My Blog List

Wednesday, 26 August 2015

बंध धाग्यांचे पण अर्थ निराळे...

कॉलेजच्या तरुणांमध्ये गेल्या आठवड्यात उत्साह होता तो फ्रेंडशिप डेचा. अनेकांनी अगदी दोन दिवस हा फ्रेंडशिप डे अगदी जोमाने साजरा केला. फ्रेंडशिप बँड बांधून एक अतुट नातं निर्माण केलं जातं. तसंच रेशमी धाग्याची कोमलता घेऊन येणारं अजून एक नातं म्हणजे बहीण-भावाचं. एकीकडे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून फ्रेंडशिप डे साजरा केला गेला. तर त्यानंतर आठवड्याभराच्या फरकाने भारतीय संस्कृतीनुसार रक्षाबंधन साज
रं होईल. मैत्रीचं नातं काय किंवा बहीण-भावाचं नातं काय, दोन्ही नात्यांची जाणीव करून देण्यासाठी एकच रेशमी धागा बांधला जातो. या दोन्ही नात्यांचा अर्थ जरी वेगवेगळा असला तरी त्या दोन्ही नात्यात सच्चेपणा आणि विश्वास हा असतोच. अशा रेशमी धाग्यात अडकलेल्या नात्याविषयी.
सध्या सोशल नेटवर्किंग साइटवर एक मेसेज फिरतोय, ‘लास्ट संडे फ्रेंडशिप डे, नेक्स्ट संडे राखी, इस संडे आप लडकी के पिछे, नेक्स्ट संडे लडकी आपके पिछे’. या मेसेजवरून सगळं काही कळतं. एखाद्या मुलीनं मैत्री करावी म्हणून तिच्या पाठीपाठी फिरणार्‍या मुलांसाठी हा मेसेज आहे.  ‘फ्रेंडशिप डे’ला तर व्हॉटस् ऍप, फेसबुक यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर तर शुभेच्छांना अगदी उतच आला होता. प्रत्येक जण आपल्या खास मित्राला किंवा मैत्रिणीला, एवढंच नाही तर अगदी तोंडओळख असणार्‍यांनासुद्धा मेसेज, इमेजेस टाकत होते. परंतु कॉलेजिअन्समध्ये फ्रेंडशिप डे असा रंगात आलेला असतानाच त्यांना ‘फ्रेंडशिप डे’नंतर एकाच आठवडयात येणार्‍या रक्षाबंधनाचंही टेन्शन आलं होतं.
अगदी मैत्रीसारखंच अतुट नातं म्हणजे रक्षाबंधन. बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याला उदंड आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करते. तर भाऊ तिला वचन देत म्हणतो की, ‘‘ मी सदैव तुझी रक्षा करेन. फ्रेंडशिप डे सारखंच यादिवशी देखील हाताला रेशमी धागा बांधून हे नातं अधिक घट्ट बनवलं जातं. पण फ्रेंडशिप डे साजरा करायला उत्सुक असणारी तरुणाई रक्षाबंधनाला तर कॉलेजमधून गायबच होते. सख्खे भाऊ-बहीण हा दिवस आवडीने साजरा करत असले तरी कॉलेजमध्ये जाताना मुलांच्या मनात भीति असते की एखाद्या मुलीने फ्रेंडशिप डेचा बँड बांधते असं सांगून मला राखी बांधली तर काय? मित्राऐवजी थेट मानलेला भाऊच बनवलं तर काय ? या धास्तीने बरेच तरूण दोन दिवस कॉलेजला बंकही करतात. रक्षाबंधनाच्या दिवशी शक्यतो मुलींना टाळण्याकडेच कॉलेजमधील मुलांचा कल असतो. ‘तुच माझा सच्चा दोस्त’ असं सांगणारा तरुणवर्ग रक्षाबंधनाला आपल्या सख्ख्या बहिणीला सोडून कोणासमोर हात पुढे करतच नाही.
पण मुली देखील काही कमी नसतात. एका तरी मुलाला मला भाऊ बनवायचंच आहे, असा निश्चय त्यांनी केलेला असतो. मग अशा एखाद्या मुलाला भाऊ बनवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या त्या लढवतात. फ्रेंडशिप बँडसारखीच दिसणारी ट्रेन्डी राखी आणतात आणि ती राखी त्यांना बांधतात. एकदा का राखी हातात बांधली की त्यांना खरं सांगतात. मुलांच्या त्रासापासून स्वत:ला वाचवण्यासाठी मुली असे किंवा यांसारखे अनेक प्रकार करतात. पण यातले काही तरुण खूपच हुशार असल्यामुळे ते या दिवशी कॉलेज, क्लासच्या आजूबाजूलासुद्धा फिरकत नाहीत. फ्रेंडशिप डेच्या वेळी अंगात उत्साह संचारलेली मंडळी रक्षाबंधनाला कोण जाणे कुठे नाहीशी होतात ! तसं बघायला गेलं तर ही दोन्ही नाती अगदी अतुट आहेत. त्यात जितकं साम्य आहे त्याच्या कित्येकपटीने त्यात फरकही आहेत. भावांसाठी आणि बहिणींसाठी असणारं प्रेम आणि एखाद्या मित्रमैत्रीणीसाठी असणारं प्रेम यात बराच फरक आहे.
पण नातं कोणतही ही असो यात विश्वास, निरागसता, प्रेम, सच्चेपणा आहे आणि तो विसरून चालणार नाही. नातं कोणतंही असो ते टिकवणं महत्वाचं हाच संदेश हे रेशमी धागे देतात. म्हणून तर ही बंधनाची शपथ घातली जाते. पाश्चात्य संस्कृतीचा आपण अवलंब करत असलो तरी आपल्या भारतीय संस्कारांचा आणि विचारांचा तरुणांना विसर पडू नये हे मुलांनाही लक्षात ठेऊन वागावं. आजकाल, ‘मी तुझा मित्र आहे ना !’ असं सांगून कित्येक मुलं मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. या जवळीकीची परिणीती कदाचित त्या मुलीला नकोशा घटनांमध्येही होऊ शकते किंवा तिला अती जवळीक नकोही असेल. पण हेच मित्राला सांगण्यासाठी तिला मग नाईलाजाने रक्षाबंधनाचा आधार घ्यावा लागतो. मैत्रीचं नातं जसं पाण्यासारखं स्वच्छ असावं, तसंच भावाबहिणीचं नातं ही असावं. 

No comments: