My Blog List

Sunday, 9 August 2015

स्वातंत्र्यदिन औपचारिकता की सोहळा?

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा होणार... दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी, राजधानी दिल्लीत ध्वजवंदन, परेड होईल...शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल... सगळ्या राज्याची मुख्यालये, पोलीस स्टेशन, शाळा, महाविद्यालये अगदी गल्लोगल्ली तिरंगा फडकवला जाईल... सगळीकडे मोठ्या आवाजात देशभक्तीपर गीते गायली जातील... काही ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जातील... सगळीकडे सडा टाकून मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातील... महात्मा गांधी , नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग आदी राष्ट्रनेत्यांच्या तसबिरींना हार घालून मानवंदना दिली जाईल...
सिग्नलवर गरीब लहान मुले झेंडे विकतील... तर दुसरीकडे हे झेंडे विकत घेऊन लहान मुले आनंदाने ते फडकवतील... काही उत्साही शर्टाला छोटासा झेंडा लावून मिरवतील... तर काही जण झेंडावंदनाला दांडी मारून स्वातंत्र्यदिनाप्रित्यर्थ मिळणार्‍या सुट्टीचा मुहूर्त गाठून सहलीचं आयोजन करतील..  यावर्षी तर शनिवारची एक रजा टाकली तर सलग दोन दिवसांची सुट्टी एकच दिवस काय ते ऑफीसमध्ये राबायचे तर पुन्हा सलग दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे लांबचं पिकनिकही प्लॅन करता येईल. त्या एका दिवसापुरतं का होईना आपला उर देशभक्तीच्या जाज्वल्य अभिमानाने भरून येईल... रोमारोमांत देशप्रेमाने आगळेच स्फुरण चढेल... वातावरणात चैतन्य पसरेल!
पण दुसर्‍या दिवशी वेगळंच चित्र दिसेल.. लोकांची कामाला जाण्याची रोजची पळापळ सुरू होईल... लहान मुले पाठीला दप्तराचे ओझे लाऊन शाळेत जातील... स्वातंत्र्यदिनी दिमाखाने फडकलेला तिरंगा रस्त्यांच्या बाजूला कुठेतरी धूळ खात पडलेला दिसेल... देशभक्तीपर गाणी तशीच हवेत विरुन जातील... देशसेवेच्या शपथा दुसर्‍याच दिवशी विस्मरणात जातील... रेल्वेतून प्रवास करताना जरा धक्का लागला म्हणून एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहिली जाईल... खून, मारामारी, चोरी अशा घटना होत राहतील... घराघरांत स्त्रियांवर अत्याचार सुरूच राहतील... एकूणच काय तर स्वातंत्र्यदिनाची परंपरा कायम राखण्याची औपचारिकता पूर्ण होऊन नेहमीच्याच आयुष्याला सुरूवात होईल... आपल्या आजूबाजूला घडणार्‍या चित्रविचित्र घटनांमुळे स्वातंत्र्याच्या या औपचारिकतेची चीड आल्याशिवाय राहत नाही...
तेलंगण राज्याचे विभाजन करण्याचा निर्णय झाला.. त्याबरोबरच वेगळ्या विदर्भ, मुंबईच्या विभाजनाविषयी चर्चा सुरू झाली... आपल्या संविधानात सर्व जाती-धर्म-भाषा समान आहेत असा उल्लेख आहे. आपल्या प्रतिज्ञेतही आपण सर्व भारतीय माझे बांधव आहेत, असे म्हणतो! मग केवळ भाषेच्या जोरावर वेगळ्या राज्याची मागणी का केली जाते?... एखादी भाषा येत नाही किंवा परजातीय लग्न अशा क्षुल्लक कारणावरुन जातपंचायती बहिष्कार टाकतात... जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून वडिलांनी गळा दाबून आपल्याच पोटच्या मुलीचा बळी घेण्याची दुर्दैवी घटना घडते... जातपंचायतीच्या मनमानी कारभारावर स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही आळा घालता आलेला नाही... एका बाजूला दुर्गापूजन करुन स्त्रीशक्तीचा गौरव केला जातो, तर दुसरीकडे कित्येक ‘दामिनीं’चा हकनाक बळी जातो... कित्येक सुशिक्षीत कमावत्या स्त्रियांनाही सासरच्या मानसिक दबावाला बळी पडावं लागतंय... राजपथावर स्वातंत्र्यदेवीचे गुणगान गाणारे राजकारणीही विविध मार्गाने लोकांच्या स्वातंत्र्यावर गदाच आणतात... कोणाला महाविद्यालयीन प्रवेशासाठी झगडावे लागते तर कोणाला एखादे शासकीय काम करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो!
स्वातंत्र्य म्हणजे केवळ परदेशी जोखडातून मुक्तता असा अर्थ घेतला जातो... ब्रिटीशांच्या १५० वर्षांच्या पारतंत्रातून भारत मुक्त झाला. एका परदेशी सत्तेचे आपल्यावरील वर्चस्व संपुष्टात आले... मात्र देशांतर्गत विविध घटकांच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक, राजकीय दबावाचे काय? दरवर्षीचा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा करण्यापेक्षा अशा अंतर्गत दबावांतून देशवासीयांची सुटका झाली तर तो खरा स्वातंत्र्यदिन ठरेल... गेल्या ६८ वर्षांच्या कालावधीत हे शक्य झाले नाही... मात्र याबद्दल नाउमेद न होता यावर्षी तरी काही आश्वासक, सकारात्मक घडेल अशी आशा बाळगूया... तरच स्वातंत्र्यदिन हा केवळ औपचारिकता न राहता खर्‍या अर्थाने सोहळा होईल...

No comments: