My Blog List

Thursday, 30 July 2015

सावित्रीबाईंनीच मला शाळेत आणलं!


गुरूपौर्णिमा म्हणजेच आपल्या योग्य दिशा दाखून प्रगतीपथावर आणणार्‍या गुरूंचे स्मरण करून त्यांना गुरूदक्षिणा देण्याचा दिवस. या दिवशी व्हॉट्स ऍपवर, फेसबूकवर, अनेक सोशल वेबसाईट्सवर गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे, विविध संदेश देणारे एसएमएस झळकु लागतात. काही गुरू-शिष्यांच्या कथाही वाचायला मिळतात. पण संपुर्ण महाराष्ट्रातील महिलांना शिक्षणाची दारे खुले करून देणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजही खूप कमी महिला व मुलींना आठवतात. गुरूपौर्णिमेच्या दिवशी अनेक विद्यार्थीनी या आपल्या गुरूंना भेटवस्तू देऊन गुरूपौणिमा साजरी केली असेल. पण ज्यांच्यामूळे आज अनेक महिला व मुली शिक्षीत झाल्या आहेत त्या क्रांतीज्योती सावित्रीमाईंना लेखास्वरूपात वाहिलेली गुरूदक्षिणा...
आज शाळेतील विद्यार्थीनींना तुम्हाला शाळेत कोणी आणलं? असा प्रश्‍न केला असता आपसुक त्यांच्या आईने, बहिणीने, आजीने, बाबांनी, काकांनी अशातल्या अनेकांनी त्यांना शाळेत आणलं असंच उत्तर ऐकायला मिळेल. पण ज्या काळी महिलांना शिक्षणाचा हक्क नव्हता त्यावेळी दलित व स्त्रिया यांना माणूस बनवण्याच्या लढाईत आयुष्य झोकून देणार्‍या सावित्रीबाई होत्या. सर्वात प्रथम महाराष्ट्रातील महिलांना साक्षरेतेचे धडे शिकविणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीमाईच होत्या. सावित्रीबाई नसत्या तर महाराष्ट्र साक्षर व्हायला अजून शे-दोनशे वर्षांचा काळ लागला असता आणि महिलांना आत्मसन्मान काय असतो, हे कळायला शे-पाचशे वर्ष लागली असती. त्यामूळे संपुर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या व विद्यार्थींनीच्या सावित्रीमाई या गुरूच होत्या. गुरूपौर्णमेच्या दिवशी महाभारत व रामायणातील अनेक गुरूंचा आवर्जुन उल्लेख केला जातो. परंतू शिक्षणामूळेच स्त्रीया सशक्त होऊ शकतात, असा हेतू मनात धरून स्त्री शिक्षणासाठी सतत झटणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या कर्तुत्वाचा या दिवशी अनेकांना विसर पडतो.
असं म्हणतात...आपल्याला जो ज्ञान देतो तो गुरू असतोच. पण जो आपल्याला प्रगतीच्या मार्गावर प्रवास करीत असताना योग्य दिशा दाखवितो तोही आपला गुरूच असतो. आजच्या अनेक शाळां-महाविद्यालयांमध्ये अनेक शिक्षक-शिक्षिका हे ठरविलेल्या विशीष्ट तासांमध्ये पुस्तकी ज्ञान शिकवून त्याबदल्यात महिन्याचे पगार घेतात. पण ज्या काळी महिलांना घर, दार, शेती आणि चूल व मूल ही चौकट ओलांडायची नाही, असा अलिखित कायदा होता. त्याकाळी कोणताही पगार किंवा स्वार्थ न बाळगता महिलांना घराबाहेर पडण्याचे बळ देऊन त्यांना शिक्षण देण्याचे कार्य सरू केले.
सावित्रीबाई केवळ महिलांना शिक्षण देऊन थांबल्या नाहीत. त्यांनी त्यांना सक्षम करण्यासाठी, धाडसी करण्यासाठी आणि विविध रूढींमध्ये त्रासलेल्या महिलांना त्यातून सोडवण्याचे महान कार्य केलं.  त्या काळात ‘जो शिकेल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील’ असं लोक म्हणायचे. म्हणून ही क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी काढलेली पहिली शाळा मध्येच बंद पडली होती. त्यावर उपाय म्हणून त्यांना सांगण्यात आले की, ‘‘गोर्‍या साहेबानं एक शोध लावलाय की, जो शिकणार नाही त्याच्या चौदा पिढ्या नरकात जातील’. यामुळे नरकाच्या भीतीने लोक शिक्षणाला होकार देऊ लागले. एक जानेवारी, १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा काढली. त्या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्यानंतर पुण्यातल्या अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. सुरुवातीला शाळेत केवळ सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या वेळी सावित्रीबाईंना अनेकांनी विरोध केला, त्यांच्या अंगावर शेण फेकले, मात्र तरीही सावित्रीबाई थांबल्या नाहीत. त्यांनी संघर्ष करत शिक्षणाच्या प्रसाराचा उपक्रम चालूच ठेवला. त्यांना घर सोडावं लागलं. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. शिक्षणाचा प्रसार व्हावा, प्रत्येकाने शिकावं यासाठी त्या अथक परिश्रम घेत होत्या.
स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणं फार महत्त्वाचं आहे, हे सावित्रीबाईंनी त्या काळीच ओळखलं होतं. त्या वेळी समाजातल्या काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. त्या काळात अतिशय लहान मुलींचे त्यांच्या वयाच्या दुप्पट मोठ्या माणसाशी लग्न लावून दिलं जात असे. अशा विवाहप्रथेमुळे मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. समाजात पुनर्विवाह मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावं लागत असे. विधवा स्त्रियांचा छळ होत असे. यामुळे जोतिरावांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. सावित्रीबाईंनी त्यांना त्यांच्या याही कामात पाठिंबा देऊन ते समर्थपणे चालवलं.  सावित्रीबाईंनी आपल्या शिक्षणाचा लाभ इतर स्त्रियांनाही करून दिला आणि त्यांनाही सुशिक्षित केलं.
सावित्रीमाईंच्या या यशस्वी लढाईमुळे लाखो संख्येने महिला-मुली या विविध कॉर्पोरेट ऑफीसमध्ये उच्च पातळीवर काम करू लागल्या आहेत. त्यांना शाळेत शिकविणारे शिक्षक-शिक्षीका, ऑफीसमध्ये विविध कौशल्य शिकविणारे त्यांचे बॉस हे त्यांचे गुरू असतीलच. यात तीळमात्र शंका नाही. पण ज्यांच्यामुळे आपण मुली-महिला शाळेत जाऊ लागलो त्या सावित्रीबाईंना देखील गुरूपौर्णमेच्या दिवशी गुरूस्थानी ठेऊन त्यांना वंदन करणे आपले कर्तव्य आहे आणि ते आजच्या मुली-महिला विसरत चालल्या आहेत. हे विदारक चित्र बदलण्याची गरज आहे. त्यामूळे सावित्रीच्या लेकींनो...यापुढे तुम्हाला कोणी विचारलं, ‘‘तुम्हाला शाळेत कोणी आणलं?’’ तर अभिमानाने उत्तर द्या, ‘‘मला माझ्या सावित्रीमाईंनी शाळेत आणलं. ’’ जेव्हा महाराष्ट्रातील संपुर्ण महिला-मुलींकडे असे उत्तर मिळण्यास सुरवात होईल त्यावेळी गुरूपौर्णिमेच्या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीमाईंना खर्‍या अर्थाने गुरूदक्षिणा प्राप्त झाली, असे मी म्हणेण.
प्रमिला पवार

No comments: