My Blog List

Tuesday, 21 July 2015

व्वा रे ‘कन्यादान’...

झी मराठीवर बाप लेकीच्या मायेची कहाणी सांगणारी ‘कन्यादान’ ही मालिका संपली. मी कधीही मालिका न बघणारी त्या दिवशी त्या मालिकेचा काय एंडींग होतोय? यासाठी एक तासाचा खटोटोप केला. मस्त झाला. त्या मालिकेत कार्तिक आणि गायत्रीच्या लग्नाचा सोहळा अगदी रितीरिवाजाने पार पडला. पण या मालिकेने हलकीशी का होईना एक झलक देऊन समाजात एक विचाराची पेरणी केली जाता जाता...ती म्हणजे ज्यावेळी कार्तिक आणि गायत्रीचे लग्न लावले जाते त्यावेळी तेथे लग्न लावण्यासाठी कोणी पुरूष पुरोहीत दाखविला नसून चक्क सहावारी साडी परिधान केलेली महिला पुरोहीत त्या दोघांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने लग्न लावत होती. पाहून खूप बरे वाटले. महिला पुरोहितांनी धार्मिक विधी, कार्य करायला गेल्या अनेक वर्षापासून सुरुवात केली आहे. पण आजही जेव्हा एखाद्याच्या घरी पुजा-अर्चा, लग्नसोहळे आयोजित केले जातात, तेव्हा सर्वांच्या नजरेसमोर पुरूष पुरोहितच दिसतात. पण महिला पुरोहितही स्पष्ट उच्चार, स्वच्छ आवाज, उत्तम पठणकौशल्य आत्मसात केले असून सोवळा नऊवारी अथवा सहावारी वेश परिधान करून आणि सणाचे-धार्मिक कार्याचे महात्म्य ओळखून आपली जबाबदारी त्या नेटाने पार पाडू शकतात, हा विचार आजही समाजात फारसा काही रूजलेला दिसून आला नाही. समाजाचे काय घेऊन बसलाय हो...विविध विचारांमधून समाजप्रबोधनाचे कार्य करणार्‍या विविध मालिकांमध्येही पुजा-अर्चा व लग्नसोहळ्याप्रसंगी पुरूष पुरोहितच झळकताना दिसतात. पण ‘कन्यादान’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेता घेता एक विचार मात्र समाजाला दिला आहे. ‘पूजा सांगायची तर ती पुरुषानेच, महिलांनी पूजा सांगणे देवाला चालणार नाही,’ अशी मानसिकता आजही समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. महिला पुरोहितांकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलायला हवी आणि या क्षेत्रातील महिलांना गौण न मानता त्यांनाही संधी द्यायला हवी. नेहमीच धोतर आणि पोथीची पिशवी घेऊन बाईकवर फिरणा-या गुरुंजीऐवजी आता लख्ख नऊवारी सोवळ्यात लगबगीत असलेल्या महिला पुरोहित दिसल्या तर त्यांना न हिणवता त्यांचे स्वागत करा. सुरुवातीला महिलांनी पौरोहित्य करावे की नाही, यावरुन काही काळ वादंगही निर्माण झाला होता. मात्र आता बदलत्या काळात या क्षेत्रात निपुण असल्याचं दाखवत, पुरुषांची मक्तेदारी या महिलांनी मोडीत काढलीय. या महिलाही ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतायेत. फक्त गरज आहे ती समाजाची नाही...प्रथमरीत्या तुमच्यातील प्रत्येकाच्या स्वतःची मानसिकता बदलण्याची...तुमच्यातील प्रत्येकाची मानसिकता बदलली की आपोआप समाजाचीही मानसिकता बदलेल...विचार करून पहा...शेवटी एकच...व्वा रे ‘कन्यादान’...
प्रमिला पवार

No comments: