या पाठीपाठी फिरणार्‍या मुलांसाठी हा मेसेज आहे.  ‘फ्रेंडशिप डे’ला तर व्हॉटस् ऍप, फेसबुक यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर तर शुभेच्छांना अगदी उतच आला होता. प्रत्येक जण आपल्या खास मित्राला किंवा मैत्रिणीला, एवढंच नाही तर अगदी तोंडओळख असणार्‍यांनासुद्धा मेसेज, इमेजेस टाकत होते. परंतु कॉलेजिअन्समध्ये फ्रेंडशिप डे असा रंगात आलेला असतानाच त्यांना ‘फ्रेंडशिप डे’नंतर एकाच आठवडयात येणार्‍या रक्षाबंधनाचंही टेन्शन आलं होतं.
अगदी मैत्रीसारखंच अतुट नातं म्हणजे रक्षाबंधन. बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याला उदंड आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करते. तर भाऊ तिला वचन देत म्हणतो की, ‘‘ मी सदैव तुझी रक्षा करेन. फ्रेंडशिप डे सारखंच यादिवशी देखील हाताला रेशमी धागा बांधून हे नातं अधिक घट्ट बनवलं जातं. पण फ्रेंडशिप डे साजरा करायला उत्सुक असणारी तरुणाई रक्षाबंधनाला तर कॉलेजमधून गायबच होते. सख्खे भाऊ-बहीण हा दिवस आवडीने साजरा करत असले तरी कॉलेजमध्ये जाताना मुलांच्या मनात भीति असते की एखाद्या मुलीने फ्रेंडशिप डेचा बँड बांधते असं सांगून मला राखी बांधली तर काय? मित्राऐवजी थेट मानलेला भाऊच बनवलं तर काय ? या धास्तीने बरेच तरूण दोन दिवस कॉलेजला बंकही करतात. रक्षाबंधनाच्या दिवशी शक्यतो मुलींना टाळण्याकडेच कॉलेजमधील मुलांचा कल असतो. ‘तुच माझा सच्चा दोस्त’ असं सांगणारा तरुणवर्ग रक्षाबंधनाला आपल्या सख्ख्या बहिणीला सोडून कोणासमोर हात पुढे करतच नाही.
पण मुली देखील काही कमी नसतात. एका तरी मुलाला मला भाऊ बनवायचंच आहे, असा निश्चय त्यांनी केलेला असतो. मग अशा एखाद्या मुलाला भाऊ बनवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या त्या लढवतात. फ्रेंडशिप बँडसारखीच दिसणारी ट्रेन्डी राखी आणतात आणि ती राखी त्यांना बांधतात. एकदा का राखी हातात बांधली की त्यांना खरं सांगतात. मुलांच्या त्रासापासून स्वत:ला वाचवण्यासाठी मुली असे किंवा यांसारखे अनेक प्रकार करतात. पण यातले काही तरुण खूपच हुशार असल्यामुळे ते या दिवशी कॉलेज, क्लासच्या आजूबाजूलासुद्धा फिरकत नाहीत. फ्रेंडशिप डेच्या वेळी अंगात उत्साह संचारलेली मंडळी रक्षाबंधनाला कोण जाणे कुठे नाहीशी होतात ! तसं बघायला गेलं तर ही दोन्ही नाती अगदी अतुट आहेत. त्यात जितकं साम्य आहे त्याच्या कित्येकपटीने त्यात फरकही आहेत. भावांसाठी आणि बहिणींसाठी असणारं प्रेम आणि एखाद्या मित्रमैत्रीणीसाठी असणारं प्रेम यात बराच फरक आहे.
पण नातं कोणतही ही असो यात विश्वास, निरागसता, प्रेम, सच्चेपणा आहे आणि तो विसरून चालणार नाही. नातं कोणतंही असो ते टिकवणं महत्वाचं हाच संदेश हे रेशमी धागे देतात. म्हणून तर ही बंधनाची शपथ घातली जाते. पाश्चात्य संस्कृतीचा आपण अवलंब करत असलो तरी आपल्या भारतीय संस्कारांचा आणि विचारांचा तरुणांना विसर पडू नये हे मुलांनाही लक्षात ठेऊन वागावं. आजकाल, ‘मी तुझा मित्र आहे ना !’ असं सांगून कित्येक मुलं मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. या जवळीकीची परिणीती कदाचित त्या मुलीला नकोशा घटनांमध्येही होऊ शकते किंवा तिला अती जवळीक नकोही असेल. पण हेच मित्राला सांगण्यासाठी तिला मग नाईलाजाने रक्षाबंधनाचा आधार घ्यावा लागतो. मैत्रीचं नातं जसं पाण्यासारखं स्वच्छ असावं, तसंच भावाबहिणीचं नातं ही असावं. 

Monday, 17 August 2015

श्रावणी सोमवार, शिव आणि आपण...

आज पहिला श्रावणी सोमवार...श्रावण महिन्यात कुणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास असतो... काही जण खास करून सोमवार पाळतात...पण, हा उपवास का पाळतात? या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत...दै. धावते नवनगरमध्ये आज प्रकाशित झालेल्या माझ्या लेखामधून....

Sunday, 16 August 2015

केईएम...रूग्णांना आधार देणारी जीवंत इमारत!

गेल्या काही दिवसांपासून सततच्या आजारपणामूळे मुंबईतल्या के.ई.एम. ला जवळून पाहण्याची संधी मिळत आहे. मी एक ना एक दिवस बरी होईलच हो...पण अख्ख्या मुंबईकरांना ठणठणीत करणारे के.ई.एम. जणू आधारगृह ठरले याचे कारण मला कळले. सुरवातील माझा खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. परंतू तेथे व्यवस्थीत उपचार होत नसल्याने कुटूंबीयांनी मला के.ई.एम. मध्ये उपचार करण्याचे सुचविले. सुरवातीला शासकीय रूग्णालयाच्या बाबतीत अनेक नकारात्मक गोष्टी ऐकून इच्छा नाही झाली. पण तेथे डॉक्टर्स उत्तर उपचार करतात म्हणून के.ई.एम. ची इमारत गाठली. मुंबईतल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्याही गरीब माणसाला त्याच्या आजारपणात मायेनं जवळ घेणार एकमेव ठिकाण म्हणजे केईएम हॉस्पिटल. असे का बोलले जाते याचा अनुभव सध्या मला येत आहे.
गेलं पाउण शतक या वास्तुनं गरीबाला आपलंसं केलं आहे, त्याला कुणाची दुष्ट लागू नये. जवळजवळ साडेपाचशे निवासी डॉक्टर्स असलेलं अठराशे खाटांचं हे हॉस्पिटल दरवर्षी साधारणतः लाखभर रुग्णाना प्रत्यक्ष दाखल करुन घेऊन त्यांच्यावर उपचार करीत असतं. आणि साध्यासुध्या आजारपणासाठी नुसत्या वरवरच्या तपासण्या, इंजेक्शन, औषध-गोळ्या घेऊन जाणार्‍यांची संख्या तर दहा लाखांच्यावर आहे. लांबरुंद पसरलेल्या या दगडी वास्तूला तिचं एक व्यक्तिमत्व आहे. तिची एक ओळख आहे. आरोग्य या अत्यावश्यक आणि कमर्शीअल बनत चाललेल्या सेवेच्या दुनियेत केईएमचा साधेपणाच ग्रेट वाटतो.
आजारी माणूस सहसा एकटा कधीच हॉस्पिटल मध्ये दाखल होत नसतो. त्याच्यासोबत किमान चार-सहा माणसं तिथं हजेरी लावतातच लावतात. म्हणजे केइएम हॉस्पिटलनं कितीतरी माणसांचा जन्मापासून मृत्युपर्यंतचा प्रवास पाहिला असेल. त्या प्रवासातील असंख्य अडथळयांचे डोंगर पाहिले असतील. आजारातून निर्माण होणार्या यातना, दु:ख, भोग अनुभवले असतील. केईएम ही निर्जीव वास्तू आहे म्हणून ठीक अन्यतः त्या वास्तूला जर माणसासारख्या भाव-भावना असत्या तर ती वास्तू कधीच कोलमडून गेली असती. माणसाच्या दु:खाचं महाभारत केईएमनं पचवलं आहे. यापुढेही हा सिलसिला असाच चालत राहणार. रहायला पाहिजे.
दिवसभराचा उकाडा संपून उघडया रस्त्यावर जराशी हवा खेळते आहे. रात्रीचे साडेबारा वाजून गेलेत. केईम समोरच्या सिग्नलचे सगळे दिवे बंद होऊन आता फक्त ऑरेंज रंगाच्या दिव्याची उघडझाप होते आहे. हॉस्पिटलच्या आणि काळोखाच्या पार्श्वभुमीवर ऑरेंज रंग किती भयानक दिसू शकतो. याची कल्पना इथे होते.
केईएमच्या गेट क्रमांक दोननं आत गेल्यावर तिथं एक मोकळी लॉबी आहे. उजव्या बाजूला दिवसरात्र चालणारं केमिस्टचं दुकान. तिथुनच दहा पावलावर ओपिडी. तीही रात्रभर चालू. बाहेरुन आलेला पेशंट तिथं दाखल केला जातो. रात्री अकरानंतरही अधूनमधून कुणी ना कुणी तिथं येतच होतं. आलेल्या प्रत्येक पेशंटला सावरण्यासाठी आठ-दहा माणसं असतात. पण पेशंट बरोबर आत फक्त एकच रहा असं सांगायला सिक्युरिटी,डॉक्टर, काहीवेळेला पोलिसही येतात. हेच सांगणारी दारावर पाटी आहे. पण तिचा काही उपयोग नसतो. यात सगळ्यांचीच दहाएक मिनिटं मोडतात. पण याला इलाज नसतो. शेवटी पेशंटसोबत उरतो तोच त्याच्या जवळचा. बाकीचे सगळे आप्तेष्ठ, सगे सोयरे आणि मित्रपरिवार. जे बाहेर आसपास रेंगाळत राहतात.
त्याच लॉबीत डाव्या बाजूला संयोग गणेश नावाचा गणपती आहे. काहीना विषेशतः पेशंट सोबत येणार्या कार्यकर्त्यांना त्याची माहीती असते. ते त्याच्या पुढयात येतात. पायातल्या पायात चपला-बुट सरकवतात. खडेखडे पाया पडतात आणि निघुन जातात. मग त्याचं बघुन कुणी त्याच्यानंतरही तेच करतात. हे थोडावेळ चालतं. मग पुन्हा शांतता. याच चौकोनी परिसरात रात्री माणसं मारुन टाकल्यासारखी इतस्ततः पडलेली असतात. पिशवीचा- चपलेचा आधार उशाला घेऊन. ते ही न मिळाल्यास हाताच्या मनगटावर डोकं ठेऊन रात्रभर पडून राहतात. मिळालाच तर एखाद्या वर्तमानपत्राचा तुकडा घेऊन तिथंच पसरतात. काही माणसं जागीच असतात. अधुनमधुन एखादी डुलकी. अन्यतः टकटक इकडंतिकडं भांबावल्यासारखी बघत. एखाद दुसरा एकमेकांशी बोलत, गप्पा मारत असतात.
तासा दोन तासानी पंधरा-वीस जणांचा घोळका निशब्द चेहर्यांने ओळीत बाहेर पडतांना दिसतो. ही खुण माणूस गेल्याची असते. काहीच्या डोळयात पाणी तरारलेलं असतं. कुणाचा हात कुणाच्या खांद्यावर असतो. जन्ममृत्युमधला खेळ कुणीतरी कुणालातरी सांगत-समजावत असतो. सगळं संपल्यानंतरची हतबलता किंवा सुटल्याचे भाव एकमेकांच्या चेहर्यावर पसरलेले असतात. त्यातल्याच कुणाचीतरी सराइतपणे पुढची तयारी सुरु होते.
रात्री दिड-दोनच्या दरम्यान एक म्हातारा हॉस्पिटल्च्या मागच्या बाजूस ३१ नंबरच्या खिडकीवर जिथं औषध मिळतात तिथं ठोठावत होता. विचारलं. तर म्हणाला, देखो ना, कोई नही है. खिडकीतला दिवा लागलेला होता. तिथला माणूस जाग्यावर नव्हता. तिथं बहुदा औषध फुकट मिळत असावीत. त्या माणसाच्या नाकातून रक्त गळत होतं, काय झालं असं खुणेनंच विचारलं. तर रडायला लागला. पैसे नाहीत म्हणाला. हातातला केसपेपर, औषधाच्या चिठठया दाखवायला लागला. काय झालं म्हणून पुन्हा विचारलं, तर अर्ध्याकच्च्या मराठी हिंदीत म्हणाला, काळाचौकीतून आलोय, तिथं एक माणूस बायकांसमोर दारु पिऊन अचकट विचकट चाळे करीत होता. याला त्याचा राग आला. म्हणून विचारलं तर त्यानं याच्या अंगावर हातातली बाटली फेकून मारली. डोळा वाचला. नाकाच्या वरती फाटलं होतं. रक्ताचा ओघळ थांबत नव्हता. डॉक्टरनंही मलमपटटी न करताच त्याला इकडं औषध आणायला पिटाळला होता. आणि हा खिडकीवर ठोठावत होता. तो पण प्यायलेलाच होता. त्यामुळे खिडकीवर ठोठावण्याचा वेग आणि आवाज वाढत गेला.
गेटवर गाडी उभी राहिली की गेटसमोरचा आडवा दांडा आपोआप वर येतो. तपासायच्या भानगडीत कुणी पडत नाही. जागोजागी सिक्युरीटी आहे. पण सुस्त. काही अघटीत घडल्याशिवाय यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे खुर्च्या गरम करीत जो तो आपापल्या जागी बसलेला असतो. सगळ्या मुंबईची सिक्युरीटीची जबाबदारी उत्तरप्रदेशी मुलं सांभाळत असताना इथे सगळे मराठी. हे ही काही कमी नाही.
पहिल्या मजल्यावर लांबचलांब गॅलरीत दोनही बाजूला माणसं पडलेली असतात. अधेमधे लाकडी बाकडी आहेत त्यावरही कुणी झोपलेला असतो. इथं बसल्यावर लक्षात येतं. लाकडी बाकडयावरची माणसं अधुनमधुन वळवळत असतात. आजुबाजुशी बोलल्यावर कळलं की, रात्री ढेकुण जागे असतात. इथल्या शांततेला भंग करणारी एक पाण्याची संततधार खाली पडत असते. हे पडणारं पाणि एसीचं असावं असं वाटतं कदाचित टाकी ओहरफ्लो सुध्दा होत असावी. पण हा आवाज आपल्याला टाळता येत नाही. केईएमचे व्यवस्थापन या आवाजाला का टाळत असावे?
तरुण डॉक्टर्स जिन्सच्या पॅन्टस. सफेद डगला आणि गळ्यात स्टॅथोस्कोप घेऊन इकडून तिकडे. अधुनमधून बाहेर ज्युस सिगरेटी किंवा काही खाण्यापिण्यासाठी फिरत असतात. गरीब पेशंटच्या आजुबाजूला ही गोरी-गोमटी तरुण डॉक्टर पोरंपोरी फारच श्रीमंत वाटतात. या हॉस्पिटलमध्ये येणारे बरेचसे रुग्ण गरीबच असतात, त्यांच्याशी वागण्याची डॉक्टरांची पध्दत पाहिली की कधीकधी अश्या ज्युनीअर डॉक्टरांना फटके का पडतात याची कल्पना करता येते.
नर्सेसची लगभग चालू असते. सिनिअर नर्स फोन आणि खुर्ची सोडत नाही. काहीतरी लिखाण चालू असतं, कुणावरतरी ओरडणं चालू असतं. पण ज्युनीअर इकडे-तिकडे येरझार्या मारीत असतात. त्यातून आया नावाची जमात बिनधास्त वावरताना दिसते. चेहर्यावर तिटकारा आणि तोंडाचा पटटा चालू अश्या अवस्थेत त्या काम करीत असतात. वॉर्डबॉय आपल्याच तोर्यात कानाला हॅन्डस फ्री लाऊन गाणी ऐकण्यात किंवा बोलण्यात दंग असतात. बरेचसे रुग्णांचेच नातेवाईक स्ट्रेचर इकडून तिकडे नेताना दिसतात. हे काम वॉर्डबॉयचं आहे हे कुणी कुणाच्या लक्षात आणून द्यायचं? केइएम परिसरातलं आदिती, ओन्ली फिश, व्हेज ऑलवेज सारख्या चकचकीत हॉटेलच्या तुलनेत मिलन हॉटेल अनेकानां आपलं वाटतं. त्या होटलनं आपला गरीब चेहरा गेली अनेक वर्ष आहे तसाच ठेवला आहे. फुटपाथ पुर्णपणे अडवून बसलेल्या या हॉटेलांनी आजवर कित्तेक महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचे खिसे गरम केले असतील. त्याचं त्यानाच ठाऊक. अधुनमधुन महानगरपालिकेकडून फुटपाथ साफ केली जातात, अतिक्रमणावर हल्ले केले जातात, पण पुन्हा दुसर्या-तिसर्या दिवसापासनं परिस्थीती जैसे थे.
हॉटलामध्ये जाऊन बसून खाण्याइतपतही ज्यांची ऐपत नाही त्यांच्यासाठी बुर्जीपाव, राईस, पावभाजी च्या गाड्या अगदी कामगार मैदानापर्यंत उभ्या असतात. बारा-पंधरा इंचाच्या तापलेल्या लोखंडी तव्यावर तेल आणि पाण्याचे फवारे चरचरत असताना पाहणं मोठं मजेशीरच. भाजीला आलेल्या उकळ्या आणि बुर्जीला सुटत असलेलं तेल पाहतांना नकळत भुक लागल्यासारखी वाटते. आजपर्यंतच्या माझ्या खानपानाच्या अनुभवात पावभाजी या जोडगळीतले पाव नरमच असतात. इथे एका माणसाने कडक पाव असं म्हटल्यावर मी कुतुहलानं पाहिलं तर. भाजी करणार्या पोरानं पाव पोटात फाडून त्याला उलटा शेगडीला पालीसारखा चिकटवला. पाव दोन मिनटात नरमचा कडक झाला होता. या गाडया बाराच्या पुढे थांबत नाहीत. कारणं तिच. पोलीस वैगेरे. पण नंतर अगदी केईएमच्या दारावरच रात्रभर ऑमलेट बनवणारी बाकडी असतात. पेशंटचे नातेवाईक, पिऊन चुकलेले, भुकेलेले आणि टॅक्सीवाले मात्र यावर तुटून पडलेले असतात. चहा तर असतोच. सिगरेटी, गुटका, तंबाकू यांचीही सोय असते.
केईएमच्या गेटवर निपचित उभ्या असलेल्या ऍम्बुलन्स आपलं चित्त वेधुन घेतात. गर्दीला भेदून रोरावत जाणार्या या अऍम्बुलन्स आता दबा धरुन बसल्यासारख्या वाटतात. ऍन्बुलन्सच्या सफेद रंगावर उलटया क्रमाने लिहिलेली लाल अक्षरे वाचवत नाही. कितीतरी माणसांनी यातच आपला प्राण सोडला असेल. कितीतरी जणानी मृतुनंतर स्मशानापर्यंतचा प्रवास केला असेल.
रात्रीच्या गडद शांततेत एखादी ऍम्बुलन्स भोंगा वाजवत आत शिरते. तेव्हा इथं उभ्या असलेल्या प्रत्येकाचेच डोळे कान टवकारतात. नकळत ऍम्बुलन्सच्या दिशेने माना वळतात. उताणी पडलेला पेशंन्ट. त्याला सावरणारे त्याचे नातेवाईक. लगबघीनं पुढ आणली जाणारी स्ट्रेचर. दोन-पाच मिनिटांचा हा खेळ. पुन्हा जो तो आपापल्या व्यापात. केईएमच्या परिसरात रात्र गजबजलेली नसली तरी जागी असते. कारण कोण, कधी, कसे एन्ट्री आणि एक्झीट घेईल माहीत नसते. त्यामुळे बाकी उरलेल्यांचा जन्म आणि मृत्युच्या मध्ये थांबून टाईमपास चाललेला असतो.

Saturday, 15 August 2015

मराठी रंगभूमीचा आधारवड!

नटवर्य, गायक, नाट्यसंस्था संचालक आदि अनेकविध भूमिकांमधून आयुष्यभर रंगदेवतेच्या सेवेत सतत मग्न असलेले भालचंद्र पेंढारकर ऊर्फ अण्णांनी मराठी रंगभूमीला अलविदा केला. अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण या सर्व क्षेत्रात पेंढारकर यांनी आपला विशेष ठसा उमटवला. अण्णांच्या जाण्याने मराठी रंगभूमीचा आधारवडच कोसळल्याची भावना नाट्यसृष्टी पोरकी झाली खरी पण त्यांच्या अफाट कार्यकर्तुत्वाची कलाकारांना कायमच स्मरण राहील. त्यांच्या या अफाट कार्यकर्तुत्वाचा घेतलेला हा एक आढावा....

‘चलता है’ हा ऍटीट्यूड नको!


सेलिब्रीटींचा स्वातंत्र्यदिन
आज १५ ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यदिन...आज भारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष पुर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यासोबत मिळालेल्या अधिकारांबाबत प्रत्येक भारतीय हा आग्रही दिसून येतो. मात्र, अधिकारांसोबतच भारत देशाप्रति असलेल्या कर्तव्याबाबत ‘चलता है’ हा ऍटीट्यूड ठेऊन नागरिकांमध्ये उदासिनता दिसून येते. अशा प्रतिक्रीया मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रीटींनी दै. धावते नवनगरच्या उपसंपादक प्रमिला पवार यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत. 

Sunday, 9 August 2015

स्वातंत्र्यदिन औपचारिकता की सोहळा?

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा होणार... दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी, राजधानी दिल्लीत ध्वजवंदन, परेड होईल...शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल... सगळ्या राज्याची मुख्यालये, पोलीस स्टेशन, शाळा, महाविद्यालये अगदी गल्लोगल्ली तिरंगा फडकवला जाईल... सगळीकडे मोठ्या आवाजात देशभक्तीपर गीते गायली जातील... काही ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जातील... सगळीकडे सडा टाकून मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातील... महात्मा गांधी , नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग आदी राष्ट्रनेत्यांच्या तसबिरींना हार घालून मानवंदना दिली जाईल...
सिग्नलवर गरीब लहान मुले झेंडे विकतील... तर दुसरीकडे हे झेंडे विकत घेऊन लहान मुले आनंदाने ते फडकवतील... काही उत्साही शर्टाला छोटासा झेंडा लावून मिरवतील... तर काही जण झेंडावंदनाला दांडी मारून स्वातंत्र्यदिनाप्रित्यर्थ मिळणार्‍या सुट्टीचा मुहूर्त गाठून सहलीचं आयोजन करतील..  यावर्षी तर शनिवारची एक रजा टाकली तर सलग दोन दिवसांची सुट्टी एकच दिवस काय ते ऑफीसमध्ये राबायचे तर पुन्हा सलग दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे लांबचं पिकनिकही प्लॅन करता येईल. त्या एका दिवसापुरतं का होईना आपला उर देशभक्तीच्या जाज्वल्य अभिमानाने भरून येईल... रोमारोमांत देशप्रेमाने आगळेच स्फुरण चढेल... वातावरणात चैतन्य पसरेल!
पण दुसर्‍या दिवशी वेगळंच चित्र दिसेल.. लोकांची कामाला जाण्याची रोजची पळापळ सुरू होईल... लहान मुले पाठीला दप्तराचे ओझे लाऊन शाळेत जातील... स्वातंत्र्यदिनी दिमाखाने फडकलेला तिरंगा रस्त्यांच्या बाजूला कुठेतरी धूळ खात पडलेला दिसेल... देशभक्तीपर गाणी तशीच हवेत विरुन जातील... देशसेवेच्या शपथा दुसर्‍याच दिवशी विस्मरणात जातील... रेल्वेतून प्रवास करताना जरा धक्का लागला म्हणून एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहिली जाईल... खून, मारामारी, चोरी अशा घटना होत राहतील... घराघरांत स्त्रियांवर अत्याचार सुरूच राहतील... एकूणच काय तर स्वातंत्र्यदिनाची परंपरा कायम राखण्याची औपचारिकता पूर्ण होऊन नेहमीच्याच आयुष्याला सुरूवात होईल... आपल्या आजूबाजूला घडणार्‍या चित्रविचित्र घटनांमुळे स्वातंत्र्याच्या या औपचारिकतेची चीड आल्याशिवाय राहत नाही...
तेलंगण राज्याचे विभाजन करण्याचा निर्णय झाला.. त्याबरोबरच वेगळ्या विदर्भ, मुंबईच्या विभाजनाविषयी चर्चा सुरू झाली... आपल्या संविधानात सर्व जाती-धर्म-भाषा समान आहेत असा उल्लेख आहे. आपल्या प्रतिज्ञेतही आपण सर्व भारतीय माझे बांधव आहेत, असे म्हणतो! मग केवळ भाषेच्या जोरावर वेगळ्या राज्याची मागणी का केली जाते?... एखादी भाषा येत नाही किंवा परजातीय लग्न अशा क्षुल्लक कारणावरुन जातपंचायती बहिष्कार टाकतात... जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून वडिलांनी गळा दाबून आपल्याच पोटच्या मुलीचा बळी घेण्याची दुर्दैवी घटना घडते... जातपंचायतीच्या मनमानी कारभारावर स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही आळा घालता आलेला नाही... एका बाजूला दुर्गापूजन करुन स्त्रीशक्तीचा गौरव केला जातो, तर दुसरीकडे कित्येक ‘दामिनीं’चा हकनाक बळी जातो... कित्येक सुशिक्षीत कमावत्या स्त्रियांनाही सासरच्या मानसिक दबावाला बळी पडावं लागतंय... राजपथावर स्वातंत्र्यदेवीचे गुणगान गाणारे राजकारणीही विविध मार्गाने लोकांच्या स्वातंत्र्यावर गदाच आणतात... कोणाला महाविद्यालयीन प्रवेशासाठी झगडावे लागते तर कोणाला एखादे शासकीय काम करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो!
स्वातंत्र्य म्हणजे केवळ परदेशी जोखडातून मुक्तता असा अर्थ घेतला जातो... ब्रिटीशांच्या १५० वर्षांच्या पारतंत्रातून भारत मुक्त झाला. एका परदेशी सत्तेचे आपल्यावरील वर्चस्व संपुष्टात आले... मात्र देशांतर्गत विविध घटकांच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक, राजकीय दबावाचे काय? दरवर्षीचा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा करण्यापेक्षा अशा अंतर्गत दबावांतून देशवासीयांची सुटका झाली तर तो खरा स्वातंत्र्यदिन ठरेल... गेल्या ६८ वर्षांच्या कालावधीत हे शक्य झाले नाही... मात्र याबद्दल नाउमेद न होता यावर्षी तरी काही आश्वासक, सकारात्मक घडेल अशी आशा बाळगूया... तरच स्वातंत्र्यदिन हा केवळ औपचारिकता न राहता खर्‍या अर्थाने सोहळा होईल...

Sunday, 2 August 2015

गोष्ट त्या हरवलेल्या ‘थ्री इडीयट्सची’...


कॉलेजचा तो पहिला दिवस...सायन्स वर्गातले ते पहिले लेक्चर सुरू झाले. सगळे चेहरे अनोळखी...कोणाशी बोलु हेच काही कळत नव्हतं. बेंचवर बाजुला एक मुलगी बसलेली...मराठी भाषेत बोलत असल्याने आमच्या दोघींचा संवाद वाढला आणि कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच आमच्या नव्या यारीला सुरवात झाली. आम्ही दोघी म्हणजेच उमा आणि मी दोघी दिवसेंदिवस एकमेंकींच्या इतके जवळ आलो की दुसर्‍या कोण्या व्यक्तींच्या साथीची गरजच कधी भासली नाही. आम्ही दोघी एकाच बेंचवर बसत होतो आणि लेक्चर सुरू असताना इतरांवर कमेंट्स करून जोक्स करीत होतो. मध्येच टीचर्सने गप्पा मारतात म्हणून ओरडा दिल्यानंतर आमच्या नोटबूकच्या मागच्या पेजवर त्या वेगवेगळ्या कलाकृतींनी रंगलेले नोट बूकचे मागच्या पेजवर आमचे राईट चॅट सुरू होत असे. पण आमची अशी घट्ट मैत्री पाहून आणखी एका मैत्रिणीची भर पडली ती म्हणजे पद्मजा...पद्मजा स्वभावाने चंचल होती. तिला फिरणे, बागडणे आवडत असे. तिघींपैकी एक जरी लेक्चरला बसली नाही तर इतर दोघीही बसत नसायच्या....त्यावेळी तर कॉलेजमध्ये आम्हा तिघींना ‘थ्री इडियट्स’ म्हणूनच चिडवले जायचे. अशी होती एक वेगळीच दुनियादारी....
या मस्तीभर्‍या जगण्याने कधी दोन वर्ष झाली कळलीच नाहीत. त्यानंतर हळुहळु प्रत्येकीच्या आयुष्यात आयुष्यात नव नवी वळणे येऊ लागले आणि आणि हळुहळु प्रत्येकीच्या आयुष्यात नव्याने आलेल्या वळणावर हरवून गेलो. त्यावेळी प्रत्येकीला कळतही होते आपण विश्‍वासाने गुंफलेल्या मैत्रीपासून दूर चाललोय...पण त्यावेळी जमलं नाही...आज जरी विस्तारलेल्या या तीन नद्यांप्रमाणे आम्ही तिघी वेगवेगळ्या ठिकाणी असल्या तरी एकमेकींच्या आठवणीत फ्रेंडशीप डे साठी मनातल्या मनात का होईना शुभेच्छा तर दिल्याच असतील. जागा तीच...कॉलेजचे कंपाऊंड, हातात तेच कॉलेजसमोरील
स्नॅक्स सेंटरमधील फेवरेट वडा पाव...आणि त्याला पावसाची साथ...आणि सोबत रंगणार कॉलेजचे ते हरवलेल्या यारीच्या गप्पा...सगळं काही मनातल्या मनात...आज आजपर्यंत आम्ही तिघी जरी शरीराने वेगळे असलो तरी मनाने एकमेकांसोबत होतो आणि कायम राहणार आहोत हा विश्‍वास जागा झालाय...आणि वाट पाहीने हरवलेले ते थ्री इडियट्स एकत्र येण्याच्या दिवसाची...विश यु अ हॅपी फ्रेंडशीप डे...