My Blog List

Thursday, 30 July 2015

सावित्रीबाईंनीच मला शाळेत आणलं!


गुरूपौर्णिमा म्हणजेच आपल्या योग्य दिशा दाखून प्रगतीपथावर आणणार्‍या गुरूंचे स्मरण करून त्यांना गुरूदक्षिणा देण्याचा दिवस. या दिवशी व्हॉट्स ऍपवर, फेसबूकवर, अनेक सोशल वेबसाईट्सवर गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे, विविध संदेश देणारे एसएमएस झळकु लागतात. काही गुरू-शिष्यांच्या कथाही वाचायला मिळतात. पण संपुर्ण महाराष्ट्रातील महिलांना शिक्षणाची दारे खुले करून देणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजही खूप कमी महिला व मुलींना आठवतात. गुरूपौर्णिमेच्या दिवशी अनेक विद्यार्थीनी या आपल्या गुरूंना भेटवस्तू देऊन गुरूपौणिमा साजरी केली असेल. पण ज्यांच्यामूळे आज अनेक महिला व मुली शिक्षीत झाल्या आहेत त्या क्रांतीज्योती सावित्रीमाईंना लेखास्वरूपात वाहिलेली गुरूदक्षिणा...
आज शाळेतील विद्यार्थीनींना तुम्हाला शाळेत कोणी आणलं? असा प्रश्‍न केला असता आपसुक त्यांच्या आईने, बहिणीने, आजीने, बाबांनी, काकांनी अशातल्या अनेकांनी त्यांना शाळेत आणलं असंच उत्तर ऐकायला मिळेल. पण ज्या काळी महिलांना शिक्षणाचा हक्क नव्हता त्यावेळी दलित व स्त्रिया यांना माणूस बनवण्याच्या लढाईत आयुष्य झोकून देणार्‍या सावित्रीबाई होत्या. सर्वात प्रथम महाराष्ट्रातील महिलांना साक्षरेतेचे धडे शिकविणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीमाईच होत्या. सावित्रीबाई नसत्या तर महाराष्ट्र साक्षर व्हायला अजून शे-दोनशे वर्षांचा काळ लागला असता आणि महिलांना आत्मसन्मान काय असतो, हे कळायला शे-पाचशे वर्ष लागली असती. त्यामूळे संपुर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या व विद्यार्थींनीच्या सावित्रीमाई या गुरूच होत्या. गुरूपौर्णमेच्या दिवशी महाभारत व रामायणातील अनेक गुरूंचा आवर्जुन उल्लेख केला जातो. परंतू शिक्षणामूळेच स्त्रीया सशक्त होऊ शकतात, असा हेतू मनात धरून स्त्री शिक्षणासाठी सतत झटणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या कर्तुत्वाचा या दिवशी अनेकांना विसर पडतो.
असं म्हणतात...आपल्याला जो ज्ञान देतो तो गुरू असतोच. पण जो आपल्याला प्रगतीच्या मार्गावर प्रवास करीत असताना योग्य दिशा दाखवितो तोही आपला गुरूच असतो. आजच्या अनेक शाळां-महाविद्यालयांमध्ये अनेक शिक्षक-शिक्षिका हे ठरविलेल्या विशीष्ट तासांमध्ये पुस्तकी ज्ञान शिकवून त्याबदल्यात महिन्याचे पगार घेतात. पण ज्या काळी महिलांना घर, दार, शेती आणि चूल व मूल ही चौकट ओलांडायची नाही, असा अलिखित कायदा होता. त्याकाळी कोणताही पगार किंवा स्वार्थ न बाळगता महिलांना घराबाहेर पडण्याचे बळ देऊन त्यांना शिक्षण देण्याचे कार्य सरू केले.
सावित्रीबाई केवळ महिलांना शिक्षण देऊन थांबल्या नाहीत. त्यांनी त्यांना सक्षम करण्यासाठी, धाडसी करण्यासाठी आणि विविध रूढींमध्ये त्रासलेल्या महिलांना त्यातून सोडवण्याचे महान कार्य केलं.  त्या काळात ‘जो शिकेल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील’ असं लोक म्हणायचे. म्हणून ही क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी काढलेली पहिली शाळा मध्येच बंद पडली होती. त्यावर उपाय म्हणून त्यांना सांगण्यात आले की, ‘‘गोर्‍या साहेबानं एक शोध लावलाय की, जो शिकणार नाही त्याच्या चौदा पिढ्या नरकात जातील’. यामुळे नरकाच्या भीतीने लोक शिक्षणाला होकार देऊ लागले. एक जानेवारी, १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा काढली. त्या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्यानंतर पुण्यातल्या अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. सुरुवातीला शाळेत केवळ सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या वेळी सावित्रीबाईंना अनेकांनी विरोध केला, त्यांच्या अंगावर शेण फेकले, मात्र तरीही सावित्रीबाई थांबल्या नाहीत. त्यांनी संघर्ष करत शिक्षणाच्या प्रसाराचा उपक्रम चालूच ठेवला. त्यांना घर सोडावं लागलं. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. शिक्षणाचा प्रसार व्हावा, प्रत्येकाने शिकावं यासाठी त्या अथक परिश्रम घेत होत्या.
स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणं फार महत्त्वाचं आहे, हे सावित्रीबाईंनी त्या काळीच ओळखलं होतं. त्या वेळी समाजातल्या काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. त्या काळात अतिशय लहान मुलींचे त्यांच्या वयाच्या दुप्पट मोठ्या माणसाशी लग्न लावून दिलं जात असे. अशा विवाहप्रथेमुळे मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. समाजात पुनर्विवाह मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावं लागत असे. विधवा स्त्रियांचा छळ होत असे. यामुळे जोतिरावांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. सावित्रीबाईंनी त्यांना त्यांच्या याही कामात पाठिंबा देऊन ते समर्थपणे चालवलं.  सावित्रीबाईंनी आपल्या शिक्षणाचा लाभ इतर स्त्रियांनाही करून दिला आणि त्यांनाही सुशिक्षित केलं.
सावित्रीमाईंच्या या यशस्वी लढाईमुळे लाखो संख्येने महिला-मुली या विविध कॉर्पोरेट ऑफीसमध्ये उच्च पातळीवर काम करू लागल्या आहेत. त्यांना शाळेत शिकविणारे शिक्षक-शिक्षीका, ऑफीसमध्ये विविध कौशल्य शिकविणारे त्यांचे बॉस हे त्यांचे गुरू असतीलच. यात तीळमात्र शंका नाही. पण ज्यांच्यामुळे आपण मुली-महिला शाळेत जाऊ लागलो त्या सावित्रीबाईंना देखील गुरूपौर्णमेच्या दिवशी गुरूस्थानी ठेऊन त्यांना वंदन करणे आपले कर्तव्य आहे आणि ते आजच्या मुली-महिला विसरत चालल्या आहेत. हे विदारक चित्र बदलण्याची गरज आहे. त्यामूळे सावित्रीच्या लेकींनो...यापुढे तुम्हाला कोणी विचारलं, ‘‘तुम्हाला शाळेत कोणी आणलं?’’ तर अभिमानाने उत्तर द्या, ‘‘मला माझ्या सावित्रीमाईंनी शाळेत आणलं. ’’ जेव्हा महाराष्ट्रातील संपुर्ण महिला-मुलींकडे असे उत्तर मिळण्यास सुरवात होईल त्यावेळी गुरूपौर्णिमेच्या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीमाईंना खर्‍या अर्थाने गुरूदक्षिणा प्राप्त झाली, असे मी म्हणेण.
प्रमिला पवार

Tuesday, 21 July 2015

व्वा रे ‘कन्यादान’...

झी मराठीवर बाप लेकीच्या मायेची कहाणी सांगणारी ‘कन्यादान’ ही मालिका संपली. मी कधीही मालिका न बघणारी त्या दिवशी त्या मालिकेचा काय एंडींग होतोय? यासाठी एक तासाचा खटोटोप केला. मस्त झाला. त्या मालिकेत कार्तिक आणि गायत्रीच्या लग्नाचा सोहळा अगदी रितीरिवाजाने पार पडला. पण या मालिकेने हलकीशी का होईना एक झलक देऊन समाजात एक विचाराची पेरणी केली जाता जाता...ती म्हणजे ज्यावेळी कार्तिक आणि गायत्रीचे लग्न लावले जाते त्यावेळी तेथे लग्न लावण्यासाठी कोणी पुरूष पुरोहीत दाखविला नसून चक्क सहावारी साडी परिधान केलेली महिला पुरोहीत त्या दोघांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने लग्न लावत होती. पाहून खूप बरे वाटले. महिला पुरोहितांनी धार्मिक विधी, कार्य करायला गेल्या अनेक वर्षापासून सुरुवात केली आहे. पण आजही जेव्हा एखाद्याच्या घरी पुजा-अर्चा, लग्नसोहळे आयोजित केले जातात, तेव्हा सर्वांच्या नजरेसमोर पुरूष पुरोहितच दिसतात. पण महिला पुरोहितही स्पष्ट उच्चार, स्वच्छ आवाज, उत्तम पठणकौशल्य आत्मसात केले असून सोवळा नऊवारी अथवा सहावारी वेश परिधान करून आणि सणाचे-धार्मिक कार्याचे महात्म्य ओळखून आपली जबाबदारी त्या नेटाने पार पाडू शकतात, हा विचार आजही समाजात फारसा काही रूजलेला दिसून आला नाही. समाजाचे काय घेऊन बसलाय हो...विविध विचारांमधून समाजप्रबोधनाचे कार्य करणार्‍या विविध मालिकांमध्येही पुजा-अर्चा व लग्नसोहळ्याप्रसंगी पुरूष पुरोहितच झळकताना दिसतात. पण ‘कन्यादान’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेता घेता एक विचार मात्र समाजाला दिला आहे. ‘पूजा सांगायची तर ती पुरुषानेच, महिलांनी पूजा सांगणे देवाला चालणार नाही,’ अशी मानसिकता आजही समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. महिला पुरोहितांकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलायला हवी आणि या क्षेत्रातील महिलांना गौण न मानता त्यांनाही संधी द्यायला हवी. नेहमीच धोतर आणि पोथीची पिशवी घेऊन बाईकवर फिरणा-या गुरुंजीऐवजी आता लख्ख नऊवारी सोवळ्यात लगबगीत असलेल्या महिला पुरोहित दिसल्या तर त्यांना न हिणवता त्यांचे स्वागत करा. सुरुवातीला महिलांनी पौरोहित्य करावे की नाही, यावरुन काही काळ वादंगही निर्माण झाला होता. मात्र आता बदलत्या काळात या क्षेत्रात निपुण असल्याचं दाखवत, पुरुषांची मक्तेदारी या महिलांनी मोडीत काढलीय. या महिलाही ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतायेत. फक्त गरज आहे ती समाजाची नाही...प्रथमरीत्या तुमच्यातील प्रत्येकाच्या स्वतःची मानसिकता बदलण्याची...तुमच्यातील प्रत्येकाची मानसिकता बदलली की आपोआप समाजाचीही मानसिकता बदलेल...विचार करून पहा...शेवटी एकच...व्वा रे ‘कन्यादान’...
प्रमिला पवार

Saturday, 11 July 2015

नातं मैत्रीचं....

गेल्याच आठवड्यातली रविवारची सुंदर, प्रसन्न अन् काहीशी निवांत सकाळ! मस्त गुलाबी थंडीत मॉर्निंग वॉक घेऊन आल्यावर कुंडीतला गवती चहा आणि आलं घालून केलेल्या माझ्या आवडीच्या कडक चहाचा आस्वाद घेत निवांतपणे बाल्कनीत बसले होते. बाल्कनीतून समोर दिसणार्‍या डोंगरावर पसरलेली धुक्याची दुलई अजूनही तशीच होती. तिच्यातून आरपार पाहण्याचा प्रयत्न करत पुढील लेखासाठी विषय काय घ्यावा याचा विचार करत होते. तेवढ्यात व्हॉटस् ऍप किणकिणलं... 

सुप्रभात 
खरी मैत्री ही कधी करावी लागत नसते, 
ती आपोआपच होत असते. 
खरी मैत्री ही जपावी लागत नसते, 
ती आपोआपच जपली जात असते. 
खर्‍या मैत्रीला केवळ सहवासाची आस नसते, 
तर निर्मळ अन् स्वच्छंदी मनाची कास असते. 

हे वाचता वाचता, ध्यानीमनी नसतानाही आपोआप आणि अचानक तिच्याशी‘ झालेली मैत्री आणि ती‘ डोळ्यासमोर आली. खरं तर ती आणि मी, ना आम्ही शाळा-कॉलेजच्या मैत्रिणी, ना जवळपास राहणार्‍या अथवा ना नित्य संपर्कातल्या वा ऑफिसमधल्या मैत्रिणी. आमची ओळखही केवळ तीनचार वर्षांपूर्वीच झाली आणि आजपर्यंत आम्ही दोघी एकमेकींना प्रत्यक्षात भेटलोदेखील केवळ तीनचार वेळाच. तरीदेखील आमच्या मैत्रीच्या नात्याची वीण मात्र घट्ट आहे. 
नित्यनेमाने सकाळी सकाळी एकमेकींना गुड मॉर्निंग (अर्थातच थहरींी रिि वर) करून आमच्या दिवसाची सुरुवात होते. मग दिवसभरात जमेल तसे, वेळ मिळेल तसे आम्हाला आवडलेले स्वतःचे अथवा इतरांचेही विचार, साहित्य, जोक्स एकमेकांशी शेअर करतो. या शेअरिंगमध्ये एकमेकींच्या सुख-दुःखाचाही समावेश होतो.

मला आवडणारे तिचे अनेक पैलू आहेत. तिच्या लिखाणातील हळवेपणा आणि वास्तविकता माझ्या मनाला अतिशय भावते आणि तिच्या त्या साहित्यिक किटी पार्टी‘च्या तर मी प्रेमातच पडले आहे. तिच्या अन्य मैत्रिणींचा एक ग्रुप आहे. त्या मैत्रिणी दर महिन्याला एकीच्या घरी जमतात आणि आधीच ठरवलेल्या विषयावर आपापले विचार मांडतात. कुणी आपले विचार कवितेतून व्यक्त करतात; तर कुणी लेखातून. विषय एक, विचार अनेक‘. किती सुंदर कल्पना आहे नं या साहित्यिक किटी पार्टीची‘. खूप खूप भावली माझ्या मनाला. 

खरं तर किटी पार्टी म्हटलं, की डोळ्यासमोर येतात त्या नटूनथटून येणार्‍या सखया, त्यांचे गॉसिप्स, हास्यकल्लोळात नकळत पडणारा विविध पदार्थांचा फडशा, विविध गेम्स आणि त्यानंतर मिळालेल्या बक्षिसांची चर्चा वगैरे वगैरे... 

परंतु तिच्या या अनोख्या साहित्यिक किटी पार्टीमध्ये मी प्रत्यक्षात नव्हे, तरी मनाने मात्र अनेक वेळा जाऊन आले आहे. त्यांच्या ठरलेल्या विषयावरचे माझे विचार अनेकदा कागदावर उतरवलेही आहेत. तिच्या या साहित्यिक किटी पार्टीकडे बघितलं की वाटतं, या सख्या जणू इतरांना संदेश देत आहेत, 

कशाला हवे ते नटवे सुंदर तन, 
सुंदरतेपेक्षा हवे निर्मळ मन 
कशाला हवी ती ओठांना लाली 
त्याऐवजी हवी सत्य आणि मृदू बोली 
कशाला हवे ते नयनातील काजळ 
परी भाव मनातील असावा नितळ 
मनात असावी सच्ची मैत्री-भावना‘ 
सर्वांचे कल्याण‘ हीच असे मनोकामना 

खरंच काही व्यक्ती आपल्यालाही नकळत, अलवारपणे आपल्या आयुष्यात येतात अन् आपल्याला आपलंसं करतात. नकळत आपल्या मनाच्या एका कोपर्‍यात दडून राहतात. आपल्या सुखदुःखात सहभागी होताना सुखाचे क्षण वृद्धिंगत करतात; तर दुःख वाटून घेतात. आणि मग आपसूकच आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातात. तिच्या या साहित्यिक किटी पार्टी‘ला उपस्थित राहण्याचा योग मला आजपर्यंत आला नसला, तरी तो लवकरच यावा अशी मनापासून इच्छा आहे. 


तुझी मैत्री मला देते, 
आत्मविश्‍वास अन् धिटाई. 
हे या जन्मीचं भाग्य म्हणू, 
की साता जन्माची पुण्याई!

Thursday, 9 July 2015

मग का नाही दाखवू नये त्या रणरागिणीचा चेहरा?

काही दिवसांपुर्वी एक रणरागिणीने रौद्र रूप धारण करून तिची छेड काढणार्‍या एका मुलाला आपल्या स्टाईने धडा शिकवीत पोलिस स्टेशनमध्येच धुलाई करतानाचा व्हिडीयो सर्व प्रसार माध्यम, व्हॉट्सऍप आणि फेसबूकवर दाखवित होते. खूप बरं वाटलं. कारण एखादा मुलगा आपली छेड काढतोय म्हणून इतर मुली आपली वाट वदलताना दिसतात, तर त्यांची छेडछाड सहन करताना दिसतात. अशा रोडरोमियोंची छेडछाडीची मर्यादा काही दिवसांनी ओलांडते आणि मग काही मुली आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. त्या रणरागिणीचे हे रौद्र रूप पाहून अशा मुलींनी धडा घेतला पाहीजेच. पण मनात एक खंत राहीली की काही प्रसार माध्यमांनी तिचा व्हिडीयो प्रसारित करताना तिचा चेहरा ब्लर केला. आता यामागे काही तात्विक कारण असुही शकते किंवा तिच्या सुरक्षेबाबचेही कारण असू शकते. पण मी काय म्हणतेय...त्या रणरागिनीने मोठ्या धाडसाने त्या रोडरोमियोला धडा शिकविला. मागचा पुढचा विचार न करता भर पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर त्याची पिटाई केली. हे कौतुक करण्याजोगेच आहे. मग का नाही दाखवू नये त्या रणरागिणीचा चेहरा?

Saturday, 4 July 2015

बुद्धी भ्रष्ट करणारी ‘सेल्फी विथ अंत्ययात्रे’ची नशा

सध्या व्हॉट्स ऍप आणि फेसबूकवर ‘डिजीटल इंडियाची पहिली सेल्फी’ मोठ्या वेगाने फिरतेय...सेल्फीचे भूत आज समाजामध्ये इतकं चढलं आहे की कोणी आपला मित्र, नातेवाईक आज आपल्यात आता राहीला नाही याचे भानही त्याला नाही. ‘डिजीटल इंडियाची पहिली सेल्फी’ ही अतिशय किळसवाणी आहे. आपला जवळचा माणूस आपल्याला सोडून गेला आहे ही संवेदना केवळ एका सेल्फीने कशी काय भरून निघेल? ही विचार करण्यासाराखी गोष्ट आहे. कधी मित्रांसोबत, कधी मैत्रिणींसोबत, कधी नेत्यांसोबत तर कधी अभिनेत्यासोबत सेल्फी काढणारे नेटीझन्स आता चक्क खांदा देताना उचललेल्या मृतदेहासोबत सेल्फी काढून सोशल साईटवर अपलोड करत आहेत. हा कहरच आहे खूप मोठा...प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तरुणाईची बदलत चाललेली ही मानसिकता समाजासाठी निश्चितच घातक आहे. ‘सेल्फी विथ अंत्ययात्रा’ काढणार्‍या त्या सेल्फी चाहत्याला माझा एक प्रश्‍न आहे की, तुझ्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या मृतदेहाला खांदा देताना तू तर सेल्फी काढलास. पण तू शेअर केलेल्या या सेल्फी विथ अंत्ययात्रामूळे तुझ्या अंत्ययात्रेला एका जणाचा तरी खांदा लागेल का?
-प्रमिला पवार