My Blog List

Saturday, 11 July 2015

नातं मैत्रीचं....

गेल्याच आठवड्यातली रविवारची सुंदर, प्रसन्न अन् काहीशी निवांत सकाळ! मस्त गुलाबी थंडीत मॉर्निंग वॉक घेऊन आल्यावर कुंडीतला गवती चहा आणि आलं घालून केलेल्या माझ्या आवडीच्या कडक चहाचा आस्वाद घेत निवांतपणे बाल्कनीत बसले होते. बाल्कनीतून समोर दिसणार्‍या डोंगरावर पसरलेली धुक्याची दुलई अजूनही तशीच होती. तिच्यातून आरपार पाहण्याचा प्रयत्न करत पुढील लेखासाठी विषय काय घ्यावा याचा विचार करत होते. तेवढ्यात व्हॉटस् ऍप किणकिणलं... 

सुप्रभात 
खरी मैत्री ही कधी करावी लागत नसते, 
ती आपोआपच होत असते. 
खरी मैत्री ही जपावी लागत नसते, 
ती आपोआपच जपली जात असते. 
खर्‍या मैत्रीला केवळ सहवासाची आस नसते, 
तर निर्मळ अन् स्वच्छंदी मनाची कास असते. 

हे वाचता वाचता, ध्यानीमनी नसतानाही आपोआप आणि अचानक तिच्याशी‘ झालेली मैत्री आणि ती‘ डोळ्यासमोर आली. खरं तर ती आणि मी, ना आम्ही शाळा-कॉलेजच्या मैत्रिणी, ना जवळपास राहणार्‍या अथवा ना नित्य संपर्कातल्या वा ऑफिसमधल्या मैत्रिणी. आमची ओळखही केवळ तीनचार वर्षांपूर्वीच झाली आणि आजपर्यंत आम्ही दोघी एकमेकींना प्रत्यक्षात भेटलोदेखील केवळ तीनचार वेळाच. तरीदेखील आमच्या मैत्रीच्या नात्याची वीण मात्र घट्ट आहे. 
नित्यनेमाने सकाळी सकाळी एकमेकींना गुड मॉर्निंग (अर्थातच थहरींी रिि वर) करून आमच्या दिवसाची सुरुवात होते. मग दिवसभरात जमेल तसे, वेळ मिळेल तसे आम्हाला आवडलेले स्वतःचे अथवा इतरांचेही विचार, साहित्य, जोक्स एकमेकांशी शेअर करतो. या शेअरिंगमध्ये एकमेकींच्या सुख-दुःखाचाही समावेश होतो.

मला आवडणारे तिचे अनेक पैलू आहेत. तिच्या लिखाणातील हळवेपणा आणि वास्तविकता माझ्या मनाला अतिशय भावते आणि तिच्या त्या साहित्यिक किटी पार्टी‘च्या तर मी प्रेमातच पडले आहे. तिच्या अन्य मैत्रिणींचा एक ग्रुप आहे. त्या मैत्रिणी दर महिन्याला एकीच्या घरी जमतात आणि आधीच ठरवलेल्या विषयावर आपापले विचार मांडतात. कुणी आपले विचार कवितेतून व्यक्त करतात; तर कुणी लेखातून. विषय एक, विचार अनेक‘. किती सुंदर कल्पना आहे नं या साहित्यिक किटी पार्टीची‘. खूप खूप भावली माझ्या मनाला. 

खरं तर किटी पार्टी म्हटलं, की डोळ्यासमोर येतात त्या नटूनथटून येणार्‍या सखया, त्यांचे गॉसिप्स, हास्यकल्लोळात नकळत पडणारा विविध पदार्थांचा फडशा, विविध गेम्स आणि त्यानंतर मिळालेल्या बक्षिसांची चर्चा वगैरे वगैरे... 

परंतु तिच्या या अनोख्या साहित्यिक किटी पार्टीमध्ये मी प्रत्यक्षात नव्हे, तरी मनाने मात्र अनेक वेळा जाऊन आले आहे. त्यांच्या ठरलेल्या विषयावरचे माझे विचार अनेकदा कागदावर उतरवलेही आहेत. तिच्या या साहित्यिक किटी पार्टीकडे बघितलं की वाटतं, या सख्या जणू इतरांना संदेश देत आहेत, 

कशाला हवे ते नटवे सुंदर तन, 
सुंदरतेपेक्षा हवे निर्मळ मन 
कशाला हवी ती ओठांना लाली 
त्याऐवजी हवी सत्य आणि मृदू बोली 
कशाला हवे ते नयनातील काजळ 
परी भाव मनातील असावा नितळ 
मनात असावी सच्ची मैत्री-भावना‘ 
सर्वांचे कल्याण‘ हीच असे मनोकामना 

खरंच काही व्यक्ती आपल्यालाही नकळत, अलवारपणे आपल्या आयुष्यात येतात अन् आपल्याला आपलंसं करतात. नकळत आपल्या मनाच्या एका कोपर्‍यात दडून राहतात. आपल्या सुखदुःखात सहभागी होताना सुखाचे क्षण वृद्धिंगत करतात; तर दुःख वाटून घेतात. आणि मग आपसूकच आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातात. तिच्या या साहित्यिक किटी पार्टी‘ला उपस्थित राहण्याचा योग मला आजपर्यंत आला नसला, तरी तो लवकरच यावा अशी मनापासून इच्छा आहे. 


तुझी मैत्री मला देते, 
आत्मविश्‍वास अन् धिटाई. 
हे या जन्मीचं भाग्य म्हणू, 
की साता जन्माची पुण्याई!

No comments: